बालपणची चवथ

भिकू पै आंगले

श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे तीन महिने म्हणजे हिंदूच्या सणांची आणि भजन, कीर्तन, प्रवचन यांची उधळण असते. नागपंचमीपासून या उत्सवांना प्रारंभ होतो. चतुर्थी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज हे हिंदूंचे महत्त्वाचे सण. त्यापैकी एक गणेश चतुर्थी होय. हा सण म्हणजे आनंदाची कारंजी आणि एकत्र कुटुंबाच्या सहजीवनाचा संस्मरणीय क्षण. कुठून कुठून आपल्या मूळ घराकडे - नव्हे मठीकडे लोक धाव घेत एकत्र कुटुंब पद्धतीचे तोरण आपल्याला महाद्वाराला लावतात. आपल्या जीवनातील ते दिवस गावाकडे येण्यासाठी राखून ठेवतात. आपल्या मुलांना धार्मिक संस्कृतीची जाण आणि कुटुंबातील इतर नात्यागोत्यातील व्यक्तींचा परिचय देत तो वाढीला लावण्याचा श्रीगणेशा असतो.
अशा घरात कुटुंबातील एक व्यक्ती आपला संसार थाटून असते. बाकीची माणसे आपापल्या कामानिमित्त वा नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असतात. तेव्हा सणासाठी येणाऱ्या सर्वांची व्यवस्था दोन चार दिवसांसाठी त्या व्यक्तीला करावी लागते. घर बंदच असेल तर एक दोन कुटुंबे दोन - चार दिवस आधी येऊन चतुर्थीच्या सणाची सर्व व्यवस्था करीत असतात. घराच्या साफसफाईपासून ते हरितालिका, गणपती आणि ऋषीपंचमी यांच्या पूजेची, स्वयंपाक आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू कुटुंब प्रमुखांना तयार ठेवाव्या लागतात किंवा त्या कुटुंबातील एक व्यक्ती आळीपाळीने ती जबाबदारी स्वीकारून झालेला सारा खर्च वाटून घेतात. पण प्रतिवर्षी गणेश चतुर्थी यथाशक्ती, योग्यप्रकारे थाटामाटात साजरी झालीच पाहिजे याबद्दल निश्चिती असते. ते एक एकत्र कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन असते असे म्हटल्यास वावगे होऊ नये. लहान मुलांचा तर तो आनंदोत्सव असतो. घरातील आणि शेजाऱ्यांच्या मुलांचा तो मित्रमेळावा असतो.
माझ्या जीवनातील तो सण म्हणजे मला उत्साहाचा, कार्यशक्तीचा आणि जिभेचे चोचले पुरवण्याचा एक उत्कृष्ट प्रसंग वाटायचा. एरव्ही टाळाटाळ करणारा मी वडील माणसांच्या हाकेला "ओ' देऊन कार्यतत्परता दाखविण्यास त्यावेळी सिद्ध होत असे. "जयराम' (माझे गृहनाम) अशी हाक आली रे आली की लगेच हुकूम ऐकायला सिद्ध होत असे. काम बहुधा बाजारात जाऊन काही जिन्नस आणण्याचे असे. मी धावत जाऊन पळत येत असे, कारण माझ्या गैरहजेरीत इतरांना (बच्चे मंडळीला) खाऊ मिळाला तर मी त्यापासून वंचित होऊ नये हा त्यामागचा हेतू असायचा. चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या कुटुंबांबरोबर आलेली मुले आणि वास्तव्य करून असलेली मुले यांची एक फौजच होत असे. तेव्हा फराळाच्या विविधतेची चैन असायची. गोडधोड खाण्यासाठी आमच्या जिभा चटावलेल्या असायच्या.
खरी मजा यायची ती मखर सजविण्याची. गतवर्षी केलेली सजावट - मु"यत्वेकरून कागद खरवडून सांगाडा स्वच्छ करायचा. रंगीबेरंगी, नाना तऱ्हेच्या छटा असलेल्या खास कागदांनी ते मखर पुन्हा सजविण्यासाठी एका मोठ्या व्यक्तीच्या साहाय्याने आम्ही कागद कापून ते खास तयार केलेल्या पिठारी गोंदाने चिकटवीत असू. त्या मखराचा सांगाडा चौकोनी, त्रिकोणी वगैरे नाना आकारांनी तयार केलेला असायचा. त्या मापाने कागद कापणी झाल्यावर त्यावर शोभा येण्यासाठी पशू, पक्षी किंवा वेगवेगळ्या देवांची आयुधे असलेली चित्रे चिकटवली जायची. तसेच गणपतीच्या मूर्तीची बैठक (चौरंग) आणि तो वर ठेवण्यासाठी टेबल हे देखील सजवले जायचे.
एकदा मखराचे, बैठकीचे आणि टेबलाचे काम झाले की आम्ही माटोळी सजवण्यासाठी आंब्याच्या डहाळ्या, त्या ऋतूमधील भाजी, फळे, बोंडासह केळीचा घड, मोठ्यात मोठा न सोललेला नारळ, सुपारीचा लोंगर इत्यादी जिन्नसांची आवश्यकता आम्हांला वाटे. घरी या वस्तू उपलब्ध नसतील तर त्या वाड्यावरील घरातून मिळवत असू आणि तेही सहजपणे न साधल्यास चोरी करून आणल्यास त्यावेळी आम्हाला पाप लागणार नाही अशी आम्ही मनाची समजूत करून घेत असू. उद्देश एकच. यंदाची गणेश चतुर्थी साजरी करताना कोणतीही कमतरता भासू न देण्याची जबाबदारी आम्ही मुले घेत असू. याप्रसंगी एकमेकांना कामामध्ये मदत करण्यासाठी प्रत्येकजण तयार असे आणि इथेच "एकमेकां साह्य करू। अवघे धरु सुपंथ' याची सत्यता पटे.
हरितालिकेच्या दिवशी सकाळीच आम्हा मुलांची "पत्री' आणण्यासाठी धावपळ होत असे. आजूबाजूच्या डोंगर टेकड्या आम्ही पालथ्या घालीत पूजेसाठी लागणारी पत्री आणून वडील माणसांची आणि घरातील बायकांची वाहव्वा मिळवीत असू. त्याचा परिणाम म्हणजे रग्गड खायला मिळायचे. सायंकाळच्या वेळी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी धडपड असे.
सर्वांनी डोक्यावर टोपी चढवूनच मूर्ती आणायला जायचे अशी सक्ती असे. त्यावेळी बरोबर तळी (तांदूळ, नारळ, पान, सुपारी आणि सव्वा रूपया) हीच त्या मूर्तीची मूर्तिकाराला देण्याची प्रथा मला आजही आठवते. मूर्तीकार मूर्तीचे पैसे घेत नसे. ती एक गणेश सेवा ते मानीत. तीन चार किलोमीटर चालत आम्ही त्या मूर्तिकाराकडे जात असू. तो मूर्तीकार पाच - सहा कुटुंबांसाठीच मूर्ती बनवत असे. तो त्याचा व्यवसाय नव्हता. भुसारी दुकान (घरगुती गरजेच्या वस्तूंचे दुकान) हा त्याचा व्यवसाय आणि आतल्या खोलीत ही त्याची गणेश सेवा चाले. मूर्ती आणताना आत्ताप्रमाणे मिरवणूक वगैरे नसायची. आम्हा मुलांकडे टाळ, झांज वगैरे वाजवायची आयुधे असायची. घरी आल्यावर सुहासिनी मूर्तीला "रहाट' (उथळ थाळ्यात कुंकवाचे पाणी) दाखवून तिचे स्वागत केल्यावर पूजेच्या जागेवर तिची स्थापना खाली तांदूळ आणि चेहऱ्यावर नवीन कापड टाकून केली जात असे. ते कापड दुसऱ्या दिवशी यजमान पूजेला बसण्यापूर्वी काढून मूर्तीचा चेहरा इतरांच्या दर्शनासाठी खुला ठेवला जात असे. मूर्ती घरी आणल्यावर फटाके वाजवून स्वागत केले जायचे. ते फटाके फक्त मोठी मुले किंवा मोठी माणसेच उडवीत. आम्हा मुलांच्या वाट्याला बिनधोक्याचे "लवंगी' फटाके यायचे.
आमच्या काही कुटुंबांमध्ये मूर्तीबरोबरच कागदाचा गणपती पूजला जातो. अजूनही ती प्रथा चालू आहे. त्याचे कारण म्हणजे आम्ही मूळचे असोळणे (सासष्टी) गावचे. तेथे पोर्तुगिजांचा त्यांच्या अमदानीत जबरदस्त पगडा. ख्रिश्चन समाज त्यांनी तेथे हिंदू लोकांना बाटवून वाढवला. अवघी काही हिंदूंची कुटुंबे तेथे भीतीग"स्त अवस्थेत जीव मुठीत धरून राहत होती. त्यांना देवदेवतांच्या पूजा - अर्चा करण्यास मनाई होती. निरांजने जाऊन तेथे मेणबत्त्या आल्या होत्या. अजूनही असोळणे गावात उत्सवाच्या वेळी मेणबत्त्यांची आरास केली जाते.
अशा कुटुंबांमध्ये गणेशचतुर्थीच्या वेळी मूर्तीच्या ऐवजी गणपती, शंकर व पार्वती यांची चित्रे एका मोठ्या लाकडी पेटीच्या झाकणाच्या आतील बाजूस चिकटवली जात असत. ओसरीवर एक वडीलधारी व्यक्ती राखणदारासारखी बसून राही. आत पूजा चालू असायची. अशावेळी सैनिकांची गस्त असली की आत तशी वर्दी जायची. लगेच ती पेटी बंद करून कुलूप ठोकले जाई. तिन्ही देवता बंदिस्त. सैनिक दृष्टीआड झाल्यावर पुन्हा पूजा चालू. त्यामुळे आज आमच्या गणेश चतुर्थीच्यावेळी मूर्तीबरोबर कागदी गणपतीची पूजा उघडपणे केली जाते.
पूजेसाठी त्या काळी भटजींची आवश्यकता भासतच असे, अशी परिस्थिती नव्हती. प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती संपूर्ण शाकाहारी असायची. त्याच्याकडेच दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक विधी पार पाडण्याची जबाबदारी असे. त्या व्यक्तीला तसे शिक्षण दिले जात असे. आता तर, गेल्या काही वर्षांपर्यंत हाती पुस्तक (चातुर्मास - पूजा अर्चा) घेऊन मी पूजा सांगत असे आणि माझा मोठा भाऊ पूजा बांधीत असे.
हे सगळे चालू असताना आम्हा बालगोपाळांची नजर आणि जीभ स्वयंपाकघराकडे असायची. विशेषत: गोडधोड खाण्यामध्ये आमची स्पर्धा असायची. पक्वान्नांवरील पुरणाच्या करंज्यांवर आम्ही हात सोडून ताव मारीत होतो. ढेकरावर ढेकर येईपर्यंत आम्ही पोटपूजा बांधीत होतो. सायंकाळी तयार केलेल्या करंज्या वाड्यावरील ख्रिश्चन समाजातील कुटुंबांकडे भेट म्हणून आम्हा मुलांकडून पोचविल्या जात असत. ही सामाजिक एकात्मता त्यावेळी होती. आज तिला ओरड करूनही तडा गेला आहे.
सर्वात गंमत म्हणजे त्या दिवशीचे "चंद्रदर्शन'. आम्हा मुलांना आवर्जून सांगितले जाई, "हे बघा, आज चंद्राकडे पाहू नका हं. पाहिलात तर आळ येतो म्हणे' आणि काय सांगू हटकून आमची दृष्टी चंद्राकडे जायची! सांगितले नसतं तर कदाचित जाणारही नव्हती. त्यावरून फार पूर्वी मी कोकणातील एक घरगडी नाच करताना ऐकलेले गाणे आठवले. त्यातील शब्दात थोडी घसरण झाली असेल पण आशय ध्यानी घ्यावा.
"उंदरावरोनी गण्या पडला रे
तेला पाहून चंद्र हांसेला रे - चंद्र हांसेला
गण्याने तेला शाप दिधला रे - शाप दिधला
तुला जो पाहील माझ्या दिसाला रे - माझ्या दिसाला रे
बालंट येईल तेच्या वाट्याला रे - तेच्या वाट्याला'
त्या लहानपणात पुढचं कोणी पाहिलं? आळ आला की बालंट आले की काहीच नाही हे त्या गण्यालाच माहीत!
गणपती विसर्जनाच्या वेळी मात्र आम्हांला फार वाईट वाटायचे. रडूच यायचे! गणपतीची पूजेची बैठक रिकामी झालेली पाहून घरचेच एखादे माणूस गेल्यासारखे वाटे आणि डोळे अश्रूंनी भरून जायचे आणि त्याहीपेक्षा मी व्याकूळ होत असे ते आलेली सारी कुटुंबे परतीच्या वाटा धरीत आणि सोबत माझे सवंगडी जात तेव्हा. "गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या' असाच निरोप मी जाणाऱ्या माझ्या साऱ्या कुटुंबीयांना देत असे. पुढे कित्येक दिवस ते आनंदाने घालवलेले क्षण माझ्या स्वप्नात यायचे आणि त्या स्मृतींत मी खूपच रमून जात असे!

No comments: