श्रीगणेशस्तवन

- डॉ. सोमनाथ कोमरपंत


श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.


आदिमकालापासून मानवी मन आपल्या उन्नयनाचा मार्ग शोधत आहे. त्याची निर्मितिशीलता सृष्टीच्या अणु-रेणूंमध्ये नित्यनूतनत्व शोधत आहे. अचेतनत्वामध्ये चैतन्य पाहणे हा मानवी प्रतिभेचा चमत्कार आहे. यातूनच कलासाधनेचा मार्ग तिने अवलंबिला. प्रज्ञा-प्रतिभेच्या विकासक्रमाबरोबरच संस्कृतीची संकल्पना मानवाच्या अंतरंगात रुजली. निसर्ग हा त्याचा प्रेरणास्रोत. त्याच्या सान्त जिवाला अनंतत्वाचा ध्यास लागला. त्याचे तत्त्वचिंतन सुरू झाले. तो निराकारामध्ये आकार शोधायला लागला. अरूपाला रूप देण्याचा प्रयत्न मग सुरू झाला. जीवनाच्या शाश्‍वत सत्याचा, शिवाचा आणि सुंदराचा ध्यास त्याने घेतला. या शोधप्रक्रियेत लहान कोण आणि महान कोण हेदेखील ठरविणे कठीण आहे. स्वतःच्या कुवतीनुसार त्याने विश्‍व निर्मिले. केवढे परमसत्य केशवसुत लिहून गेलेले आहेत!
विश्‍वाचा आकार केवढा
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा
कुणाला श्रद्धेच्या सामर्थ्याने देवत्व शोधायचे असते; कुणाला प्रज्ञेच्या बळावर प्रतीकरूपाने त्याच्याकडे पाहायचे असते. श्रीगणेशाच्या रूपाची संकल्पना केव्हापासून लोकमानसात रुजली हे सांगणे हा मतभेदाचा विषय होऊ शकतो; पण तो लोकमानसाचा अधिनायक आहे याविषयी कुणाचेच दुमत नाही. भारतीय परंपरेने परमसत्य अधोरेखित केलेले आहे ः
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ही मंगलमूर्ती सर्वमंगलासाठी आहे. तिच्या केवळ दर्शनानेदेखील चित्तवृत्ती प्रसन्न होते. समूहमनाला एकत्र आणून विधायकतेकडे प्रेरित करण्याची शक्ती या प्रतीकात आहे. खर्‍या अर्थाने ते लोकदैवत आहे. श्रीगणेश हा विद्या आणि कला यांचा अधिष्ठाता आहे. लोकमान्य टिळकांसारख्या प्रज्ञावंताला राष्ट्र संकटात असताना ते संघटित करण्याची प्रेरणा झाली ती श्रीगणेशाच्या आदिशक्तीमुळेच. त्याचे कुल आणि मूळ शोधण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी तो ‘गणनायक’ आहे हे आजच्या जीवनप्रणालीच्या संदर्भात तेवढेच खरे आहे. तो बुद्धिमंतांतील बुद्धिमंत आहे. बलवानांतील बलवान आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि बल समष्टीच्या कल्याणासाठी आहे. तो विघ्नहर्ता आहे. आपल्या सांस्कृतिक संचिताशी आणि पर्यावरणाशी त्याचा दृढ संबंध आहे.
श्रीगणेशामध्ये प्रेरणा कशी शोधावी?
श्रीगणेशाचे मोठे मस्तक लाभदायक दीर्घ पल्ल्याच्या योजना आखण्याची प्रेरणा देते. मोठे कान शांतपणे ऐकण्यास, नवनवीन कल्पना आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. बारीक डोळे एकाग्र व्हायला सांगतात. लांब सोंड चौफेर ज्ञान मिळविण्यासाठी प्रेरित करते.
लोकवाङ्‌मयातून श्रीगणेशाची आराधना करताना म्हटले जाते ः
‘कार्यारंभी प्रथम पुजावे गणनायक गणपती देव हा देवांचा अधिपती...’
जात्यामध्ये धान्याची पहिली ओंजळ टाकताना प्रत्येक माता उद्गारते ः
पहिली माझी ववी गं
गणराया गणपती
पिठाला बरकती
तिथं उभी व्हवी
मंगल कार्याचा प्रारंभ करताना मुळचिठ्ठी गणरायाला जाते. त्याच्याशिवाय कार्यसिद्धी कशी होणार? कारण ‘पाच ग पासुल्याचा दिला मंडप साधूनी देव गणराया उभा कंबर कसुनी...’
पहिली ग मुळचिठ्ठी
माझी नामयाला जाते
देवा गणरायाची
गाडी घुंगराची येते
गोंधळी, आराधी, भोपे, धनगराचे सुंबराज, दशावतारातील त्याचे आद्यनमन, तमाशातील नांदी, शाहिराच्या पोवाड्यातील श्रीगणेशाचे स्तवन यासंदर्भात पुनःपुन्हा आठवावे. त्यातही पुन्हा प्रत्येक परिसराच्या मातीच्या गंधाने भारलेले गाणे नवनिर्मितीचा नवा आनंद देते. सर्वदूर पसरलेल्या भूभागांतील वैविध्याचे किती नमुने साठवावे? ते तर आपले समृद्ध संचित आहे.
आपल्या पारंपरिक लोककला गणेशस्तवनाशिवाय सुरू होत नाहीत. पोतराजाच्या ओव्यांत ‘पहिला नमन गणेश गणपतीला’ हे शब्द आठवावेत. आपल्या गोमंतकातील सुंवारीवादनाच्या घुमटावर थाप पडल्यानंतरची धून आठवावी. आसमंताला मंत्रमुग्ध करण्याचे भावसामर्थ्य त्या नादलयीत असते. या गणगोताच्या संस्कारशीलतेमुळे व्यक्तिमनाच्या जडणघडणीचा आणि समष्टीच्या संस्कृतीचा तलम पोत निर्माण होतो... सर्जनशीलतेची मुळे या सार्‍या संवेदनोर्मीमध्ये दडलेली असतात. फुगड्यांमधून स्त्रीमनाचे सारे हेलकावे कलात्मक ढंगाने प्रकट होतात.
भराडी हे भैरवनाथाचे उपासक. तेदेखील ‘मोरया गणपती गणराजा तुला विनवितो रणराजा, मायेचा निजरूप भराड मांडिला, भराड मांडिला’ या शब्दांत गणेशस्तवन करतात. शाहीरही आपल्या ओजस्वी वाणीत गणेशाला वंदन करतात. होनाजी बाळा, रामजोशी यांनी आपल्या रचनांच्या प्रारंभी गणेशाची प्रार्थना केलेली आहे.
श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा संक्षेपाचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.
श्रीगणपत्यथर्वशीर्ष म्हणते ः
हे मंगलमूर्ती, देवादि गणांचा पालक असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो. तूच साक्षात तत्त्व आहेस. सर्व जगाची उत्पत्ती करणारा केवळ तूच आहेस. जगताचे पालन करणारा तूच आहेस. जगाचा संहार करणाराही केवळ तूच आहेस. जगद्रूपाने भासमान होणारे हे साकार ब्रह्म खरोखर तूच आहेस. चिरंतन राहणारा साक्षात आत्मा तूच आहेस ॥ मी वाचेने सत्य बोलत आहे. मनानेही सत्य सांगत आहे ॥
तू माझे रक्षण कर. तुझे गुणगान करणार्‍या वक्त्यांचे तू रक्षण कर. तुझे गुणगान ऐकणार्‍या श्रोत्यांचेही तू रक्षण कर. योग्य अधिकारी अशा शिष्याला तुझी उपासना देणार्‍या गुरूचे तू रक्षण कर. निरंतर गुरूच्या सान्निध्यात राहून ज्ञान संपादन करणार्‍या शिष्याचे तू रक्षण कर. पश्‍चिम दिशेकडून तू माझे रक्षण कर. पूर्व दिशेने तू माझे रक्षण कर. त्याचप्रमाणे ऊर्ध्वदिशेकडून तू माझे रक्षण कर आणि सर्व ठिकाणी तू माझे रक्षण कर ॥
शब्दरूपाने प्रतिपादित असलेले वेदादि सर्व वाङ्‌मय तूच आहेस. तू ब्रह्ममय आहेस. नामरूपाचा अहंकार धारण करणारा जीव तूच आहेस. ते आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू अविनाशी, चैतन्यरूप, आनंदरूप आणि अद्वितीय आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू अध्यात्म ज्ञानमय आहेस आणि तूच भौतिक ज्ञानमय आहेस ॥
हे सर्व जगत तुझ्यापासूनच उत्पन्न होत असते. हे जग तुझ्यामुळे स्थिर राहत प्रसृत झालेले हे सर्व जगत तुझ्या ठिकाणी परत येत असते. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश तूच आहेस. परा, पश्‍चन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणीची स्वरूपे तूच आहेस ॥
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपासून तू दूर आहेस. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांपासून तू दूर आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीन कालांपासून तू दूर आहेस. मनुष्यदेहातील अधोभागाजवळ असलेल्या मूलाधार नामक स्थानाच्या ठिकाणी तू नित्य राहतोस. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींना तू व्यापून राहतोस. योगिजन सदैव तुझे ध्यान करतात. जगाची उत्पत्ती करणारा तू ब्रह्मा, या जगताचे पालन करणारा तू विष्णू, या जगाचा संहार करणारा तूच रुद्र, सर्व देवांचा राजा इंद्र तूच, सर्व देवांचे मुख असलेला यज्ञभोक्ता तूच अग्नी, सर्व ब्रह्मांडात वाहत असलेला वायू तूच, सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य तूच आणि सर्व औषधींचे पोषण करणारा व रात्री शीतलतेने प्रकाश देणारा चंद्रही तूच. तूच ब्रह्म, तूच भूलोक, तू अंतरिक्ष, तूच स्वर्गलोक आणि प्रणवमंत्रही तूच आहेस ॥
गणाचा आदिभूत असलेल्या गकाराचा उच्चार करून नंतर वर्णारंभक अशा आकाराचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अनुस्वार अर्ध चंद्राकृतीने विलसित असावा. तो प्रणवाने युक्त असावा. हे गणपते, आता जे वर्णिले हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे पूर्वरूप, अकार हे मध्यमरूप, अनुस्वार व अर्धचंद्राकार यांचे संधान म्हणजे एकीकरणाचे साधन, तो नाद म्हणजे शब्दध्वनी होय. गकारादि चार अवयवांचे संमीलन किंवा यथानुक्रम उच्चार ही त्या मंत्राची संहिता. गणपतिमंत्र हीच ती ज्ञानप्रद अशी गणेशविद्या. या एकाक्षरी गणपतिमंत्राचा गणक ऋषी हा द्रष्टा. या मंत्राचा निचृद्गायत्री हा छंद होय. या मंत्ररूप विद्येची गणपती ही देवता. प्रणवयुक्त अशा या मंत्राच्या ठिकाणी व्यक्त होणार्‍या गणपतीला नमस्कार असो॥
एकदन्त अशा गणपतीला आम्ही जाणतो आणि म्हणूनच त्या वक्रतुंड देवाचे आम्ही ध्यान करीत आहोत. एकदन्त असा तो गणपती सर्व कार्यासाठी प्रेरणा देऊ दे ॥
एकदन्त आणि चार हातांत अनुक्रमे पाश, अंकुश, दात आणि वरद ही चार आयुधे धारण करणारा, उंदीर या वाहनावर बसणारा, लाल वर्णाचा, लांबट असे उदर असलेला, सुपाच्या आकाराचे कान असलेला, लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेला, अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेला, लाल रंगाच्या फुलांनी भक्तजनांकडून पूजन केला गेलेला, भक्तांवर दया करणारा, जगाचे आदिकारण, अविनाशी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अवतीर्ण झालेला आणि प्रकृती-पुरुषाहून निराळा अशा या गणपतीचे जो नित्य ध्यान करतो, तो योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय ॥
निरनिराळ्या देवसमूहाचा पालक अशा तुला, नमस्कार असो. ब्रह्मादि देवगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. शंकराच्या पार्षदगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, सर्वविघ्नविनाशक आणि शिवपुत्र अशा तुला, नमस्कार असो. वरदमूर्ती असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो.

प्राचीन कालखंडाकडून आपण संतपरंपरेकडे वळतो तेव्हा निरनिराळी विचारप्रणाली आणि दैवते मानणार्‍या संतांनी श्रीगणेशाचे प्रारंभी स्तवन केलेले आढळते. गणेशाकृती प्रणवाकार आहे म्हणून ज्ञानदेवांनी ‘ज्ञानदेवी’च्या प्रारंभी म्हटलेले आहे ः
ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या|
जयजय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥
देवा तूंचि गणेशु| सकलमतिप्रकाशुु|
म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी॥
अकार चरणयुगुल| उकार उदर विशाल|
मकार महामंडल| मस्तकाकारें॥
हे तिन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें|
ते मियां गुरुकृपा नमिलें| आदिबीज॥
संत एकनाथ म्हणतात ः
नमन एकदन्ता| एकपणे तूंचि आता|
एकी दाविसी अनेकता| परि एकात्मता न मोडे॥
भक्तिभावनेचे नितांत मनोहर रूप नामदेवांच्या आणि तुकारामांच्या रचनेत आढळते. संत नामदेवांनी वर्णन केलेला भक्तवत्सल श्रीगणेश असा आहे ः
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड| करीतसे खंड दुश्‍चिन्हांचा॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं| भक्ताला रक्षिती निरंतर॥
भव्य रूप तुझें उंदीरवाहना|
संत तुकाराम म्हणतात ः
धरोनिया फरश करीं| भक्तजनांची विघ्नें वारी॥
ऐसा गजानन महाराजा| त्याचे चरणीं लाहो माझा॥
शेंदुर शमी बहु प्रिय त्याला| तुरा दुर्वाचा शोभला|
उंदीर असे जयाचें वाहन| माथां जडित मुगुट पूर्ण॥
नाग यज्ञोपवित रुळें| शुभ्र वस्त्रें शोभित साजिरें॥
समर्थ रामदासांनी गणपतीची जी आरती केलेली आहे ती तर जनमानसात रुळलेली आहे. या आरतीत भाषेची सुलभता आहे. प्रसन्नता, प्रासादिकता आणि समूहमनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य तिच्यात आहे. तीन चरणांची ही रचना. वानगीदाखल प्रथम चरण जरी पाहिला, ऐकला तरी आपल्या अंतःश्रुती तृप्त होतात. घुमट, समेळ, झांज आणि मंत्रमुग्ध करणार्‍या या शब्दकळेने आसमंत भारला जातो. सगुणभक्तीचा परमोच्चबिंदू या रचनेमध्ये गाठला गेलेला आहे. शब्द, अर्थ आणि भाव यांचा त्रिवेणी संगम येथे आढळतो ः
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
रामदासांच्या ‘दासबोधा’मधील गणेशस्तवनदेखील चित्तवृत्ती प्रसन्न करणारे आहे. त्यांची विनयशील वृत्तीही येथे प्रकट झालेली आहे ः
ॐ नमोजी गणनायका| सर्व सिद्धिफळदायका|
अज्ञान भ्रांतिछेदका| बोधरूपा|
माझिया अंतरी भरावें| सर्वकाळ वास्तव्य करावें|
मज वाक्शून्यास वदवावें| कृपाकटाक्षेंकरुनी॥
रामानंद ‘भूपाळी गणपतीची’मध्ये श्रीगणेशाचे तन्मयतेने वर्णन करतात ः
उठा उठा सकळिक| वाचे स्मरावा गजमुख|
ऋद्धि-सिद्धींचा नायक| सुखदायक भक्तांसी|
अंगीं शेंदुराची उटी| माथां शोभतसे कीरिटी|
केशरकस्तुरी लल्लाटीं| हार कंठी साजिरा॥
पूर्वसूरींची वाट पुसतच आधुनिक कवी-कवयित्रींनी गणेशस्तवन केलेले आहे.

पारंपरिक ज्ञानाचा खजिना

- सौ. पौर्णिमा केरकर

प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा.

अगदी चमत्कारिक, काहीसा ओबडधोबड दिसणारा, तरीही सर्वांगसुंदर अशा कलांचा अधिपती श्रीगणेश हा सर्वसामान्य लोकमानसाच्या थेट काळजापर्यंत पोचलेला देव. चैतन्याचे, सौंदर्याचे, भव्य, सुंदर कलात्मकतेचे रूप म्हणजेच गणपती. कलेचा, बुद्धीचा, नैसर्गिक तत्त्वांचा अधिपती असलेला हा देव पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच जणूकाही आपल्या उत्सवाच्या दरम्यान समस्तांना उलगडवतो.
मानवी जीवनाच्या रोजच्या धकाधकीच्या वातावरणात त्याला कोठेतरी विरंगुळ्याचे चार निवांत क्षण गरजेचे असतात. ऋतुपरत्वे सृष्टीत होणारे बदल तनामनाला नवचैतन्य प्राप्त करून देणारे. या बदलांशी एकरूप होत मानवी मनाने उत्सवप्रियता बाळगली. चैत्र ते फाल्गुनापर्यंतचा हा प्रवास सर्जकतेचा, सृजनत्वाचा. श्रावणाचे लावण्य तर अभुतपूर्व असेच. श्रावणाचेच भक्तितत्त्व पुढे नेताना भाद्रपदातली चवथ तर सर्वच सणांची अधिष्ठात्री ठरणारी.
चतुर्थीचा सण जवळ येत जातो तसतशी घराघरांत जोरदार तयारी सुरू होते. जागोजागी गणेशमूर्ती विक्रीस ठेवलेल्या दृष्टीस पडतात. आकर्षक रंगात सजवून धजवून ठेवलेल्या या मूर्ती विकत घेऊन आज हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षीच हा उत्सव येतो, पण तरीसुद्धा या उत्सवामागचा अर्थ पुन्हा पुन्हा नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आजच्या आधुनिक कालखंडात श्रीगणेश तर पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे याची जाणीव होते.
पार्वती आंघोळ करण्यासाठी गेली त्यावेळी तिने आपल्या अंगीचा मळ काढून त्याचा एक बाहुला तयार केला. त्याला सजीव करून राखण करण्यासाठी दरवाजावर ठेवले. कोणीही आले तरी आत सोडू नकोस असा तिने हुकूम केला होताच. शंकर त्यावेळी शिकारीला गेले होते. परत आले असता त्या बालकाने त्याची वाट अडवली. मग रागाच्या भरात शंकराने त्याचे मुंडकेच छाटले. पार्वतीचा आकांत. मिळेल त्या प्राण्याचे मुंडके आणून धडाला लावायचे हा शंकराचा आदेश. पहिलाच प्राणी मिळाला गजराज. त्याचेच मुंडके मग धडाला चिकटवले गेले. तोच हा गणराज. ही गोष्ट परंपरेने चालत आलेली. लोकमानसात श्रद्धेने स्थिरावलेली. त्यात सत्य किती, असत्य कोणते ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न नाही. प्रश्‍न आहे मानवी भावनांचा, लोकश्रद्धेचा. त्यामुळे ही गोष्ट हलत नाही, बदलत नाही. पार्वतीच्या अंगाचा मळ असा अर्थ घेणे म्हणजे पार्वतीने कितीतरी दिवस आंघोळच केली नसावी. परत देवासंदर्भात असा अविश्‍वास दाखवणे हेही श्रद्धेच्या माध्यमातून गैरच. मग गणपती हा ज्ञानाचा खजिनाच आहे या दृष्टीतून बघताना मात्र त्यात वेगळेपणा दिसतो. पर्वत धारण करणारी ती पार्वती. तिच्या अंगीचा मळ म्हणजे माती. ही माती डोंगरावरून शेताभाटांत येऊन स्थिरावली. कष्टकरी लोकांनी तिचीच मूर्ती केली. तिला पुजली, भजली. त्याचाच उत्सव चैतन्यमयी ठरला.
एखादी चमत्कृती अनुभवली, कोणत्या तरी अनाकलनीय गोष्टीचे भय मनात बाळगले की श्रद्धा उफाळून येते. मनाची भाबडी श्रद्धा असते. ज्या गोष्टीचे भय वाटते त्याचीच पूजा करायची, त्यामुळेच सार्‍यांचे रक्षण होईल. कदाचित या अशा वृत्तीतूनही चतुर्थीचा उत्सव जनमानसात रुजला असावा. भाद्रपदातील दिवस कुमेरी शेतीच्या ऐन बहराचे असायचे. मेहनत करून पिकवलेली शेती जंगलातील हत्ती फस्त करायचे. मेहनत फुकट जायची. हातातोंडाशी आलेला घास नाहीसा व्हायचा. त्यामुळे याच हत्तीरूपी देवाची पूजा करण्याची संकल्पना लोकमानसाने रुजवली असावी. आज तिला व्यापक स्वरूप प्राप्त झालेले असले तरी निसर्गाशी प्रामाणिक राहून स्वतःचे कुटुंब, संसार चालवताना त्याची होणारी तारेवरची कसरत आणि मग जो निसर्ग आपल्याला भरभरून सर्वकाही देतो त्याविषयीची कृतज्ञता या उत्सवातून निर्माण झालेली दिसते.
शेतातली माती शाडूची. त्याच मातीची गणेशमूर्ती बनवायची. चवथ येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी करायची ती ‘रेवो’ घेऊन. रेवो म्हणजे पिवळसर, मऊ, लुसलुशीत माती खणून आणून पाण्यात फुगवायची. मग एखादा चांगला कपडा त्यात भिजवून मातीच्या घराच्या भिंतींना लेप काढायचा. खाली जमीन शेणाने सारवायची. जरासे वर भिंतीला एका रेषेपर्यंत शेणाने सारवायचे. एकंदरीत भिंतीला रेवो व शेण यांची रंगरंगोटी केली जायची. रेवो खणून आणून त्याचा रंग तयार करण्याचे ज्ञान परंपरेने घरातील सर्वच सदस्यांना असायचे अशातला भाग नाही. परंतु ही कृती मोठी माणसे जेव्हा करायची तेव्हा लहानग्यांना त्याचे अप्रूप वाटायचे. सहजच त्यांचेही हात त्या शाडूत माखले जायचे. तपकिरी रंगाच्या दगडातून भिंतीवर नक्षी आकाराला यायची. शेणावर पिठाची रांगोळी. ज्या जागेवर गणपतीची मूर्ती विराजमान केली जाणार आहे त्याच्या मागच्या बाजूला कमळाची कलाकृती नैसर्गिक रंगानेच काढली जायची. ही कला परंपरेने सर्वांच्याच वाट्याला यायची. दारावर तोरण बांधलेले असायचे. त्यातील भरतकाम, वीणकाम घरातील स्त्रियांनीच केलेले असायचे. मोराची, कमळाची, स्वस्तिकाची कलाकुसर त्यात असायची. दारासमोरच्या रांगोळीत सांस्कृतिक संचित अधोरेखित व्हायचे. नवीन लग्न झालेल्यांना ‘वजे’ दिले जायचे. त्या वज्यात तोरण असायचे. घरातील महिलांना, सासवा-सुनांना, लेकीबाळांना ही कला परंपरेने प्राप्त झालेली असायची. चतुर्थीच्या निमित्ताने या कलानिर्मितीला अधिक उजाळा यायचा.
गणेशाच्या आगमनाची तयारी करताना रंगरंगोटीबरोबरच माटोळीचे कामसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. आठवड्यापूर्वी रानावनातील पत्री, फुले, फळे गोळा करून आणण्याचे काम सुरू व्हायचे. त्यात मोठ्या प्रमाणात वैविध्य होते. औषधी गुणधर्म तर यातील कित्येक फुलपत्रीला असल्याने माटोळीची रचना व त्याला बांधलेले नैसर्गिक धन हा तर मोठा ज्ञानाचा खजिनाच असायचा. एरव्ही रानात असताना काही काही वनस्पतींना तेवढेसे महत्त्व दिले जात नसे. माटोळीला बांधल्यानंतर त्याचे वेगळेपण उठून दिसे. भेरलेमाड एरव्ही ओबडधोबड दिसणारा, परंतु त्याच्या फळवेलींचा एवढा कलात्मक उपयोग सजावटीसाठी केला जायचा की जणू काही निरनिराळी फळे गुंफून एक माळाच केलेली आहे असा भास व्हायचा. किती नावे आणि किती औषधी गुणधर्म यांची गणतीच नसे. बोणकीचे फळ, रानकरमळ, सीतेचवरीचे मूळ, धुपाचे फळ, ताडमाड, शिवलिंग, तांबडी चाफी, पांढरी अबोली, घोड्याची पावले, हेरडा, कवचा, पालपणस, गमफळे, काटेकवर, गुंजी, अमृतवेल, आटकी, हळदफुल, ताम्हण, लाजरी, केवडा, वट्‌टेलाव, पितमाडे, रानकेळीचे फुल, चोनचाफ्याची फळे, वीख मोगरी, चवरमांडो, एरंड, खरसंग, धनुकाचो कात्रो, भेकरो, नर्कवाल, कांगला, माडतीची माट्टूला, पावसात जेवढ्या भाज्या घरासभोवताली- एखाद्या कुणग्यात पिकवल्या जातात त्यातील दोडकी, काकडी, भेंडी, तोरींग, दुधी वगैरेचा वापर माटोळीसाठी केला जातो. रानावनात मिळणार्‍या या फळाफुलांची, वेलींची फक्त माहिती होती असेच नव्हे तर त्याविषयीचे औषधी गुणधर्मसुद्धा त्याला ज्ञात होते. त्यामुळे माटोळीतील कोणते फळ-फुल कशावर उपयोगी आहे यावर तो माहिती द्यायचा. त्याबरोबरीनेच त्यामागची एखादी दंतकथाही सांगून टाकाया. त्यातील विषारी घटकसुद्धा अवगत असायचे. ‘नर्कवाल’संदर्भात तर सांगितले जाते की सीतेला रावणाने नजरकैदेत ठेवल्यावर तिला त्रास देण्यासाठी रावणाने आपल्या बहिणीला ही वाल म्हणजेच वेल दिली होती. या वेलीला खूप घाण वास येतो. चवरमांडो कौशीच्या झाडाच्या सालीपासून आकर्षक गोंडे करून माटोळी सजवली जायची.
लांब शेंग असलेले खरसंग पखवाज, मृदंगासाठी जसे उपयोगी तसेच गायीगुरांच्या गुदद्वाराला रोग जडला तर त्यावरही उपयोगी असायचे. भेकरेची फळे फोडून आतील गर गरम करून खाणे व्हायचे. कवचा या वनस्पतीला काटे असतात. याचा काढा करून प्राशन केल्यास मुतखड्यावरील ते जालिम औषध. ‘गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन रे, पाच फळांनी पाच फुलांनी दूर्वा वाहीन रे’ असे म्हणून आंब्याच्या टाळ्याशिवाय माटोळीला शोभाच नाही असे पदोपदीने वाटायचे. त्यासाठीच-
आंब्या तुजो टाळो
टाळो मोडून रथ घडयिलो
गणपती देवाचा रथ घडयिला
गणपती देवाची ही किमया
गणपती देवाला जाऊ शरणा
अशी श्रद्धा अभिव्यक्त करताना माटोलीला बांधलेल्या फळ-फुल-वेलींतून ज्ञानाचा औषधी गुणधर्माने युक्त असा मोठा खजिनाच तिथे सापडायचा. पारंपरिक वनौषधींचे ज्ञान उपजतच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित व्हायचे. आज कसलाही आजार झाला तर ऍलोपथीचा वापर होतो. श्रावण-भाद्रपदातील रानफुलांचे लावण्य तर चवथीला अधिक रंगीत करायचे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे सारे हितकारकच होते जे आज विस्मृतीत जाताना दिसते.
आरोग्य आणि आहार यांची महत्त्वपूर्ण सांगड याच उत्सवादरम्यान दिसते. दीड, पाच, सात, अकरा दिवस गणपतीचे वास्तव्य कमी-अधिक प्रमाणात घराघरांत आढळते. या दिवसांत शाकाहाराचे व रानभाज्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार केले जातात. गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. पूर्वी भातशेतीच मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तांदळाचे पीठ सर्रास वापरले जायचे. पहिल्याच दिवशी तांदळाच्या पीठाच्या नेवर्‍या-करंज्या करताना डाळीचे पीठ व गूळ, नाहीतर नारळाचा चव व गूळ यांचे सारण करून केलेल्या करंज्या मातीच्या मडकीत पाणी घालून, त्यावर स्वच्छ कपडा बांधून, वर केळीचे पान ठेवून त्यावर करंज्या, मोदक उकडले जायचे. खतखते, मणगणे, सातकप्यांचे गोड पोळे, पायस, आमाड्याचा आंबट-तिखट सार हे सारे असायचेच. त्याशिवाय तेरे, तायखळा, आळू, शेगलाची भाजी, कुड्डू, हुर्डूक, वालीच्या पानांची भाजी, तवशी, दोडकी, भेंडी, पडवळ यांनी घराचे अंगण, भितोडी भरलेली असायची. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहारात व्हायचा. या सकस, पोष्टिक आहारामुळेच त्याकाळची पिढी धष्टपुष्ट झालेली होती.
गणपतीचे आगमन होणार याची लगबग घरातील लहानथोर सर्वांनाच असते. तरीही घराची झाडपूस करणे, शेणसारपण, रंगरंगोटी, जेवणाखाणाचे बघणे हे काम घरातील स्त्रियांकडे यायचे. हे सर्व आवरून गणपतीच्या वास्तव्यात दवली-माणीच्या वादनापासून ते फुगड्या, झेमाडो घालीपर्यंत कधीकधी रात्र सरायची. परंतु फुगडीशिवाय एकही दिवस व रात्र सरत नसे. हाताखांद्याशी एखादे लहान मुल असले तरीही त्याला कडेवर घेऊन, प्रसंगी झोपवून, उठले तर त्याला थोपटून फुगडीत रममाण होणे व्हायचे. गणेशावरील असलेल्या निस्सिम श्रद्धेमुळेच हे शक्य होत असे.
वयीले डोंगरी गे बाई
रान कापीले हुस्केचे
देऊळ बांदिले बसकेचे
गणपती देवाचे, ग बाई गणपती देवाचे
श्रावणबाळ, चिलयाबाळ, सत्यवान-सावित्री, हरिश्‍चंद्र-तारामती, कृष्णसखा, गणपती जन्माख्यान, पार्वती, द्रौपदी, सीता, रामायण, महाभारत अशी आख्यानकाव्ये, कथानके, लोकोत्तर पुरुष-स्त्रिया यांचे भावबंध फुगड्यांतून उलगडत जायचे. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये अशाच फुगडीगीतातून पिढीपर्यंत पोहोचली. फुगडीगीतांतून ही कथाकाव्ये ऐकतच मनीमानसी संस्कार घडले व ही मौखिकता पुढे पुढे सरकत राहिली. संस्कारसंपन्न ज्ञानसाधनेचा हा मोठा परिपाठच गणेशचतुर्थीच्या निमित्ताने समाजासमोर यायचा. गणेशजन्माची कथा तर कित्येक फुगडीगीतांतून समूर्त होत गेली. प्रत्येक गीतात वेगळेपण-
पार्वतीचा तयेचा एकवाद
उठली फातोडचे पारी गे
गेली ती गायीचे गोठणी
हाडीले गुळीभर शेण गे
सारपले घर आनी दार गे
लायीली माळ्याक निसण
काडीले एकदोन नारळ
आप्रोस पिळून आंगी लावीला
आंगीच्या मळीचा बाळ घडयला...
दवले-माणीच्या गायनाची एक स्वतंत्र परंपराच तत्कालीन पिढीला मुखोद्गत झाली होती. फुगडीचे निमित्त असायचे स्त्रियांना स्वतःचे मन व्यक्त करण्यासाठी. सासरी वावरताना प्रसंगी त्रास सहन करावा लागायचा. कष्ट वाट्याला यायचे तरीसुद्धा हे सारे सहन करावे लागायचे. याची शिकवण माहेरहून आईने मुलीला दिलेलीच असायची. त्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊनच संसारात रममाण होणे व्हायचे.
शेत माझे डोंगरी गे, चित्त माझे माहेरी
आई माझी चिंता करी, लेक माझी एकटी
नाही आई एकटी मी, सासू आहे संगती....
असे मनाला समजावणे व्हायचे. हे भक्तीचे सामर्थ्य होते. गणेशावरची अढळ श्रद्धा होती. ती जशी फुगडीतून अधोरेखित व्हायची तशीच भजन, कीर्तन, आरत्यांमधून स्पष्ट जाणवायची. आजही भजन, कीर्तन, आरतीमधून ही परंपरा जिवंत, प्रवाही राहिलेली आहे. काळाप्रमाणे बदल घडला. पूर्वी ध्वनिक्षेपकाचे, फटाक्यांचे मोठे प्रदूषण होत नव्हते जे आज विसर्जनाच्या वेळी आपल्याला दिसते. घुमट, समेळ, झांज, पखवाज या वाद्यांतून साकारणारे संगीत मन बेभान करायचे. पावले थिरकायची. घराघरांत होणार्‍या भजन-आरत्यांमुळे घर पवित्र तर व्हायचेच. एकूणच ते दिवस भारावल्यासारखे. विसर्जनावेळी तर या सर्वांचा उत्कर्षबिंदू असायचा. आजही गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा. पताका लावण्यापासून ते खाद्यपदार्थ तयार करण्यापर्यंत औषधी वनस्पतींचा खजिना, कथा-काव्यांचा संस्कारसंपन्न नजराणा पिढ्यान्‌पिढ्या पोचविणारा चवथीचा उत्सव हा पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे.

बालपणीची चवथ

- डॉ. पांडुरंग फळदेसाई 


आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.



प्रत्येकाला आपल्या बालपणात डोकावणे आवडते. आजच्या मोठेपणीच्या आयुष्याची तुलना स्वाभाविकपणे आपल्याच बालपणाशी होते आणि बालपणातल्या गमती-जमती आठवल्यावर आपण किती रम्य अशा बालपणाला मुकलो याची तीव्रतेने जाणीव होते. कितीही कठीण परिस्थितीत, संघर्षात, गरिबीत आणि कधीकधी दुःखात आपण बालपणातले दिवस घालविलेले असले, तरी आज त्याकडे आम्ही सुखाचे संचित म्हणूनच पाहतो. कारण त्यावेळेला भविष्यकालीन आयुष्याचा विचार मनाला फारसा स्पर्श करीत नसे. त्यामुळे एक निरागस, स्वच्छंदी वृत्तीने सभोवतालचे जग पाहण्याची सवय नकळत लागून जाते. त्यामुळे मिळेल त्या अनुभवातून आनंद मिळवायचा प्रयत्न सातत्याने चालू असतो. आपले कुटुंब, आई-वडील, काका-काकी, भाऊ-बहिणी, मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, गावातील सवंगडी, शिक्षक, शाळेतील सोबती, मित्र-मैत्रिणी यांच्या गोतावळ्यात गुंग असताना आपण अचानक मोठे झाल्याची जाणीव होते. तेव्हा मात्र आपल्या बालपणातील दिवस पाखरासारखे उडून गेले याची जाणीव अस्वस्थ करून जाते. आता आपली मुले, नातवंडे यांच्या बालपणात आपण नकळत स्वतःला शोधत असतो. तो एक अनावर छंद मनाला भुरळ घालीत असतो. येणार्‍या बहुतेक सर्व प्रसंगांतून आपण आपल्या बालपणाचा वेध घेतो. त्यामागे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्याची ऊर्मी असते. हे प्रसंग मूलतः कौटुंबिक स्वरूपाचे असतात. त्यात सण-उत्सवांचा मोठा वाटा असतो. कारण आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. मोठ्या कुटुंबातील जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. त्या ‘नांदण्या’तला आनंद वेगळाच होता. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. त्यामुळे क्षणोक्षणी आनंद अनुभवायचा. उत्साहाला उधाण आलेले असायचे. कोणतेही जोखमीचे कामदेखील आव्हान म्हणून स्वीकारण्याचे बळ अंगात यायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.
आमच्या बालपणातील चवत म्हणजे एक अविस्मरणीय घरगुती सण. एक पर्वणी. घरात पूजेसाठी आणायची मूर्ती कशी असावी याबद्दल आमच्या खूप कल्पना असायच्या तशाच अपेक्षादेखील असायच्या. परंतु त्याबाबतीत आपण बाल-गोपाल मंडळी फारसे काही करू शकत नव्हतो. परंतु घराची, मखराची सजावट, माटोळी, रांगोळी, आरत्या, फुगड्या, फटाके-दारूकाम याबाबतीत मात्र सर्वत्र आमची मिरासदारी असायची.
माटोळीच्या तयारीसाठी आम्ही मुले चार दिवस अगोदरच कामाला लागायचो. रानात जाऊन मिळेल ती जंगली फळे म्हणजे कुड्या-कात्रे, माट्टीकात्रे, कांगोणां, बेलफळे, फागलां जमवायचो. त्याच्याबरोबरीने मळे व बागायतीतील अनेक फळभाज्या आणि बागायती पिके असायची. त्यात सुपार्‍यांची शिपटीं, वैशिष्ट्यपूर्ण नारळ, केळी, चिकू, पेरू, तोरींग, नीरफणस, कर्मल, बिंबल, काकडी, दोडकी, पडवळ, दुधी, भेंडी असे एक ना अनेक फळभाज्या असायच्या. माटोळी उभारण्यासाठी आमच्याकडे आमचा पारंपरिक गडी रघुनाथ यायचा. आम्ही गोळा केलेल्या सर्व वस्तू तो यथासांग माटोळीला बांधायचा. माटोळी आकर्षक व्हावी म्हणून तिला आंब्याच्या डहाळ्यांची अथवा पानांची किनार असायची.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात गवर-म्हादेव पुजायचे. त्यासाठी स्वच्छ आणि गुळगुळीत केलेला मोठाला सोललेला नारळ आम्ही तयार ठेवायचो. गौरीसाठी पत्री गोळा करून आणण्याचे काम आमच्यासाठी जसे ठरलेले असायचे, तसेच एका विशिष्ट शेतीवर जाऊन दोन दिवसपर्यंत पूजेसाठी लागणार्‍या दूर्वा आणण्याचे कामही आमचेच असे. बाकी तुळशीपत्रे, फुले वगैरे पूजासाहित्यदेखील तयार ठेवण्याची कामगिरी आम्ही स्वेच्छेने करायचो. गौरीची चुडी वडीलधारी मंडळी तयार करी व गणपतीसाठीची पत्री-पुडी गावच्या मंदिरअर्चकाच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी आम्हा मुलांवर असे. रंगीत पताका लावणे, तुळशीवृंदावनाजवळ छोटी माटोळी बांधल्याची खात्री करणे, रांगोळी घालणे आणि अधूनमधून स्वयंपाकघरातील गोडधोड पदार्थांचा वेध घेणे हे आमचे काम मात्र सातत्याने चालू असे. कधीकधी शेजार्‍यांकडील तयारी कुठवर आली याचाही अंदाज घेत असू. त्यांना काही मदत हवी असल्यास ती देण्यास आम्ही सगळेजण एका पायावर तयार. परंतु ठरलेल्या वेळेत सगळी तयारी पूर्ण व्हायला हवी याकडे आम्हा सगळ्याच मुलांचे लक्ष असे. कारण चवत व पंचम (चतुर्थी आणि पंचमी) या दोन दिवसांत आम्हाला अधिकाधिक कामात व्यस्त राहावे लागे.
चतुर्थीच्या काळात आजोळीची मंडळी, खास करून मामा यायचे. ते यायचे म्हणजे घरातील आम्हा मुलांसाठी खूप काही आणायचे. लाडू, करंज्या, हालवा, पोहे, पेढे, शेव, चिवडा आणि त्यासोबत फटाके आणि चंद्रज्योती. नंतरच्या काळात त्यात आपटगोळ्या आणि मोठ्या बॉंबचीही भर पडली. त्या आपटबॉंबकडे व फटाक्यांकडे पाहिल्यावर कधी एकदा आपण ते फोडू असे व्हायचे. मग मामाच्याच साक्षीने फटाके फोडायचो, नपेक्षा बॉंब तरी फुटायचे. कारण आमच्या दृष्टीने त्या आवाजात गणेशोत्सवाचे वातावरण तयार करण्याची प्रचंड क्षमता होती! फटाक्यांवर आणि बॉंबवर हक्क मुलांचा तर आपटबॉंब आणि चंद्रज्योती पेटविण्याचे काम मुलीबाळींचे असायचे.
चवतीच्या सकाळी गणपतीबाप्पा आमच्या घरी यायचे ते फटाक्यांच्या आवाजात. मूर्ती आवरणाखाली असल्यामुळे आम्हा सर्व मुलांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. आपल्याकडे आणलेले गणपतीबाप्पा कोणत्या वेषात आणि कोणावर म्हणजे उंदीर, आसन, हंस, मोर, सर्प यांवर बसलेले आहेत, शिवाय त्यांचा आकार केवढा आहे हे जाणून घेण्याची ती उत्कंठा असे. गणपतीबाप्पाला मुख्य दरवाजात राठ दाखवून आत घेतले जाई. दुपारी त्याची पूजा व आरत्या होत. त्यावेळी ठेवणीतली घुमटे, शामेळ, झांज, कासाळे वगैरे वाद्ये आरत्यांसाठी तयार असत. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ची आरती सुरू असे. घुमटांच्या तालावर आरत्या गाण्याचे आणि अनेक पारंपरिक आरत्या निवडून वेगवेगळ्या तालात म्हणण्याचे पहिले धडे आम्ही चवतीच्या परबेतच गिरवले. फटाक्यांचा धूमधडाका सुरू झाला की आम्ही सगळी मुले तेथे घोळक्याने हजर असायचो. एखादी भित्री भागूबाई रडव्या तोंडाने कोपर्‍यात उभी असे. आरत्या झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखविला जाई. त्यात लाडू-कापां-करंज्या आणि खास करून पातोळ्या असत. हळदीच्या पानातून उकडलेल्या त्या पातोळ्यांचा घमघमाट अनेक दिवसपर्यंत आमच्या नाकात भरून असायचा. गौरीसाठी खास सासवेची व देठ्याची अळणी भाजी असायची. शिवाय गौरीपुढे सर्व सुवासिनी वायन पुजायच्या.
त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे जेवणावळी. पहिल्या पंगतीला मोठ्या पुरुष मंडळीसोबत आम्हा सर्व मुलांचा क्रम लागायचा. नेहमीच्या पदार्थांपेक्षा पानातील पातोळ्या, पायस, मोदक इत्यादी गोडधोड पदार्थांवर आमची नजर असायची. त्यावर यथेच्छ ताव मारला म्हणजे आमची चवत खूपच रंगायची. शिवाय दिवसभर अधूनमधून लाडू, करंज्या, शंकरपाळे, पेढे असल्या खाद्यपदार्थांची रेलचेल असायची.
दुपारच्या भोजनानंतरचा मुख्य कार्यक्रम लगबगीने सुरू व्हायचा, तो म्हणजे गावातील गणपतीबाप्पांचे दर्शन घेणे. आम्ही अगोदरच मनसुबे रचायचो, यावर्षी अमुक एवढे गणपती पाहायचे. म्हणून वाड्यावरील आम्हा मुलांमध्ये अहमहमिका असायची. कोणी किती संख्येने गणपती पाहिले त्याची पुढे वर्णने येत. अमुक अमुक घरातील गणपती का आवडला याचे वर्णन साग्रसंगीत करीत असू. काही ठिकाणी देखावे करीत. स्वयंचलित देखाव्यांची कल्पनाच त्यावेळी आमच्या बालमनाला प्रचंड भावायची. आमच्या बालपणात गावात वीजपुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे एखादा स्वयंचलित दिवा गणपतीसमोर मखरात दिसणे म्हणजे आम्हाला कोण कौतुक वाटायचे. माझ्या एका बालमित्राने उंचावरून पडणार्‍या पाण्याच्या ओघाखाली डायनामा चालवून थेट गणपतीच्या मखरात दिवा पेटवला. तो ‘चमत्कार’ पाहण्यासाठी आम्ही असंख्य मुले त्या चतुर्थीला माझ्या मित्राच्या घरी गर्दी करून होतो. गणपतीबाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गावात निघण्याअगोदर आम्हाला सूर्यास्तापूर्वी घरात परतण्याची तंबी दिलेली असायची.
त्यासंदर्भात गणपती आणि चंद्राची कथा आवर्जून सांगितली जायची. लाडू-मोदकांच्या भरपूर मेजवानीचा लाभ घेऊन गणपती उंदरावर बसून चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी परतत होते. त्यावेळी उंदराचा पाय रस्त्यात अडकला व पाठीवर बसलेले गणपतीबाप्पा तोल जाऊन खाली पडले. ते दृश्य पाहून चंद्राला हसू फुटले. तो मोठ्याने हसला. ते पाहून गणपती अपमानीत झाले. त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी आपला एक दात मोडून चंद्राकडे भिरकावला व त्याला शाप दिला- ‘चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुला पाहणार नाहीत. जो पाहील त्याच्यावर भलताच आळ येईल.’ तसा भलता आळ आपणावर येऊ नये म्हणून आम्ही सर्व मुले संध्याकाळच्या आत घरात यायचो. रात्री आरत्या, फटाके, चंद्रज्योती, जमीनचक्रे, फुगड्या चालायच्या.
दुसरा दिवस कधी उजाडला आणि कधी संपला हे आम्हाला कळतच नसे. कारण दिवसभर गोडधोड खाणे, गणपतीच्या मूर्ती पाहणे, आरत्या म्हणण्यात सामील होणे, फटाके फोडणे, फुटलेल्या फटाक्यांच्या कचर्‍यातून न फुटलेले फटाके वेचून फोडणे इत्यादी अनेक उद्योग दिवसभर चालायचे. संध्याकाळ जवळ येता येता मात्र आम्हाला उदास वाटायचे. वर्षभर वाट पाहायला लावून आलेला हा आपल्या घरचा देव गणपतीबाप्पा आता आणखी काही वेळानंतर निघून जाणार या कल्पनेने आम्ही अस्वस्थ व्हायचो. ज्यांच्या घरी पाच-सात दिवसांचा गणपती आहे ते भाग्यवान असे वाटायचे. दीड दिवसानेच गणपती माघारी जाणार म्हणून आमच्यापैकी काही मुले रडायलाच लागायची. त्यांची समजूत काढताना मोठ्यांच्या नाकी नऊ यायचे. शिवाय गणपतीला आमच्या डोळ्यांदेखत पाण्यात बुडवीत ही कल्पनाच आमच्या बालमनाला असह्य वाटे. देव म्हणून घरी आणता, त्याची पूजा करता, खूप आनंद साजरा करता आणि शेवटी त्या देवाला पाण्यात विसर्जित करता. सगळेच अगम्य वाटे. परंतु त्या अस्वस्थतेतदेखील आम्ही सगळेजण मोठ्या आवाजात त्याला विनवणी करायचो, ‘गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!’ रम्य ते दिवस....

अस्सा गणेश सुरेख बाई...

सौ. रेखा ठाकूर


आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.




ताशाचा आवाज टररऽऽर झाला
न् गणपती माझा नाचत आला...
कधीतरी लोकगीतसदृष्य या गाण्याचे बोल कानावर पडले आणि अगदी मनोमन पटून गेले- नृत्य म्हणजे उल्हास, नृत्य म्हणजे चैतन्य... गणपतीच्या आगमनाबरोबर हे सारं अनाहूतपणे येतंच. त्यामुळे नाचणारा गणपती प्रतीकच होऊन येतो. आमच्याकडे नृत्यमुद्रेतल्या गणपतीचे एक मोठ्ठे पोस्टर आहे. मागच्या दोन हातांमध्ये परशू आणि कमळ. पुढच्या दोन्ही हातांची मुद्रा अशी की त्यातून ‘तथास्तु’चा झंकार उमटावा. उजवा पाय चवड्यावर किंचित उचललेला आणि डावे पाऊल गिरकी घेण्याच्या पवित्र्यात. नखशिखांत नटलेला मूषक कौतुकभरल्या नजरेने आपल्या स्वामीच्या कला पाहतो आहे. या चित्राकडे पाहिले की प्रसन्नतेचा शिडकाव झाल्यासारखे वाटते. खिन्नतेच्या जाळ्या गळून पडतात आणि सोनसळी उन्हं बागडू लागतात आसपास. त्यामुळेच मला नाचणार्‍या गणराजाचे अप्रूप अधिक आहे.
गणपती आले की मग आठवणींची पाने फडफडू लागतात. माझ्या माहेरी माझे आईवडील नोकरीवाले. बिर्‍हाडाची बेताची जागा. त्यामुळे गणपती आणला की सारे यथासांग व्हायला हवे या आईच्या श्रद्धेमुळे इच्छा असूनही घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे घरी ‘बाप्पा’ येण्याचा थरार मला ठाऊकच नव्हता. आमच्याकडे सार्वजनिक गणपती मात्र धूमधडाक्यात असायचे. तिथे पडून असायचे. पण भक्तिभावाने घरात आणला जाणारा, सजवलेल्या मखरात विराजमान होणारा, लाल फुलं, दूर्वा ल्याणारा आणि घमघमत्या वासाचे शुभ्र मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावयाचा ‘घरचा गणपती’ शेवटी वेगळाच ना!
कालांतराने ‘झाले मी सून गोव्या घरची’ म्हणत मी धाडकन गोव्यात आले. आमचं इकडचं सख्खं-चुलत असं एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दीर-नणंदा, मुलंबाळं असं २०-२५ माणसांचं नांदतं घर गोकुळासारखं. तिकडून (म्हणजे फार लांबून नव्हे हो, महाराष्ट्रातून. पण इकडच्या काही मंडळीना महाराष्ट्र म्हटलं की जरा मळमळतं) आल्यामुळे मला ‘एकत्र कुटुंब’ ही संकल्पना नवीनच होती. इथल्या संस्कृतीला एक स्वतःचा वेगळा चेहरा आहे. तो मला अजून अपरिचित होता. ‘हम दो, हमारे दो’ अशा चौकटीत वाढल्यानंतर इथे आपलं जमेल ना अशी थोडी धुकधुक वाढली होती. पण या प्रेमळ घराने मला कुठलेही आढेवेढे न घेता सहज स्वीकारले. आमचं शंभर वर्षांचं जुनं घर. भक्कम. खूप खोल्या. गडगंज माजघर. तिथे प्रशस्त ओट्यावर देवघराची जागा. अनेक देवदेवतांच्या तस्विरींचा लवाजमा. मोठ्या देव्हार्‍यात अनेक मूर्ती... शाळिग्राम, बाण गंगा, वस्त्रात गुंडाळलेले कुठले पवित्र आकार. (अद्याप सगळे देव मला नावानिशी ठाऊक नाहीत.) माझे सर्व सासरे पौरोहित्य करणारे (म्हणजे ‘भटपण’), त्यामुळे घरात पूजाअर्चा, सणवार, सोवळंओवळं असायचं. पण त्याला कर्मठपणाचा किंवा कर्मकांडाचा वास नसल्यामुळे मला त्यात सामावून जाणं सहज जमलं. पारोशानी देवाची पेढी ओल्या वस्त्राने पुसणे, पूजेची उपकरणे चकचकीत करणे, रांगोळी रेखणे वगैरे आनंदाने करू लागले. सासरे सोवळे नेसून मनोभावे पूजा करायचे. दूर्वा, तुळशी, बेल, तांबड्या-पांढर्‍या-पिवळ्या फुलांची गर्दी. त्यात बुडालेले सुस्नात देव. उदबत्ती, धूपाचा गंध, घंटेचा मंजूळ नाद आणि त्यांच्या तोंडून येणारा मंत्रघोष... काहीतरी वेगळंच अनुभवायला मिळायचं. श्रावणातला प्रत्येक वार (एक बिचारा बुधवार सोडला तर) मानाचा. त्यात नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण, त्यामुळे ही श्रावणधून पटकन संपत यायची. त्याआधीच घराला गणपतीचे वेध लागले. माझे मन उत्सुकतेने भरून गेले. ‘गणपती’ ही काय चीज आहे याची माझी कल्पना फारच तोडकी. त्यामुळे अंदाजच बांधता येईना. ‘पहिलावहिला गणपती’ आयुष्यातला.
रात्रीच्या पंगतीत येत्या शनिवार-रविवारी घरसफाईचं पक्कं झालं. नोकरीवाल्या मंडळींसाठी शनि-रविची योजना. मग काय घरात मंगलकार्य उभं राहिल्याची लगबग सुरू झाली. एवढं मोठं पुराणं घर... माणसांबरोबरच झुरळी, कोळी, उंदीर सुखाने राहत होतीच. सकाळी भरपेट खाऊन सार्‍यांनी कंबर कसली. लांब दांड्याच्या झाडूने धूळ, जळमटे साफ झाली. प्रत्येक वस्तू उचलून बादल्या-बादल्या पाण्याने सारी जमीन (फरशी) स्वच्छ झाली. अडगळ काढून तिचा निचरा झाला. भिंतीवरच्या पूर्वजांच्या तस्विरी स्वच्छ झाल्या. त्यांना नवे हार चढवले गेले. पडदे साबणपाण्यातून काढून उन्हात वाळायला पडले. सतत २-३ तास कामाची वेठ मारल्यावर अधेमधे चहाची आधणे आणि शेवचिवड्याचे बकाणे. खूप दिवसांनी निवांत एकत्र आल्याने थट्टामस्करी, हशा चालू राहिले. ही झाली बाह्य गणपतीसाठीची पूजेची खास. तांब्या-पितळेची उपकरणे सासरे काढायला लागले... अबब! दोन-अडीच फुटी पितळी भक्कम समया. तांब्याची ताम्हणे, लोट्या, पळ्या, तबके, कितीतरी निरांजने. मग आमसूल-मीठ लावून (धुऊन परत चुलीतल्या राखेने घसाघस घासून) उजळण्यात आम्ही गुंतलो. दुपार केव्हाच झाली. सुगरण सासवांनी चण्याची आमटी, सुरणाची कापं असा सर्वांचा आवडता पारंपरिक स्वयंपाक बनवला. त्यावर ताव मारून थोडी वामकुक्षी करून परत कामाला जुंपले. संध्याकाळपर्यंत घर चकचकू लागलं. एवढं काम करायची सवयच नव्हती. थकायला झाले, पण मजा आली.
आमच्याकडे गणपतीचा नैवेद्य म्हणजे उकडीचेच मोदक. पण गोव्यात नवर्‍या! त्याच्या खास प्रीतीच्या (आम्ही त्याला करंज्या म्हणतो आणि त्या दिवाळीलाच होतात). आता घरात एवढी माणसं, त्यात आला-गेला पैपाहुणा, लेकीबाळी (सासुर्‍याला आलेल्या), सगेसोयरे... त्यामुळे नेवर्‍यांचा नग चारशे ते साडेचारशे आणि दोन प्रकारचे (पीठाचे आणि बेसनाचे) लाडू शंभर-दीडशे. झाल्यास घरचा खास चिवडा, शंकरपाळे वगैरे ऐकून मला भोवळच आली. कसं व्हायचं एवढं? नेवर्‍यांचा मांड मांडला परत पुढच्या शनिवारी. कामावरून येईपर्यंत अतिशय कामसू सासूबाईंनी सारी जय्यत तयारी केलेली. पोळपाट, लाटणी, धुतलेले पाट, मोठ्ठ पातेलं भरून सारण (सुकं भाजलेलं खोबरं, खसखस, तीळ, गूळ, साखर, थोडा रवा आणि गव्हाचं भाजलेलं पीठ जायफळ, वेलची पावडर घातलेलं. हे सारण असं सुंदर दिसायचं की मोह व्हावा...), मैदा आणि भरायचं सारण यासाठी तसराळी, त्यात मापाचे बेतशीर चमचे, पात्यांच्या कडांना लावायला वाट्यातून पाणी आणि हलका काथा, कढया, झारे, वातीचा भला मोठा स्टोव्ह, तयार नेवर्‍या वारडू नयेत म्हणून त्यावर घालायला ओला पंचा आणि शेवटी तयार माल ठेवण्यासाठी कागद पसरलेला होता.
आम्ही सारे वेगवेगळ्या कामावर नेमले गेलो. २०-२५ वर्षांपूर्वी फूड प्रोसेसर वगैरे नसल्याने पीठ मळणे, तिंबणे हे सारे एका दिराकडे, साचे नसल्याने भरण्याचे काम एकाकडे, आम्ही काहीजणी फक्त पाती करण्याच्या कामावर, एक सासूबाई तळणीच्या तज्ज्ञ. स्टुलावर बसून स्टोव्हवरच्या कढईचा ताबा घेतला त्यांनी. कॅसेटवर ‘वस्त्रहरण’, ‘असा मी असा मी’, मध्येच नाट्यसंगीत, कधी जसराज, कधी मालिनी असं सतत चालूच. त्यात तोंडाचा पट्टा. म्हणता म्हणता झारा नेवर्‍यांनी ओसंडू लागला आणि मला एकीचे बळ काय असते याचे साक्षात उदाहरणच दिसले.
रात्री श्रमपरिहारार्थ पत्त्यांचा डाव रंगला. उरलेली कामे दुसर्‍या दिवशी अशीच हसत-खेळत. आता गणराज वेशीपर्यंत पोहोचलेच होते. हरितालिका येऊन गेली. पूजा झाली, कथा वाचली, आरती झाली, दिवसभर तर्‍हेतर्‍हेचा फराळ, वाती, फुलवाती, वस्त्र वगैरे चालूच होतं काहीबाही. कलेची नजर असलेल्या मंडळींनी सजावटीचा ताबा घेतला. (तेव्हा तयार मखरांची प्रथा नव्हती.) पताका लागल्या. जुनं सागवानी टेबल. त्याच्यामागे देखणा पडदा. टेबलावर सुंदर टेबलक्लॉथ, रंगीत दिव्यांच्या अन् फुलांच्या माळा अशी कलाकुसर झाली. माटोळीचे काम स्वतः सासर्‍यांनी हातात घेतले. ‘माटोळी’ हा प्रकार मला अनोखा वाटला. जयंतराव साळगावकर म्हणायचे तसा हा रानावनाचा (कारण मस्तक हत्तीचे) आणि माणसांचा (अर्ध शरीर माणसाचं) देव. उपलब्ध असलेली फळं अतिशय नेटकेपणानी माटोळीला बांधली आणि तशी बहरलेली रंगीत ‘माटोळी’ गणपतीपुढे छताला चढली. (तेव्हा पायीच जाऊन गणपतीला आणत. कारण गाड्या-घोडे कुठे होते.) टोप्या घालून झांजा घेऊन गणपती आणायला पोरंटोरं आणि मोठे निघाले. चंदनाच्या पाटावरून ‘मोरया रे मोरया गणपती मोरया’च्या गजरात, झांजांच्या आवाजात अखेर आगमन झाले. पायावर दूध-पाणी घालून आणि मीठ-मोहर्‍या ओवाळून त्याला घरात घेण्याचे मला सांगितले. घरच्या मोकळ्या वातावरणामुळे दडपण नव्हते. काही चुकलंबिकलं तरी गणपतीला ओवाळून घरात घेताना उगीचच भरून आलं. त्याच्या आगमनाबरोबरच एक शुचिर्भूत आनंदाची लहरच घरादारावर फिरली.
त्यावर्षी पाच दिवसांचा गणपती. मग रोजच उत्सव. सकाळी यथासांग षोडशोपचाराची पूजा, एकवीस दूर्वांच्या माळा, फुलांचे-जायांचे मुकुट, गोडधोडाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाची आवर्तने, सग्यासोयर्‍यांची ये-जा, सजावट बघायला येणारे गावकरी, अशी गोड लगबग. संध्याकाळी कुणीतरी दीर स्नान करून सोवळे नेसून सायंपूजा करायचा. मग सुरू व्हायचा आरत्यांचा दणका. सतरंज्या पसरायच्या, आरत्यांची पुस्तके, डफ, झांजा... अगदी डबेही वाजवण्यासाठी दाखल व्हायचे. गळ्यावर आरत्या म्हणणारे खंदे वीर पुढे मांड्या ठोकून बसायचे. आम्ही कोरसला मागे. पारंपरिक आरत्यांसोबत ‘शेंदूर लाल चढावो’, ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘येई हो विठ्ठले’ अशा चालींच्या आरत्यांची माळ लागायची. एवढा चेव यायचा की देवासमोर तबकात निरंजनं घेऊन असणार्‍याचा पुतळा झाला तरीही आरत्या थांबायच्या नाहीत. पण शेवटी ‘घालीन लोटांगण’वर यावंच लागायचं. मग धीरगंभीर ‘देवे’ चालायचे आणि सरतेशेवटी प्रसादांची लयलूट. फटाक्यांच्या लडी घेऊन पोरं केव्हाचीच चुळबुळत राहायची. (आमच्याकडे फटाके हा शब्द दिवाळीशीच जोडलेला.) असे कापरासारखे दिवस उडाले आणि विसर्जनाचा दिवस आला.
त्या दिवशी तर प्रत्येकाला या लाडक्यासाठी काय करू, काय नको होऊन गेलेलं. आज सायंपूजा आणखी मनोभावे. आरत्या आणखीनच दणाणत्या. मग आला विदाईचा क्षण. देवाला सांगणं करणं हा प्रकार मला खूप भावून गेला. माझे सासरे त्याला साकडे घालीत राहिले. सगळ्यांच्या मनातले. टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली. आजचा प्रसाद आणखीनच खपून बनवलेला. पण इथे गणपती विसर्जनाची प्रथा नसल्याने गणपती घरातच राहिला. गणपती न पोचवल्यामुळे खूप रिकामं नाही वाटलं. सगळ्या आठवणी फेर धरून राहिल्या.
आज २५-२६ वर्षांनी ते घर नाही. सारे वेगवेगळ्या जागी पण गणपती असाच. नात्यांची घट्ट वीण अद्यापि उसवलेली नाही. आता अधिक आधुनिक, सुटसुटीत झाली सारी तयारी. पण आपल्या घरी गणपती असण्याची फारशी असोशी पूर्वी नसणारी, मी मात्र त्याच्या आगमनाची नकळत वाट पाहत राहते. आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.

बाप्पा मोरया रे...

- प्रदीप तळावलीकर


पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते.





‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे जे नेमाने आणि नियमाने येत असते किंवा होत असते त्याबाबतीत म्हटले जाते. तद्वत यंदाची गणेशचतुर्थी उंबरठ्यावर आहे. गणेशचतुर्थी म्हटली की बाल असो की वृद्ध, अबला असो की सबला, साधू असो की संत, लेखक असो की वाचक, गरीब असो की श्रीमंत- सार्‍यांनाच प्रिय असते. आमच्यासाररखा वृद्धत्वाच्या सीमेवर लुडबुड करणार्‍यांना मग आपल्या बालपणातील चवथ आठवायला लागते आणि मन तासन्‌तास त्या आठवणीत गुंतून पडते... तेव्हा आज मी तेव्हाची आणि आताची अशा दोन कालखंडांतल्या चतुर्थीची गंमत अनुभवणार आहे.
कालची चवथ...
मला आठवते ती माझी पहिली चवथ. मी जेमतेम साताठ वर्षांचा असेन, तेव्हाची! आम्ही म्हणजे आमचे कुटुंब जरी पणजीला स्थायिक झालेले असले तरी चतुर्थीला आम्ही आमच्या फोंडा तालुक्यातल्या तळावली गावात जायचो. गावातल्या घरी गेल्याबरोबर पहिला प्रोग्राम असायचा तो म्हणजे गणपतीशाळेत जाऊन आमचा तयार होणारा गणपती पाहाण्याचा. आजोबांबरोबर मग आम्ही तळावलीपासून जवळच असलेल्या नागेशी गावी गणपती पाहायला जायचो. तो बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसरा प्रोग्राम असायचा तो फोंड्याला जाऊन माटोळीसाठी आणि एकंदर उत्सवासाठी फळफळावळ आणि भाजी आणण्याचा. या पहिल्या दोन दिवसांत रात्रीच्या वेळी मखर रंगवायचा कार्यक्रम व्हायचा आणि दिवसा माटोळीला फळ-भाज्या बांधण्याचा.
हे सगळे तयार होईपर्यंत मग तृतीया म्हणजेच तय उजेडायची. परंपरेनुसार आमच्याकडे चतुर्थी तीन दिवस साजरी व्हायची. तय, चवथ आणि पंचम. तयेच्या दिवशी पार्वती आणि शंकराची पूजा व्हायची. चवथीच्या दिवशी त्यांच्याबरोबर गणपतीचीही आणि पंचमीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीची उत्तरपूजा झाल्यावर मग विसर्जनाचा सोहळा व्हायचा. चतुर्थी आणि पंचमीच्या रात्री आरत्यांना फार धमाल यायची. कारण गावातले गावकरी आरत्यांना आमच्या घरी यायचे. ते सगळे घुमट आरत्या करायचे. फारच मजा यायची. त्यामानाने लहानशा असलेल्या त्या गावच्या घराच्या हॉलमध्ये जवळजवळ सत्तर-पंचाहत्तर लोक आरत्यांसाठी जमा व्हायचे. हॉलमध्ये आरत्या आणि आतल्या खोलीत प्रसादाचे द्रोण भरण्याची बायकांची लगबग, तर बाहेर पडवीत अस्मादिक आणि मित्रमंडळी पणजीहून येताना आणलेल्या माकावच्या फोगाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत. पंचमीच्या दिवशीची धावपळ साधारण अशी विभागलेली असायची. आरत्या वगैरे झाल्यानंतर मग पुजारी उत्तरपूजा सांगायचे आणि अचानक आमच्या लहानग्या मनावर बाप्पा आता घरी जाणार म्हणून एकप्रकारची रुखरुख लागून राहायची. विसर्जनासाठी जवळजवळ मैलभर चालून जावे लागायचे. त्यामुळे मूर्ती डोक्यावर घेऊन जायला आमच्या कुळागरांतील एकजण यायचा. त्याच्या मागे मग आमच्या घरातील वडीलधारी मंडळी आणि मग मध्ये मध्ये आम्ही लहानगी मंडळी. त्याकाळात घरातल्या बायकांनी बरोबर यायची प्रथा नव्हती. कारण कदाचित बरेच चालावे लागायचे हे असेल. पण आमची एकुलती एक बहीण मात्र त्यामुळे खट्टू व्हायची.
गावात विसर्जनाचे तळे बरेच दूर असल्यामुळे पायी चालत तिथपर्यंत जायला अर्धा-पाऊण तास तरी लागायचा. बहुतेक वाट शेतातून वा कुळागरांतून असल्याने एक-दोन पेट्रोमॅक्सही बरोबर असायचे. आम्ही मुले माकावच्या फोगांतील मारानाच्या फोगेटी मोकळ्या करून त्यांनी खिसे भरून घ्यायचो. मग उदबत्ती पेटवली की लावली फोगेटी! तळ्याकडे पोचेपर्यंत वाटभर एक-एक अशा त्या फोगेटी आम्ही लावायचो. प्रत्यक्ष विसर्जनाच्या वेळी लावायला एकतरी फटाक्यांचे बॉक्स ठेवावे लागायचे. तळ्याकडे पोचल्यावर तिथे बाप्पाची पुन्हा आरती केली जायची. नारळ फोडला जायचा आणि मग गणपतीची मूर्ती घेऊन तो माणूस हळूहळू तळ्याच्या पाण्यात उतरायचा. छातीपर्यंत पाण्यात गेल्यावर मग तो मूर्ती तीन वेळा पाण्याला स्पर्शून बाप्पा मोरयाच्या गजरात हळूच ती मूर्ती पाण्यात सोडायचा. तीरावर आम्ही सगळे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत देत गणपतीला निरोप द्यायचो. परत येताना एकप्रकारच्या निःशब्द शांततेत आम्ही सगळे येत असू.
पंचमीच्या दिवशी संध्याकाळी खिशात मोकळ्या फोगेटी भरून आम्ही मुले गावभर गणपती पाहायला जायचो. त्या काळात देखावे हा प्रकार जवळजवळ नव्हताच. गावातल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन भक्तिभावाने गणपती पाहायचा हेच आम्हाला ठाऊक असायचे.
चवथीच्या तीनही दिवशी जेवणाची चंगळ असायची. तयेच्या दिवशी पार्वतीसाठी खास तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ केले जात. त्यात तिच्यासाठी केलेली पंचपाल्यांची भाजी आणि पातोळ्या असायच्या. पण त्यात एक पातोळी मात्र नेहमीच अळणी असायची. गणपतीच्या जन्माच्या वेळी पार्वतीला अळणी पातोळ्या खायची जबर इच्छा होत होती म्हणे. चतुर्थीच्या दिवशी मोदक आणि सुकूर उंडे व पंचमीला भाताच्या शेतातील नव्या कणसांची पूजा करण्याची पद्धत गोमंतकात प्रचलित आहे. त्यानुसार त्या नव्यांसाठी खीर आणि जेवणात गोवन इडली म्हणजेच हीट; व ते बुडवून खाण्यासाठी नारळाचे गोड दूध. पंचमीच्या दुपारचे जेवण जेवताना मग दुसर्‍या दिवसाचे म्हणजे सष्टीच्या दिवसाला काय जेवण करावे यावर विचारविनिमय... तसा सर्वसाधारण सष्टीचा मेनू ठरलेला असायचा. मसूरचे मसाल्याचे तोंडाक व त्याबरोबर लावायला फ्राय केलेले हीट. म्हणजेच कालची इडली ही आज ब्रेड बनायची. आणि श्रावणानंतरच्या नॉनव्हेजचा पहिला दिवस असल्याने बरोबर ताजी ताजी मासळी. बहुतेक करून बांगड्यांचे त्रिफळे घालून केलेले तिखट हुमण व तळलेली मासळी.
आजची चवथ....
परंपरेनुसार आजही आमच्याकडे दीड दिवसाची चवथ असते. आता रीतीप्रमाणे आमच्याकडे तयेचा उत्सव असल्याने चवथ ही तशी तीन दिवसांचीच होते. वयोमानानुसार आज आमचे रोल बदललेले आहेत. म्हणजे पूजाअर्चा आता आमच्याकडे आहे, तर मखर रंगवणे, फोग लावणे, गणपती हातात घेणे आदी कामे आता तरुण आणि लहान मंडळी त्यांच्या-त्यांच्या उपस्थितीनुरूप करतात. बहुतेक मुले देशी-परदेशी असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती असते, पण उपस्थित असतात त्या वर्षाची चवथ ही एखाद्या उत्सवासारखी असते. नाहीतर मग जे आहेत ते आपली चवथ रीतीरिवाज, परंपरा सांभाळून शक्य तितक्या भक्तिभावाने साजरी करतात. आजही आमच्या आरती घुमटा-शामेळानेच होतात. आजही पातोळ्या, पंचपालेभाजी, मोदक, सुकुर उंडे, खीर, हीट हे सगळे होतच असते. आणि हो, सष्टीच्या नॉनव्हेज जेवणाचे प्लॅन्सही तसेच केले जातात. आता काळानुरूप मसूरच्या तोंडाकाऐवजी खिमा किंवा शागुती असे पदार्थही सुचवले जातात. कारण त्यांचेही हीटाबरोबर कॉम्बिनेशन बरे जमते.
विसर्जनाठिकाणी पायी जाण्याऐवजी आता गणपतीला गाडीतून सफर दिली जाते. बाकी सगळे तेच असते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेसाठी हल्ली भटजी मिळणे दुरापास्त झाले आहे असे दिसते. आणि तो मिळालाच तर त्याने वेळेवर येणे हे त्याहूनही दुरापास्त. घराण्याचा पुरोहित असला तर ते काम सोपे होते. पण पूजा चालू असताना भटजींच्या मोबाईलची रिंगटोन एकदोनदा वाजलेली गणपतीसह आपणा सर्वांनाच ऐकावी लागते. आता आता तर त्याची सवय सर्वांना होऊन गेलेली आहे. पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते. आणि देखावे दहा दिवस तरी ठेवीत असल्याने पहाणेही पंचमीचा दिवस सोडूनच होत असते. एकंदरीत तसे सगळे तेच असते, पण भक्तिभावात कुठेतरी कमतरता असल्यासारखे वाटते आणि घराघरांत माणसेही कमी झाल्याचे जाणवते. कालाय तस्मै नमः