सार्वजनिक गणेशोत्सव

प्रा. रमेश सप्रे



‘लोकमान्य’ ही पदवी टिळकांना पद्मश्री, पद्मभूषणसारखी ‘पद्मखिरापत किंवा खैरात’ म्हणून सरकारनं दिली नव्हती. कारण त्यावेळचं इंग्रजांचं सरकार. या ‘भारतीय असंतोषाच्या जनका’ला अशी काही पदवी देणं शक्यच नव्हतं. बहुजन-सामान्य-लोकांनीच आपल्या या लाडक्या नेत्याला ‘लोकमान्य’ म्हणायला सुरुवात केली होती. कारण टिळकांचं सर्व कार्यच- म्हणजे लेखन, भाषण, जीवन- लोकांना मान्य होतं. कारण त्याचा हेतू आणि परिणाम सार्‍यांच्या हिताचाच असणार होता. ‘केसरी’ वृत्तपत्रातील अग्रलेखच नव्हेत तर त्यांची अन्य ग्रंथसंपदाही लोकमान्य होती. त्यांचं कर्तृत्व-वक्तृत्व-नेतृत्व सारं लोकांना शिरोधार्य होतं. म्हणून टिळक हे लोकमान्य!
लोकमान्यांच्या भारतीय जनतेच्या कल्याणभावनेतून दोन महत्त्वाचे सण-समारंभ जन्मास आले. सार्वजनिक गणेशोत्सव नि शिवजयंती! स्वराज्य हा त्यांचा केवळ जन्मसिद्ध अधिकारच नव्हता तर त्यांचा ध्यास होता नि श्‍वासही होता. त्यामुळे भारतीय जनता केवळ गुलामीतून मुक्त व्हावी एवढाच त्यांचा प्रयत्न नव्हता तर सामाजिक एकता- भावनिक एकात्मता या सूत्रात समाजातील सर्व गट-पंथ-संप्रदाय बांधले जावेत हाही उद्देश त्यांच्या सर्व कार्यक्रम-उपक्रमांत असायचा.
छत्रपती शिवराय हा आपला मानबिंदू आहे, या विचारातून त्यांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. देशभक्तीचा स्फुल्लिंग लोकांच्या मनामनात चेतवण्यासाठी त्यांचा हा प्रयोग होता. केवळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा देत संकुचित राजकारण लो. टिळकांच्या कल्पनेतसुद्धा नव्हतं, तर आत्मबलिदानासाठी समाजाच्या सर्व थरांतील लोकांना त्यांना आवाहन करायचं होतं. विशेषतः युवावर्गाला.
त्याचवेळी या ‘गीतारहस्य’ जाणणार्‍या व सर्वांना सांगणार्‍या द्रष्ट्या प्रेषिताच्या लक्षात आलं की धर्म नि त्याचं अंग असलेले सण-समारंभ-सोहळे हा भारतीयांचा प्राण आहे. विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे ‘भारत हा धर्मप्राण देश आहे. इथे धर्माविरुद्ध चळवळ करावयाची असेल तरी त्याचा आधार धर्मच असावा लागेल.’ या दृष्टिकोनातून लो. टिळकांनी ‘जनगणमन’च्या खर्‍या अधिनायकाचा म्हणजे गणेशाचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. त्यावेळच्या नेत्यांचं वैशिष्ट्य होतं- आधी केलं, मग सांगितलं. समर्थ रामदासांच्या शब्दांत- ‘क्रिया करून करवावी बहुतांकरवी|’ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा ठरवल्यावर- राहणी (स्वतःचं उदाहरण)- वाणी- लेखणी या त्रिवेणीच्या माध्यमातून प्रचार-प्रसार सुरू झाला.
लो. टिळकांच्या मनात असलेला सार्वजनिक गणेशोत्सव नि आजचा उत्सव यात खूप फरक आहे. लोकमान्यांचा उत्सव स्वप्नवत् वाटावा इतकं आजचं वास्तव भयानक आहे. पण एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात ठेवली पाहिजे की काही वर्षांपूर्वी असलेलं उत्सवाचं बरंचसं बकाल, अभद्र रूप हळूहळू सुधारतंय. याविषयी सहचिंतन श्रीगणेशाच्या प्रेरणेनंच करूया. चिंतनासाठी एकवीस मुद्दे घेऊया. एका परीनं गणेशाला अर्पण केलेली ही दूर्वांची जुडीच समजूया.
श्रीगणेशमूर्ती ः पूर्वीही सार्वजनिक गणेशाची मूर्ती मोठी असायची. पण आजच्याएवढ्या अजस्त्र मूर्ती तेव्हा नसत. आज इलेक्ट्रिसिटीच्या तारा दूर करून, वर उचलून अशा मूर्तीची मिरवणूक काढावी लागते. पूर्वीच्या जवळजवळ सर्व मूर्ती शाडूच्या (मातीच्या) असत. त्या जलाशयात पूर्णपणे मिसळून जात. आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अगदी घरीसुद्धा बसवल्या जातात. त्या पाण्यात विरघळत तर नाहीतच, पण इतर समस्या मात्र निर्माण करतात. दिसतात रेखीव नि रंगसंगतीही सुंदर असते, पण त्या निसर्गस्नेही नसतात.
श्रीगणेशाचं आगमन ः ही मिरवणूक पूर्वी आजच्याएवढी भव्य नसायची. पण वाद्यांच्या गजरात गणरायाला आणणं हा सात्त्विक अनुभव असायचा. आज मात्र ढोल-ताशांचा हृदयाचे ठोके चुकवणारा गडगडाट, फटाक्यांच्या माळांचा कानठळ्या बसवणारा आवाज, समोर नाचणार्‍यांचा कर्कश्श गोंगाट यांनी गणरायाचं आगमन हा फारसा सुखद प्रकार नसतो. छोट्यामोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती कमी-जास्त प्रमाणात पण अशा वाजत-गाजत येतात.
श्रीगणेशपूजन ः रोज पूजा आजही केली जाते. सर्वच मोठ्या प्रमाणावर असल्याने ही पूजा पूर्वीप्रमाणे षोड्‌शोपचारांनीच होते. फक्त ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज, नैवेद्याच्या पदार्थांची गर्दी, भक्तांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे या नित्यपूजेतील भाव, उत्कटता, आर्तता कमी होत चाललीय. आर्त भावाशिवाय म्हटली जाणारी गदारोळी समूहआरती ही काहीशी कर्णकटू व कानाच्या पडद्यांना त्रासदायक असते.
श्रीगणेशविसर्जन ः सलग आवाहन-पूजन-विसर्जनाचा विचार व्हावा म्हणून हा पैलू आधी घेतलाय. विसर्जनाची मिरवणूक हा पूर्वी- म्हणजे अगदी चाळीसपन्नास वर्षांपूर्वी- हृदयस्पर्शी सोहळा असायचा. गणरायाला दिला जाणारा निरोप; त्यावेळी त्याच्यासमोर केले जाणारे दांडपट्टा, बोथाटी यांसारखे मैदानी खेळ; केली जाणारी लोकनृत्ये; दिल्या जाणार्‍या घोषणा; रस्त्यावर जागोजागी केली जाणारी आतषबाजी; सामाजिक एकात्मतेचा विशिष्ट संदेेेेेश देणार्‍या कमानी; रात्री प्रकाशासाठी पेटवलेल्या गॅसबत्त्या अन् त्या डोईवर घेऊन जाणार्‍या व्यक्ती हे सारं रोमहर्षक, प्रेक्षणीय नि संस्मरणीय असायचं.
आजची विसर्जन मिरवणूक विद्युत रोषणाई, चाकावर फिरणारे चालतेबोलते चित्ररथ, निरनिराळ्या प्रायोजकांनी उभारलेल्या नि त्यांच्या जाहिरातींनी सजवलेल्या मोठमोठ्या कमानी (हे प्रायोजक बर्‍याच वेळा तंबाखू, गुटखा, मद्य यांचे निर्माते असतात), ‘बँजो पार्टी’ नावानं ढणढण वाजणारं कर्णकर्कश्श संगीत; वाहतूक, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधनं, विद्युतपुरवठा, स्वच्छता व आरोग्य अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांवर पडणारा ताण; तासन्‌तास चालणारा हा अंगावर येणारा विसर्जन सोहळा हे सारंच भयंकर वाटतं. पूर्वी गणपतीला निरोप देताना हुरहूर वाटायची, डोळे पाणवायचे. आज बहुतेकजण ‘गेले बुवा गणपती!’ असं म्हणून सुटकेचा निःश्‍वास सोडतात. कारण आधीचे काही दिवस सार्‍यांची अवस्था ओलीस ठेवलेल्या व्यक्तीप्रमाणे असहाय झालेली असते. लो. टिळकांना स्वप्नातही असा गणेशोत्सव अभिप्रेत नसावा.
निधिसंकलन ः लोकांनी ‘स्वेच्छेनं-स्वखुशीनं’ दिलेल्या वर्गणीतून पूर्वीचा सार्वजनिक गणेशोत्सव थाटात साजरा होत असे. त्यावेळचे उत्सवाचे अर्थशास्त्र वेगळे होते. म्हणजे उत्सवांना अर्थही होता नि शास्त्रही! आज एकूण सर्व गणेशमंडळांची महाराष्ट्रातली एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असेल. लाखो रुपयांच्या मूर्ती, तितकाच खर्च करून मूर्तिमंडप नि त्याच्या कितीतरी पटीनं खर्च करून उभारलेले देखावे! हे सारं खरं असल्यासारखं भासतं. एरव्हीचे रहदारीनं वाहणारे बरेचसे अस्वच्छ रस्ते एखाद्या स्वप्ननगरीसारखे चकचकीत बनवतात. झळाळून उठतात.
एवढा पैसा खर्च करायचा म्हणजे त्याहून अधिक जमा करायचा. यासाठी वर्गणी- तीही सक्तीची- म्हणजे एकप्रकारची खंडणीच! मध्यमवर्गीयांना, गरिबांना परवडणार नाही एवढ्या रकमेच्या पावत्या आधी तयार करूनच फाडल्या जातात. आपल्या व घराच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. जनशक्ती व लोकसत्ता यांच्यापुढे शहाणपण कुणाचं चालणार?
अक्षरशः भुईछत्रांप्रमाणे (मशरूम्स) दरवर्षी उगवणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अन् त्यांच्या लहानमोठ्या तथाकथित कार्यकर्त्यांकडून सक्तीनं केलेलं निधिसंकलन, हा सारा प्रकार बेहिशेबी कारभाराचं उदाहरण असतं. हिशेब सादर केले जातात, पण त्यात मोठ्या प्रमाणावर गोलमाल प्रकार घडलेले असतात. सामान्य माणसांच्या हातात फक्त गणरायाची प्रार्थना करणं एवढंच असतं.
कार्यक्रम ः लो. टिळकांच्या गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचे कार्यक्रम हा अक्षरशः प्राण होता. हे कार्यक्रमही मनोरंजनाच्या माध्यमातून सादर केलेले असत. काही व्याख्यानं, चर्चा, परिसंवाद मात्र बर्‍यापैकी बौद्धिक वळणाचे असत. पण तेही समाजाच्या हिताचे असत. ‘मेळे’ नावाचा एक प्रकार त्याकाळी लोकप्रिय होता. यात अनेक दृक्‌श्राव्य प्रकारांचा सुंदर मेळ असायचा. गीतं, पोवाडे, भारुडं, व्यक्तिगत व सामूहिक देशजागरणपर पदं, नाटकुली, संवाद, नकला, वाद्यसंगीत असा भरगच्च कार्यक्रम सादर केला जायचा. यातले सर्व कार्यक्रम सांस्कृतिक असत. गणेशपूजेचं व उत्सवाचं पावित्र्य सांभाळणारे असत. लोक जागोजागी गर्दी करून हे मेंदू-मन-मनगट या तिन्हींना प्रेरणा देणारे कार्यक्रम रूचीनं पाहत. आज वैचारिक कार्यक्रमांना अनेक गणेशोत्सव मंडळांनी फाटा दिलेला दिसतो. कार्यक्रम पत्रिकेत व्याख्यानं- चर्चा- परिसंवाद यांच्यावर काट मारलेली असते. महनीय व्यक्तींच्या (सेलेब्रिटी) मुलाखतीही करमणुकीच्या अंगानेच घेतल्या जातात. व्यावसायिक नाटकं, सिनेमा, ऑर्केस्ट्रा यांचं प्राबल्य असतं. सिनेगीतांच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. हे सारं लो. टिळकांना अभिप्रेत नव्हतं.
उपक्रम ः विविध विषयांवर निरनिराळ्या वयोगटांसाठी घेतल्या जाणार्‍या स्पर्धा; गणेश व इतर देवदेवतांच्या स्तोत्रांचं मोठ्या प्रमाणावर पठण, रोज केला जाणारा मंत्रजागर, शांतिमंत्रांचा गजर हे पूर्वीपेक्षा लक्षणीय असतं. विशेष म्हणजे उपक्रमांच्या पातळीवर पूर्वीपेक्षा आज जरा जास्त जागृती झालेली दिसते. लो. टिळकांना बरे वाटेल असे समाजहिताचे उपक्रम काही मोठ्या मंडळांतर्फे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं, शिष्यवृत्त्या, उच्च शिक्षणासाठी व संशोधनासाठी आर्थिक साह्य हे उपक्रम कौतुकास्पद आहेत. वेश्यांच्या मुलामुलींचं पुनर्वसन, मुलींच्या-स्त्रियांच्या आरोग्यासाठी शिबिरं, मोफत शस्त्रक्रिया इ. इ. अनेक उपक्रम खास उल्लेख करण्यासारखे आहेत. यासाठी उर्वरित निधी वापरला जातो.
प्रायोजक (स्पॉन्सर्स) ः एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करायचा तर प्रायोजक हवेतच. पूर्वीही असे लोक सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मदत करत. पण एक तर त्यांची संख्या कमी होती नि उत्सवासाठी लागणारा निधीही मर्यादित असायचा. आज मात्र मोठ्या प्रमाणावर वर्गणी जमवूनही प्रायोजकांची गरज उरतेच. यात वाईट काही नाही, फक्त अनेक ठिकाणी प्रायोजक समाजविघातक उत्पादनं निर्माण करणारे असतात. जर्दा-तंबाखू-गुटखा यांनी शाकारलेल्या भव्य कमानीतून गणराय प्रवेश करतात अन् त्याहीपेक्षा मोठ्या अशा कमानीतून मोठ्या थाटात निरोप घेतात. या कमानी उभारणार्‍यांचे उत्पन्नाचे स्रोत, उत्पादन करतात ते दारूसारखे पदार्थ. हा सारा प्रकार गणरायाचाही श्‍वास गुदमरवणारा असतो. काळाच्या ओघात असे प्रायोजनाचे प्रकार खूप वाढून आता काहीसे कमी होऊ लागलेत.
पुरस्कर्ते ः पूर्वी प्रायोजक हा प्रकार नव्हता. पुरस्कर्तेसुद्धा आर्थिक व्यवहार शुद्ध असणारे  असत. आज गणेशोत्सव मंडळांतर्फे स्मरणिका काढल्या जातात. स्मरणचिन्हं वाटली जातात. स्तोत्र-आरतीसंग्रह प्रकाशित होतात. या सार्‍यांना पुरस्कृत करणारे बरेचसे राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते असतात किंवा गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणार्‍या छोट्या-मोठ्या संस्था असतात. हे चित्र बदललं पाहिजे.
उत्सवोत्तर कार्यक्रम ः जी गणेशोत्सव मंडळे पूर्वीच्या चालीप्रमाणे चांगल्या परंपरांचं पालन करणारी असतात ती उत्सव संपल्यानंतरही वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शन, व्यवसाय समुपदेशन, आरोग्य शिबिरं, स्पर्धापरीक्षांची तयारी, रक्तदानासारखी शिबिरं, श्रमदान, सामाजिक आपत्तीत साह्य अशी कामं करतच राहतात. हल्ली याविषयी जागृती होऊ लागलीय.
सजावट ः पूर्वीची गणेशमूर्तीच्या मागची, पुढची, बाजूची सजावट वेधक पण साधी असायची. आजकाल मात्र हाती असलेला निधी, प्रगत तंत्रज्ञानाची जोड, कलाकुसर व इतर कौशल्यांचा झालेला विकास यामुळे दरवर्षी नवनवे विषय (थीम्स) घेऊन नेत्रदीपक सजावट केली जाते. जगातील आश्‍चर्ये, संपन्न नगरे, राजवाडे, मंदिरे, पर्यटनस्थळे, देवस्थाने (अष्टविनायक, ज्योतिर्लिंग इ.) यांच्या हुबेहूब प्रतिकृती सादर केल्या जातात. हा स्वागतार्ह बदल आहे.
अनिष्ट प्रथांना आमंत्रण ः गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणारी गर्दी, वाढणारी गुन्हेगारी, गणेशमंडळांची परस्पर जीवघेणी स्पर्धा, पैशांचा अतोनात होणारा अपव्यय, अरुणांना व तरुणांना वाईट सवयी लागण्याची शक्यता व तशा उपलब्ध संधी, या हल्लीच्या उत्सवातील अनिष्ट प्रथा थांबवल्या पाहिजेत.
अनिष्ट प्रथांची बोळवण ः काही चांगल्या प्रथा आता प्रस्थापित होऊ लागल्या आहेत. निर्माल्यसंकलन, कचर्‍याची विल्हेवाट, नव्या प्रकारचे दीप वापरून विजेची बचत, रस्त्यावरील वाहतुकीचं निमंत्रण, एकूण आयोजनात दिसून येणारं व्यवस्थापन आणि ढिसाळपणाला निरोप, वाढता नीटनेटकेपणा, समयपालनाच्या शिस्तीचा संस्कार अशा कित्येक चांगल्या गोष्टी हळूहळू विकसित होऊ लागल्या आहेत.

1 comment:

MAHESH said...

सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

समर्थे सुंदरमठी गणपती केला !
दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
भाद्रपद माघ पर्यंत !!
समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर  अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर  संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
दास रामाचा वाट पाहे सदना !
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.