गणपती येई घरा...

विजय कापडी
गणेशचतुर्थीचा सण तोंडावर आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सारे एकेक करत आमच्या जुन्यापुराण्या- एरवी बंदच असलेल्या- वडिलोपार्जित घरात प्रवेश घेत होतो. एव्हाना आधी येऊन थडकलेल्यांनी घर धुऊनपुसून साफ केलं होतं. ज्येष्ठ नागरिक जमले होते. तरणीताठी मंडळी आपापल्या नोकरी-धंद्यात एवढी म्हणून मग्न होती की त्यांना आधी येणं अशक्यच होतं. आधी येऊन रिकामं बसणं म्हणजे केवढंतरी आर्थिक नुकसान त्यांना सहन करावं लागलं असतं. ते त्यांनाही नको होतं आणि त्यांच्याकडच्या आमच्यासार"या रिकामटेकड्या ज्येष्ठांनाही! हरितालिकेच्या दिवशी सकाळी सकाळी येऊन थडकणार. तोपर्यंत जमल्यास सगळी तयारी करून ठेवा असं त्यांनी मोबाईलवरून कळवलं होतं.
...तर आमच्यापरीनं आम्ही तयारीला लागलो होतो. स्वयंपाकघरात बायका नेहमीच्या उत्साहानं कामाला लागल्या होत्या. जेवणावळीची आणि चतुर्थीत करण्याच्या पदार्थांची तयारी जोरात सुरू होती. दिवाणखान्यात कुणी मखर साफ करत होता तर कुणी माटोळीच्या लाकडी चौकटीवरची वर्षभरात साचलेली धूळ पुसून काढत होता. वजनदार टेबल ओढल्यामुळे एकाचा पाठीचा कणा दुखावला होता. तो आराम करत बसला होता. तेवढ्यात समोरचं दार वाजलं. "कोण बरं असेल?' असं स्वतःशीच पुटपुटत संथ पावलं टाकत मी दाराशी गेलो. दार उघडलं तर दारात गणपती उभा! सोंड असलेला, डोक्यावर सोनेरी मुकुट, खांद्यावर शाल, सुंदर पिवळे धोतर नेसलेला, चार हातांचा गजानन! पायाशी उंदीरमामाही होता. मी त्याला निरखून पाहिले. सोंड डाव्या बाजूला झुकलेली होती. गणपतीच्या दर्शनानं झालेला पोटभर आनंद वरकरणी न दर्शविता मी विचारता झालो, ""गणपतीबाप्पा... तू?''
""हो... मीच! ओळख नाही पटली? आता पटेल....'' असं म्हणत गणपतीनं आपल्या सोंडेनं माझ्या गालावर एक चापटी मारली. एका हातानं उगाचच गाल चोळल्यासारखं करत मी म्हणालो, ""पटली रे बाबा... ओळख पटली! पण तू एवढ्यात का आलास? तुला यायला अद्याप दोनतीन दिवसांचा अवधी आहे.'' मी भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे त्याचं लक्ष वेधवत म्हटलं.
""आहे हे ठाऊक! हे बघ, जादा शहाणपणा करण्याचं कारण नाही. माझ्या आगमनाची तयारी केवढ्यावर आलीय ते पाहायला आलोय,'' गणपती किंचित रागानं म्हणाला.
""बघ ना! पण आत प्रवेश मात्र करू नकोस. उगाच धांदल उडेल आम्हा सगळ्यांची. आम्ही सारे ज्येष्ठ नागरिक. दुसरं काम नाही म्हणून लवकर येऊन तयारी करतो आहोत. आमच्याकडच्या तरण्याताठ्यांना त्याचं काही नाही बघ. येतील हरितालिका वा चतुर्थीच्या दिवशी....''
""उगाच पिरपिरू नकोस रे... तुझ्यावेळचे दिवस आठव. त्यावेळी तूदेखील उशिराच यायचास आणि तुझ्याकडची वडीलमंडळी सारी तयारी करायचे.''
""बाप्पा... म्हणजे तुला सगळं आठवतं? आश्चर्यच आहे....''
""न आठवायला काय झालं? मी तुझ्यासारखा ज्येष्ठ नागरिक झालोय थोडाच!'' खणखणीत सुरात गणपती वदला.
""बाप्पा, यंदा काही खरं नाही बघ... महागाईनं पेकाट मोडून ठेवलंय... कसंतरी करून भागवणार आहोत.''
""आहे रे ठाऊक... दरवर्षीचीच पिरपिर आहे ती! आठवून बघ... गेल्यावर्षीच नव्हे, त्याआधीच्या वर्षीच नव्हे तर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वीही हीच रड होती. महागाईनं पेकाट मोडलं! अरे, पूर्वी तुमच्यातले पुढारी जरा कुठं महागाई झालेली दिसली की तुम्हा साऱ्यांना जमवून सरकारचा निषेध करायची, मोर्चा न्यायची, नारे द्यायची... आता सगळं थंडथंड का असतं रे? आणि एक लक्षात ठेव, महागाईनं वाढायचंच असतं. कमी होते ती महागाई कसली?''
""आहे रे ठाऊक...'' असं गणपतीलाच म्हणायचा चान्स घेत मी म्हणालो, ""पण यंदाची महागाई काही वेगळीच आहे बघ!''
""वेगळीबिगळी काही नाही! अरे, तुम्ही आम आदमी ना रे? आम आदमीचं काम काय आहे ठाऊक?'' गणपतीनं जरा कठीणच प्रश्न विचारलेला दिसला तेव्हा मी उत्तरलो, ""बाप्पा, सोपे प्रश्न विचारायला काय घेशील?''
""मोदक आणि लाडू...'' हसत चटदिशी गणपती उत्तरला.
""ते मिळतील रे तुला! पण तुझ्या त्या प्रश्नाचं काय? आम आदमीनं काय करायचं असतं?'' मी भुवया उंचावत विचारलं.
""पूर्वीचे आम आदमी एक प्रामाणिक पुढारी निवडायचे आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सरकारला सळो की पळो करून सोडायचे. लक्षात ठेव, सरकार हे नेहमीच कुंभकर्णासारखं निद्रिस्त अवस्थेत असतं. त्यावर आम आदमीचा अंकुश हवाच!''
मी गणपतीला पुढं बोलू न देता म्हणालो, ""पण प्रामाणिक पुढारी आहेत कुठं? शिवाय सरकार कुंभकर्णाप्रमाणं झोपलेलं असतं असंही नाही. स्वतःच्या स्वार्थाच्यावेळी डोळ्यांत तेल घालून ते जागृतावस्थेत असतं!''
गणपती मला पुढं बोलण्याची संधी न देता म्हणाला, ""तेच तर मला म्हणायचंय. तुमचे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा सरकार झोपी गेल्याचं ढोंग करतं. ते खडबडून जागे होईल असं काहीतरी करायला हाती घ्या. दुसरी गोष्ट प्रामाणिकपणाची. तू स्वतःला प्रामाणिक समजतोस का अप्रामाणिक ते आधी सांग....''
""मी कसला प्रामाणिक? मत द्यायच्यावेळी मी पैसे घेतले. फुकटचं खाणंपिणं झोडलं. मोफतच्या सहली केल्या. देवदर्शनही उरकून घेतलं.''
""आता कसं बोललास? अरे, तूच जेव्हा अप्रामाणिकपणाचा कळस आहेस तेव्हा तुला प्रामाणिक पुढारी भेटणार कसा? हे जे सगळं चाललंय ना, ते सगळं तुझ्याच कृपेनं बरं....'' गणपतीनं सगळा दोष माझ्यावरच ढकलल्याचं जाणून मी नाही म्हटलं तरी घाबरलोच! विषय बदलण्याकरता म्हणालो, ""आज आम आदमीचं जीवन अस्थिर झालंय. केव्हा कुठं बॉम्बस्फोट होईल आणि आमचे प्राण जातील समजेनासं झालंय. मला सांग, अशावेळी तू स्वतःला विघ्नहर्ता म्हणवतोस, तू का नाही रे धावून येत आमच्या मदतीला?''
मला वाटलं मी गणपतीला चांगलाच पेचात पकडला. पण कसंच काय आणि कसंच काय! गणपती हसून म्हणाला, ""ते घडतंय तेसुद्धा तुझ्याचमुळे! अरे, बॉम्बस्फोट घडवून आणणारा तुमच्यातलाच एक असतो ना? त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत तुम्हीच तर करता! त्याला आसरा देताना सावधगिरी बाळगता? तो खूप खूप पैसे देतो आहे म्हणून त्याच्या अघोरी कृत्याकडं काणाडोळा करता की नाही?''
गणपतीच्या पेचानं मी चांगलाच उताणा पडलो होतो. काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणालो, ""हा पैसा आहे ना तोच सगळ्या समस्यांचं कारण आहे. अरे, मोठमोठ्या बॅंकेतल्या ट्रेझरीमध्ये बनावट नोटा सापडू लागल्या आहेत...''
""पुन्हा तेच! त्या बनावट नोटा कुणी ठेवल्या? संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय ही गोष्ट घडून येणे शक्य आहे का? तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता पण बनावट नोटांच्या बाबतीत तुम्ही गरीबच तर त्यांना मदत करता!'' गणपतीनं आणखीन एका दारुण सत्याचं दर्शन घडवलं.
""बनावट आणि खऱ्या नोटांच्या व्यवहारात भरपूर फायदा असतो गणराया... पण काय करणार?'' मला चेहरा पाडावा लागला नाही, तो पडला!
""हीच जर तुमची विचारधारा असेल तर प्रत्यक्ष देव म्हणजे त्यात मीसुद्धा आलोच- तुमची मदत करू शकणार नाही, लक्षात ठेव.'' गणपतीनं माझे जणू कानच उपटले.
""यावर उपाय सांगा गणराया...'' मी त्याचे पाय धरले.
""उपाय सांगणारा मी कोण? मानवजात ही परमेश्वराची सर्वात मोठी निर्मिती. विचार करण्याची शक्ती केवळ मानवातच आहे. त्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याऐवजी ती भलतीकडंच वळवून स्वतःची तेवढी तुंबडी भरण्याचे तुम्ही सारे जेव्हा बंद कराल तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या समस्यांना तुम्ही सोडवू शकाल.... बरं येतो मी! ठरलेल्या दिवशी येतो आणि उरलेलं सगळं सांगतो. तोपर्यंत आता जे सांगितलं त्यावर विचार कर. आणि नुसताच विचार करत न बसता कृतीही कर! तर मग येऊ मी?''
....आणि सोंडेनं माझ्या गालावर पुन्हा प्रहार केला. मी गाल चोळत उभा राहिलो. एवढ्यात घरातले इतर सारे माझ्याभोवती जमा झाले. रागानं विचारू लागले, ""काय झालं? दारात विठोबासारखा उभा राहून गणपतीची तयारी होईल कशी? चल... ते टेबल ओढायला मदत कर... कामचोर कुठला!''
दारात उभा राहून साक्षात गणपतीशी वरच्या पातळीवरची चर्चा करत होतो. तुम्हाला त्यात काय रस असणार? असं म्हणणार होतो, पण म्हणालो नाही. मुकाट्यानं ते सांगतील ते काम करू लागलो...

1 comment:

Unknown said...

&nbspपार्थिव गणपतीचे पूजन करताना जर आपण शोडोपशार पूजा करणार असताल तर प्रथम एक विडा(विद्याचे पान ,सुपारी,एक रुपयाचे नाणे ई.) घरातील देवासमोर ठेवावे.देवाला नमस्कार करावा आणि देवाला प्रार्थना करावी कि तुझ्या आशीर्वादाने सर्व विधी व्यवस्थित होऊ देत यात कोणतीही बाधा येऊ देऊ नकोस.
नंतर घरातील सर्व वडील-धारी माणसांच्या,गुरुजींच्या पाया पडून पुजेस बसणे.
नंतर आधी डोळ्याला पाणी लावून आचमन करावे.यावेळी श्री भगवान विष्णू ची २४ नावे घेऊन गायत्री मंत्र म्हणावा.नंतर आपल्या सर्व ग्राम देवता,मातृ-पितृ,कुलदेवता,यांचे स्मरण करून एक संकल्प सोडावा.संकप सोडताना आधी उजव्या हातात एक चमचा भर पाणी आणि अक्षदा घ्याव्यात आणि मग संकल्प सोडवा कि मी(पूजा करणार्याचे नाव)माझ्या पूर्ण मानाने,माझ्या सर्व कुटुंबासोबत,गणपतीचे पूजन करीत आहोत तरी आम्हाला तुम्ही सर्व पिडा यापासून आमचे संरक्षण करावे व आम्हाला सर्व जणांना योग्य ते फळ मिळावे.

नंतर 'वक्रतुंड महाकार्य ...' या शोल्काने सुरवात करावी नंतर आपल्या गणपतीच्या उजव्या बाजूस एक सुपारी ठेवावी त्या सुपारी वर अक्षदा वहाव्यात नंतर ती सुपारी ताम्हनात घ्यावी.नंतर त्या सुपारी वर पार अक्षदा व्हाव्यात.नंतर त्या सुपारी वर २ चमचे साधे पाणी नंतर अर्घ्य(पाणी+अक्षदा+गंध) घालावे नंतर ५ चमचे पंचामृत(साखर+तूप+मध+दुध+गुळ यांचे मिश्रण )घालवे.नंतर ती सुपारी स्वच्छ पाण्याने दुहून घ्यावी व पुसून पुन्हा जागेवर ठेवताना त्या सुपारी खाली अक्षदा ठेवाव्यात.नंतर त्या सुपारीस गंध,अक्षदा,फुल वाहावे.व नमस्कार करावा.नंतर अनुक्रमे दीप,धूप हे सुपारीला ओवाळावे व नमस्कार करावा.

नंतर दिवा आणि घंटी यांची पूजा करून घ्यवी. नंतर मुख्य मूर्ती ची पूजा करावी.

हि पूजा करताना


प्रथम गणपतीच्या मूर्तीस अक्षदा वहाव्यात.
गणपतीच्या अंगावर फुलाने पाणी शिंपडावे
नंतर अर्घ्य(पाणी+अक्षदा+गंध) शिंपडावे.
नंतर पंचामृत(साखर+तूप+मध+दुध+गुळ यांचे मिश्रण ) शिंपडावे
दुसर्या फुलाने गणपतीच्या अंगावर फुलाने पाणी शिंपडावे.
नंतर या पंचामृताचा नैवेद्य गणपतीस दाखवावा.
नंतर आणखी एक फुल घेऊन ते गणपतीस अर्पण करावे.
नंतर आपण गणपतीस अभिषेक करणार आहोत यासाठी आपण गणपती अथर्वशीर्ष वापरावे.ते सुरु करण्या आधी आपण फुला वाहिलेले त्याचा वास घेऊन ते आपल्या उत्तरेस म्हणजेच डाव्या बाजूस टाकावे.व मग गणपतीच्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे.
अथर्वशीर्ष संपल्यावर गणपतीस जानवे,लाल फुले ,दुर्वा ई अर्पण करावे.नंतर एक न वाहिलेया दुर्वेची कडी धेऊन ती तुपात बुडवावी आणि गणपतीच्या डोळ्यास लावावी.
नंतर आपला उजवा ह्हात गणपतीच्या छातीवर ठेऊन १५ वेळा ओम चा जप करावा नंतर गणपतीस हात लाऊ नये.नंतर गणपतीस मोदकाचे नैवेद्य दाखवून आरती करावी.

आशा प्रकारे पार्थिव गणपतीचे पूजन केल्यास सिद्ध होते.