डॉ. अनुजा जोशी
लहानपणापासून मला बालगणेश खूप आवडतो. त्याचा गोंडस बाळसेदारपणा व कोवळ्या अंकुरासारखी टुकटुकीत त्याची इवलीशी ‘सोंडुली’- मला खूपच भावते. पण तेव्हा एखाद्या कॅलेंडरशिवाय तो फारसा कुठे दिसत नसे. गणेशचतुर्थीतही कुठेतरी क्वचित एखाद-दुसरा नवसाचा बालगणेश बसवलेला दिसायचा.
पण अलीकडे टीव्ही-जाहिरातींच्या आक्रमणामुळे तो स्टीकर्स, टॅटू, टिफीन, बॅगा, कपडे, वह्या, पुस्तके कुठेही दिसू लागलाय. पौराणिक मालिका व कार्टून सिरीयल्समध्ये त्याचं अनेकदा ‘लाईव्ह’ दर्शनही घडलं. बालगणपती अनेक खोड्या करताना, लढाया-पराक्रम करतानाही बघायला मिळाला. ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ने तर धमालच उडवून दिली. आणि आता तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे पेव फुटल्यापासून बालगणपतीच काय, तरुण-वयस्कर कोणत्याही वयाचा, कोणत्याही ‘व्हरायटी’चा गणपती दिसू लागलाय! सैनिक, शेतकरी, कुंभार, इंजिनिअर, डॉक्टर असे सगळे व्यवसाय करणारा, साधू-बाबा-संत-महंत सर्वांच्या रूपातला, सगळ्या देव-देवतांच्या आकारातला, प्राणी-पक्षी, फुलं-फळं यांपासून तयार झालेला, काडेपेटीच्या आकारापासून ते माडाच्या उंचीपर्यंत- सगळ्या गणपतींचा सुकाळ झाला! गणेशोत्सवाचा ‘गनेश फेस्टिव्हल’ झाला!
या बदललेल्या दिवसातला एक गमतीशीर प्रसंग येथे आवर्जून आता सांगावासा वाटतोय-
टीव्हीवर गणपतीचीच एक पौराणिक मालिका सुरू होती. बच्चेकंपनी बघायला बसलेली. मालिकेत ‘पार्वती आपल्या अंगाचा मळ काढून त्याची मूर्ती तयार करते आहे’ असा सीन होता. आता थोड्याच वेळात माझा आवडता बालगणपती बघायला मिळणार या आशेने मीही तिथे थांबले. पार्वती अंगाचा ‘मळ’ काढत होती. तो मळ चकचक चमकताना वगैरेही दाखवला होता. लेप उतरवावा तसा ‘मळ’ उतरवून पार्वतीने त्याची एक मूर्ती तयार केली. अर्थात मूर्तीही चमकू लागली. त्यापासून एक छान गुटगुटीत बाळ तयार झालं. अंगाच्या मळाचं असं बाळ तयार झालेलं बघून सिरीयल बघणार्या बच्चेकंपनीकडून- ‘‘श्श्शीऽऽऽ इतका मळ तिच्या अंगावर साठला होता की काय?’’ अशी जबरदस्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. मुले अगदी उत्स्फूर्तपणे व बेधडकपणे हे बोलली व एखादी मनोरंजक फँटसी बघावी तशी पुन्हा मजेत सिरीयल बघू लागली...
-मुलांची शंका व प्रतिक्रिया अतिशय रास्त होती. ‘पार्वतीच्या अंगाच्या मळाची मूर्ती’ हा किंतु माझ्याही मनात लहानपणापासून होता. खरं तर, आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात हे कधी ना कधी येऊन गेलंही असेल. पण असं म्हणण्याचं, कुणाला विचारण्याचं धाडस आपण कधी केलं नाही. सणवार- धार्मिक श्रद्धा व सगळ्याची व्यर्थ भीती यांमुळे अशा अनेक प्रश्नांच्या स्प्रिंग्ज् दाबून ठेवण्याएवढे बावळट आपण नक्की होतो. आपले एक वेळ चालून गेले. पण असं लक्षात घ्यायला हवं की, आजची ही बालगणेशांची पिढी खूप स्मार्ट बनली आहे. बुद्धिमान आहे. त्यांना खूप प्रश्न पडतात. त्यांची समर्पक उत्तरेही त्यांना हवी असतात. त्यांच्या पौगंडावस्थेत तर ‘त्यांना सगळं काही कळतं आणि काहीच कळत नाही’ अशा दोन्हींचं मिश्रण झालेलं असतं. धार्मिक गोष्टींकडे केवळ अवडंबर आणि हौस म्हणून न बघता त्यातलं ‘ज्ञान’ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आयुष्याच्या इमारती मुलभूत ज्ञानाच्या या पायावर भक्कम उभ्या राहू शकतात. म्हणून अशा गोष्टी आपणच जिज्ञासूपणे समजून घेऊन त्यांच्यापर्यंत योग्यप्रकारे पोचवल्या पाहिजेत असं या प्रसंगानंतर वारंवार माझ्या मनात येऊ लागलं.
शास्त्रे-पुराणे-लोकवेदातल्या अशा गोष्टींमागे असलेले वैज्ञानिक आधार पार्वतीच्या या गोष्टीपासूनच मी शोधायचे ठरवले. आज मुलांचं जगही बदललं आहे. डोरेमॉन, निंजा हतोडी, त्यांची भारी भारी गॅजेटस्, त्यांचे पराक्रम, पोकेमॉन, पिकाचू, शिशिमानो, कियो, सुनियो, टॉम ऍण्ड जेरी, ऑग्गी ऍण्ड कॉक्रोचेस् वगैरे वगैरेंच्या अवघ्या लीला समरसून बघणार्या मुलांनी ‘पार्वतीने अंगाच्या मळाची मूर्ती तयार करणे’ हा चमत्कारही तेवढाच मजेदारपणे बघितला होता. प्रचंड ज्ञानाचे भांडार असलेली ‘श्रीगणेश’ ही संकल्पना मुलांनी फक्त कार्टून म्हणून बघावी, याचा मला मनोमन खूप खेद वाटत होता...
**********
पुरुषबीज व स्त्रीबीज संयोगातून गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते. स्त्रीचा मासिक रजःस्राव बंद होतो व पुढे त्यावरच नऊ महिने गर्भाचे पोषण सुरू राहते. जो स्त्राव दरमहा शरीरातून ‘मल’ रूपात बाहेर पडणार असतो, त्यावरच गर्भाची वाढ होते. म्हणजेच आपला जन्म हा असा ‘मळामधूनच’ होतो. चिखल, दलदलीतून ज्याप्रमाणे सुरेख कमळ फुलून येते, तसेच रजःस्रावाच्या पोषणामुळे ‘सजीव देह’ जन्माला येतो. नवनिर्मिती ही अशी दोषांना पचवूनच होत असते असेही म्हटले तरी चालेल. या नवनिर्मितीच्या- सर्जनाच्या प्रक्रियेत दोष पोसले जात नाहीत तर दोष पचवले जातात! दोघांमधलेही गुण शोषून घेऊन अस्सल नवी कलाकृती निर्माण होते. दोषांना संपूर्ण पचनी पाडून तयार होणारी ही कलाकृती संपूर्ण निर्दोष, निर्व्यंगी व आनंददायी असते. पार्वतीच्या ‘अंगाचा मळ’ या संकल्पनेत ‘मळा’मधून निर्माण होणार्या आपल्या सुंदर अशा जन्माचे एवढे मोठे शास्त्र समावले आहे! ‘पार्वती’ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ लक्षात घेतल्यास पार्वती म्हणजे पर्वतापासून बनलेली- पर्वताची लेक- तिच्या अंगाचा मळ म्हणजे साक्षात मळ नसून तीही फक्त मातीच व या मातीपासून तयार केलेली मूर्ती म्हणजे गणपती असाही खूप समर्पक अन्वयार्थ लावता येतोच. फक्त सर्वसामान्यांना समजून घेत, मौखिक परंपरेने, रंजक व कथात्म पद्धतीने असे काही सांगितल्यामुळे ते चमत्कृतीपूर्ण वाटते. वास्तविक पाहता हे सारे जगण्याचे शास्त्र आहे, हे मात्र खरे!
सर्जनाची किंवा नवनिर्मितीची साक्षात मूर्ती म्हणजे माती! माती हीच धारणा! रुजायचं, वाढायचं, लोप पावायचं, नाळ पुरायची, नाळ जोडायची- सगळा संबंध मातीशीच! गणपतीची मूर्ती मातीची असण्यामागे हाच सर्जनशील विचार आहे. गणपतीच्या पूजेमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी दूर्वेने तूप लावून त्याठिकाणी हाताने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटला जातो. मूर्तीत प्राण प्रविष्ट झाले आहेत अशी श्रद्धापूर्वक कल्पना करून पुढचे विधी केले जातात. मला ‘प्राणप्रतिष्ठा करणे’ ही संकल्पना खूपच भावते. वाटतं की, आपलं शरीर हीसुद्धा एक मातीचीच मूर्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पाच महाभूतांपासून तयार झालेला हा देह शेवटी मातीस्वरूपच होणार आहे. रोज वेगवेगळे ताणे-बाणे निभावणारं हे शरीर आपण रात्री झोपेच्या स्वाधीन करतो. या जगापासून वेगळे होतो. एक प्रकारची शून्यावस्था झोपेत आपल्याला येते. सकाळी उठल्यावर या शून्यातून पुन्हा विश्व उभारायचं असतं. या धकाधकीच्या काळात जगताना गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचं हे सुंदर कर्म प्रतिकात्म रूपात आपणही रोज सकाळी करावं...
पहाटे जाग यावी. उठावं. अंथरुणावर डोळे मिटून शांत बसावं. हृदयाच्या ठिकाणी हात ठेवावा. हृदयाला सांगावं की, ‘‘तू जिवंत आहेस. मला जिवंत ठेव. बधीर, बोथट होऊ नको. सभोवतीचं जग संवेदनशीलतेने टिपून घे. मी ‘माणूस’ म्हणून जिवंत आहे- हे सिद्ध कर!’’
‘माणूस’ म्हणून जगताना मानवी मनाची संवेदनशीलता या देहामध्ये रोज अशी प्रतिष्ठित करायला हवी. केवळ खाणं, पिणं, चालणं, फिरणं इ. पद्धतीने सगळेच चराचर इथे जगतात. अशा रूढार्थाने सगळेच तसे जिवंत असतात. पण आपण ‘माणूस’ म्हणून काही वेगळ्या प्रकारे जिवंत असायला हवे. वेगळे ‘जीववंत‘ असायला हवे. वेगळे जगायला हवे. आपल्या ठिकाणी असणार्या हृदयाला विविध बर्यावाईट संवेदनांची उत्कट जाणीव असायला हवी. सुख-दुःखांचे नानाविध पैलू त्याला कळायला हवेत. दुसर्याच्या सुखाने सुख व दुःखाने दुःख व्हायला हवे. दुसर्याला दुःख देऊन सुखी व दुसर्याला सुखी बघून हे हृदय दुःखी होता उपयोगी नाही. सुख-दुःखांची, आशा-निराशेची सह-अनुभूती या हृदयाला यायला हवी! रोज सकाळी हृदयाच्या ठिकाणी अशी प्राणप्रतिष्ठा करून ‘स्वतः’ला असे जिवंत ठेवायला हवे. माणुसकीच्या धर्माने याच उदात्त उद्देशाने ‘मूर्तीपूजा’ सांगितली आहे का? मातीच्या मूर्तीत केलेल्या प्राणप्रतिष्ठेने आपले हृदय, सर्व संवेदना व आत्मिक शक्ती जागृत झाली तरच ती पारदर्शक व डोळस श्रद्धा म्हणता येईल; अन्यथा संवेदनांचे डोळे बंद करून केलेली भक्ती व ठेवलेली श्रद्धा दोघीही अंध होऊन नुसत्याच चाचपडत राहतात. स्वतःचेच अस्तित्व उत्सवाच्या बाजारात शोधत राहतात. आज जिथे-तिथे याची प्रचिती येतेच आहे...
अर्थात संवेदनशील मन हवं, तसा बुद्धिमान मेंदूही हवा. आयुष्याचं हे तारू तरंगत जायचं तर खाली पाणी हवं आणि वर वाराही हवा! पण माणसाचा बुद्धिमान मेंदू जणू शाप मिळाल्यासारखा षड्रिपूंनी सहज ग्रासू शकतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या सहा शत्रूंनी तो ग्रासला जातो व तिथेच सगळे अनर्थ ओढवतात. सर्व कला, संवेदना, भावना यांचे अधिपती असणार्या हृदयाला संयमी, विवेकी व स्थिर बुद्धीची (मेंदूची) जोड असायला हवी. कल्याणकारी सांबशिवाने याचसाठी माणसाचं हे विकारी व विषारी मस्तक उडवून त्याजागी हत्तीचं मस्तक आणून जोडलं आहे! हत्ती हा खूप बलाढ्य असूनही संपूर्ण शाकाहारी व प्रचंड बुद्धिमान प्राणी. त्याची बुद्धी षड्रिपूंनी ग्रासली जात नाही. भुकेने व्याकूळ झाला तरी तो एखाद्या प्राण्याला तुडवून मारून खात नाही. त्याची केलेली फसवणूक तो कधीच खपवून घेत नाही. तो लाचार होत नाही. तो मदांधही होत नाही. तो अन्याय करत नाही आणि अन्याय सहनही करत नाही! अशा प्रकारे साक्षात आदिमातेने स्वतःचे आयुष्य झिजवून घडवलेले बळकट शरीर, तिचेच कनवाळू संवेदनाक्षम मन आणि साक्षात जगद्पित्याने बहाल केलेले विवेकाचे मस्तक व कल्याणकारी बुद्धी अशा सुरेख संगमाने आदिदेव ठरलेला हा शिवपार्वतीचा पुत्र गणपती म्हणूनच सुखकर्ता व दुःखहर्ता ठरतो.
- गणपतीची सिरीयल बघणार्या मुलांच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने हा खूप सुंदर अन्वयार्थ उलगडला याचा आनंद झाला खरा, पण दुर्दैवाने आज अशी विचित्र परिस्थिती आहे की, या विघ्नहर्त्या गजाननाची ओळख मुलांना ‘एलीफंट गॉड’ अशी करून दिली जाते. फनी कार्टूनच्या रूपात पौराणिक सिरीयल्स दाखवल्या जातात. आणि मग ‘पार्वतीच्या अंगावर इतका मळ साठला होता की काय?’ अशी प्रतिक्रिया हे बालगणेश उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना दिसतात. मुळातले उद्देश, खरे ज्ञान मागे पडते.
खरे तर हा माय-लेकराच्या मायेचा गौरी-गणपतीचा सण. पण आज परस्परविरोधी चित्रे अवतीभवती दिसताहेत. माता वैरीण, पुत्र शत्रू बनतो आहे आणि पिता अत्याचार करत सुटला आहे. प्रचंड विरोधाभासाच्या या चित्रात कुटुंबव्यवस्थाच डळमळीत होऊन कोलमडताना दिसते आहे. नाती दुरावताहेत. सांस्कृतिक चंगळवाद फोफावतो आहे. साहजिकच नात्यांची वीण घट्ट करणारे सांस्कृतिक सोहळे, रीतीरिवाज, सणवार झपाट्याने बदलताना दिसताहेत.
संपूर्ण बदललेला आजचा गणेशोत्सव हे या बदललेल्या विचित्र परिस्थितीचेच एक प्रतिबिंब आहे, हे कटू सत्य आहे. आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत. या मातीशी असणारी नाळ तोडत चाललो आहोत. फार दूर कशाला, आता आपण अगदी जवळचेच उदाहरण घेऊ. खरं तर ‘मातास्वरूप मातीची मूर्ती’ तयार करून तिचा गौरव करून पुजण्याचा हा सण. तर आपण या धारणेलाच फाटा देत आहोत. माती सोडून अन्य कोणत्याही पदार्थांपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती हे कसले प्रतीक आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, सिमेंट, वाळू, दगड, खडी कमी पडते म्हणून की काय बाटल्या, काचा, मणी, नाणी, लाकूड-फाटा, दाणा-गोटा इथपासून ते धागेदोरे, सुंभ, सुतळी, वायरी, तारांपर्यंत आणि सोडावॉटरच्या बुचांपर्यंत कसलीही गणेशमूर्ती आपण बनवतो. रबर, प्लॅस्टिक, कचकडी सामानाची खैरात करतो. ‘इको फ्रेंडली गणेश’ करण्यासाठी कापूस, काथ्या, चिंध्या, कागदाचा लगदा, पुठ्ठे, पेपर, गोणपाटं, बारदानं, बांबू, पिडे, सोडणं, चुडतं, बोंडं, केसरं नि तुरे... काही म्हणता काही आपण शिल्लक ठेवत नाही. वरून इलेक्ट्रिक दिव्यांचा झगमगाट, कर्कश संगीत व फटाक्यांचा धुमाकूळही सुरू असतो. स्पर्धा, खाणे, कपडे खरेदी, मौजमजेची जत्रा असते. सोडती, लॉटर्या, वर्गण्या नि खंडण्या लुटल्या जातात. रस्त्यावर तर रस्त्यावर, गटारावर तर गटारावर, घाणीच्या नाल्यावर तर नाल्यावर, साचलेल्या पाण्यात, टाकीत, नदीत, ओढ्याकाठी, बाजारात, चौकात, स्टँडवर, तिस्कावर, गल्लीबोळात, धुळीत, वाळूत वाट्टेल तिथे गणेशमूर्ती पूजली जाते. होय. हीच वस्तुस्थिती आहे....!!!
‘‘या सर्वामधून कलेची जोपासना होते. समत्व, प्रेम, श्रद्धा, बंधुभाव वाढतो. एक निखळ आनंद मिळतो. दुःख झेलायची ताकद येते. जगण्यातलं सौंदर्य वाढतं’’- हे सगळं खरं आहे. सगळं सगळं मान्य आहे. पण या गोंडस रूपापेक्षा आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत, हे विचित्र चित्र अधिक खरं आहे. आणि यातून होणार्या मिळकतीपेक्षा होणारी ही हानी खूप मोठी व अधिक धोकादायक आहे. प्रचंड उत्साहाने आणि अतिरेकी जल्लोषात निघणार्या, प्रदूषण करणार्या गणेश विसर्जन मिरवणुका, त्यात होणारी चेंगराचेंगरी, गुंडगिरी आणि हकनाक गमावलेले जीव हा तर सगळ्याचा कळस ठरतो आहे!
**********
हो, हे सगळं खरं आहे. पण तरीही हे सगळं होतच राहील! काळाच्या अथांग दर्याच्या उदरातून भल्या-बुर्याच्या लाटा येत राहतील. वाईट-साईट कधी ना कधी किनार्याला लागेल. चांगल्याचे मोती होेऊन बाहेर पडतील. तण फोफावत राहील. रान माजेल. पण हा दाह आशेच्या-श्रद्धेच्या दूर्वेने शांतही होत राहील. दोन्हीही या मातीचेच पुत्र- पण कार्तिकेय विनाकारण वळसा घालून भक्ती करेल. गणपती हुशारीने प्रदक्षिणेवर श्रद्धा ठेवेल. लिहिणारे लिहीतील, वाचणारे ‘वाचतील!’ चिखल करणारे चिखल करतील. मूर्ती करणारे मूर्ती करत राहतील... सद्विचारांचे गणपती अविचारांच्या उंदरांवर अंकुश ठेवत राहतील....
कोणी काहीही म्हणो. भक्तीचा शिमगा होवो किंवा चैनीची दिवाळखोरी होवो, समृद्धीचे श्रावण बरसोत किंवा अर्थव्यवस्थेवर संक्रांत येवो- तुमची आमची ‘चवथ’ मात्र धूमधडाक्यात साजरी होईल.
माटोळीचा बाजार भरेल. फळफळावळ, खाणं-पिणं, खरेदीची झुंबड उडेल. बाजार फुलेले. ‘वजी’ पाठवली जातील. नेवर्या, मोदक, लाडू, फराळ, रंगरंगोटी, मारांदे, पेटारे, फोली-पताका, डेकोरेशन्स, मखरं, जागरणं, हारतुरे... लयलूट होईल. तेल, वात, धूप, दीप, रांगोळ्या सजतील. ‘तये’च्या उपासात गणपती घरी येईल. ‘चवथी’च्या पूजेला भट दारात येईल. घाई करेल. गणपती बसवेल. झांजा, आरत्या, घुमटं घुमतील. भजनाच्या फैरी झडतील. खाणं, जेवणं, फिरणं, पूजा-नैवेद्य-वाडी, नवस-सायास, भेटी-गाठी चंगळ होईल. पाचव्या-सातव्या दिवशी ‘गवर’ येईल. देवीची भाजी-भाकरी, ‘हौशे’ गावभर वाटले जातील. फुगड्या-फेर-गाण्यांमधून ‘माये’ला सुखं-दुःखं सांगितली जातील... बाप्पाचा बाप, मायेची थोरली माय आणि त्यांचा लाडका ‘बाळ’ गणेश आशीर्वादाचा हात पाठीवरून फिरवत राहील... साठां उत्तरांची ही कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण होईल! बघता बघता बाप्पा निघायची तयारी करतील... एका डोळ्यात सुखाचा पूर, दुसर्या डोळ्यात विरहाची नदी आणि अंतःकरणात समाधानाच्या लहरी उठत राहतील आणि आतून साद येत राहील, गाज उठत राहील- ‘गणपती बाप्पा मोरया’ या उत्स्फूर्त उद्घोषाची!