आधुनिक गणेशोत्सव - एक विवाद्य चिंतन

डॉ. नंदकुमार मुकुंद कामत


आमचे कुलदैवत मूळ नावेली- दिवाडी येथे कदंबकाळात स्थापन झालेले व नंतर ताळगाव, खांडेपार येथे हटविले जाऊन शेवटी खांडोळ्याला प्रतिष्ठापित झालेले "श्री महागणपती' होय. माझ्या स्वर्गवासी वडिलांइतका गणेशभक्त मी पाहिलेला नाही. ते संपूर्णतया गणेशमय झाले होते. त्यांचा वारसा मी घेतला नाही. मी अद्वैतवादी, ब"ह्मवादी, निर्गुण, निराकारवादी. नास्तिक नसलो तरी अज्ञेयवादाकडे झुकणारा. सर्व धर्मांची निर्मिती मानवानेच केली असल्याचे मानणारा व प्राचीन तत्त्वज्ञानाकडे झुकणारा. कर्मकांड, पूजापठण, होमहवन, धर्मकृत्ये, जप-जाप्य यांत मला मुळातच रस नव्हता. त्यामुळे जिज्ञासेतून जेव्हा वडिलांच्या श्रद्धेचा शोध घेऊ लागलो तेव्हा भारतीय संस्कृतीचाही साक्षात्कार होत गेला. याच जिज्ञासेतून गणेशदैवताचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. काळानुसार या संस्कृतीप्रतीकावर अनेक पुटे, आवरणे, लेप चढले आहेत. ते दूर करीत गेलो तेव्हा सत्यदर्शन झाले- गणेश या नावाचे दैवत वैदिक काळात नव्हते. गणेशाचे मूर्तीस्वरूप पौराणिक आहे, कल्पनातीत आहे, अशक्य कोटीतील आहे. हत्तीचे प्रचंड मस्तक मानवी धडावर बसविणे केवळ अशक्य आहे. मग हा आकार, ही प्रतिमा, हे स्वरूप कसे निर्माण झाले? श्रीज्ञानेश्वरांनी गणेशाचे आदिरूप प्रकट केले आहे. जगातील सर्वात प्रबळ व पुरातन यातुविद्या भारतात होती. जगातील सर्वात क्लिष्ट तंत्रसाधना भारतात होती. या साधनेला मुस्लीम आक"मणांपर्यंततरी लोकमान्यता व राजमान्यता होती. तांत्रिकांनी, हठयोग्यांनी अंतर्नेत्रांनी गणेशरूप पाहिले. ते एक ब"ह्मांडदर्शनच असावे. अनेक संस्कृतीप्रवाहांच्या संगमांतून आजचे 21व्या शतकातील आधुनिक गणेशपूजन निर्माण झाले आहे. परंपरा आणि नवता यांचा चमत्कारिक संगम भारतात ठिकठिकाणी आढळून येतो. 21व्या शतकातील खरे गणेशदैवत म्हणजे संगणकरूपी गणेशच म्हटले पाहिजे. कारण श्रीगणेश हे विद्येचे दैवत आहे. शुभारंभाचे दैवत आहे. शाळेत आम्हाला पाटीवर अ, आ, इ, ई गिरवण्यास देण्यापूर्वी "श्रीगणेशायनमः' काढायला लावायचे. त्यानंतर "ओम नमः सिद्धम्.' हे तर चक्क हिंदुत्वपूर्व जैन श्रमण, सिद्ध, तीर्थकर परंपरेला नमन होते. कारण याच धाडसी जैन प्रवाशांनी, त्यांच्या सार्थवाहांनी, वणिक संघांनी सिल्क रोडद्वारे गणेशदैवत मध्य आशियापासून दक्षिणपूर्व आशियापर्यंत पोचविले. बुद्धाची "गणपतीसमक"ांत' अशी एक प्रतिमा आहे. बौद्धांनी गणेशमहिमा पुसून काढण्याचा, यज्ञसंस्कृती संपविण्याचा खटाटोप केला, पण शेवटी त्यांच्याचबरोबर गणेशमहिमा, गणेशप्रतिमा कोरिया, जपानपर्यंत पोचल्या. दर्यावर्दी व्यापाराबरोबर कोलंबसपूर्व काळात त्या प्रशांत महासागर पार करून मध्य व दक्षिण अमेरिकेतही पोचल्या असाव्यात असे मानण्यास वाव आहे. हिंदुत्ववाद्यांपासून कट्टर मार्क्सवाद्यांपर्यंत अनेकांनी गणेशदैवताची चिकित्सा केली आहे. लोकमानसातील, लोकवेदातील गणेश वेगळा दिसतो. नाट्यशास्त्रातील गणेश वेगळा दिसतो. मंदिरांतील गणेशाची सुबोध, मनोहारी व दुर्बोध रूपेही आहेत. गुप्त, बदामी चालुक्य, होयसळ आणि विजयनगर काळात सर्वोत्कृष्ट गणेशमूर्त्या तयार झाल्या असे आज अभ्यासपूर्वक सांगता येते. पण आजचा 21व्या शतकातील गणेश या सर्व परंपरांहून वेगळा आहे. चौथ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत भारताने गणेशदैवताचे सांस्कृतिक ग्लोबलायझेशन केले होते. आज ग्लोबलायझेशनमुळे गणेशपूजन, गणेशोत्सवावर एक बाजारू सावट पसरले आहे. नुसते मूर्तीरूप घेतले तरी एक सत्य स्पष्टपणे कुणालाही समजावे की गणेश हे पृथ्वीस्वरूप- पृथ्वीप्रतीक- जीवगोलप्रतीक आहे. मूर्तिकार कच्च्या मातीच्या गोळ्याला गणेशमूर्तीरूप देतात. भजक, भक्त त्या मूर्तीत समंत्रोपचार "प्राणप्रतिष्ठा' करतात. हे प्राचीन यज्ञीय यातुविधीचेच एक सूत्र असते. पूजा होतात, प्रार्थना होतात, भजने, आरत्या, फुगड्या होतात. प्रसाद, नैवेद्याद्वारे समर्पण भावना व्यक्त होते. या सर्वात आज एक निरर्थकता दिसू लागली आहे. आवाज, गोंगाट कमी करावा, प्रदूषण कमी करावे, सवंगता, उथळपणा टाळावा याकडे कमी लक्ष दिले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवांची तर आता एक भलीमोठी बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे ज्या मूळ भव्य, शुद्ध, उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी ही परंपरा राष्ट्रजागृतीसाठी जिवंत केली ती परंपरा काही सन्मान्य अपवाद वगळता उद्ध्वस्त झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्यासपीठे केवळ करमणूक, मनोरंजन, लोकानुरंजनाची व्यासपीठे बनू लागली आहेत. लोकांना आवडणाऱ्या, गर्दी खेचणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत तर शामियाने, मंडप ओस पडतील अशी रास्त भीती गणेशोत्सव मंडळांना वाटणे साहजिकच आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मध्यवर्ती महासंघ नाही. आचारसंहिता नाही. असा महासंघ व आचारसंहिता अस्तित्वात असती तर लोकमान्य टिळकांच्या उद्दिष्टांना जागून गणेशमंडळांना प्रभावी कार्य करता आले असते. भारतीय मन भोळे, भाबडे, धर्मभीरू, पापभीरू आहे. शेंदूर फासलेला दगड दिसला, एखादी गुढी, पताका दिसली तरी माणसे हात जोडतात. म्हणून गणेशोत्सव मंडळे वाढली तरी गर्दी होतच राहणार. पण आपल्या समाजाचा गुणात्मक विकास भक्तीच्या सामुदायिक देखाव्यातून होणार नाही. त्यासाठी रामदासी बाणा हवा. गणेश हे पर्यावरणीय दैवत म्हणून आधुनिक काळाची पावले ओळखून पर्यावरणपूरक उपक"म करा- घरापासून सार्वजनिक चौकापर्यंत. घरात व बाहेर ध्वनिप्रदूषण टाळा. गोंगाट टाळा. जिथे वैदिक मंत्रोपचारयुक्त पूजा होते तिथे भडक व उत्तान, निरर्थक गाणी, संगीत मुळीच वाजवू नका. गीत व संगीताच्या निवडीकडे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. रोषणाईत विजेचा अपव्यय टाळला पाहिजे. दारूकाम, आतषबाजी माफक असावी. त्यापेक्षा सभोवतालच्या भुकेल्यांना अन्न द्या. जेवणावळी घ्या. अन्नछत्रे उघडा. देशाला, राज्याला, समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चासत्रे घ्या, वक्तृत्वस्पर्धा घ्या, पाककला स्पर्धा भरवा. वनस्पती, पुष्पप्रदर्शने भरवा. पण गोव्यात कुठेच कल्पकता दिसत नाही. वैयक्तिक पातळीवर गोव्यातील हिंदू गणेशभक्तांना बरेच काही करता येईल. त्यांनी इतर धर्मीयांना तीर्थ, प्रसाद, पूजा, आरत्यांसाठी बोलवावे. अनेक ख्रिस्तीधर्मीयांच्या दिवाणखान्यात गणेशमूर्ती आहेत. मुस्लीम मूर्तीपूजाविरोधक असले तरी गोव्यात उत्साहाने गणेशोत्सवात भाग घेतात. त्यांच्या मनात कुणी "जिहादी' विष कालविण्याचा प्रयत्न करू नये. गणेश हे बुद्धीचे, विद्येचे दैवत आहे आणि 21 वे शतक हेसुद्धा ज्ञान, बुद्धी, संकल्पनांना वाहिलेले शतक आहे. म्हणून गणेशोत्सवाचे उपक"म विद्याभिमुख, ज्ञानाभिमुख व्हावेत. 21व्या शतकात संगणक हा संगणक नसून "संगणेश' आहे आणि गणेशाप्रमाणे जगावर भारताची प्रतिभा मिरविणारा हा "संगणेश' राज्य करील हे गणेश आणि संगणेशभक्तांनी ठासून सांगावे. जसा गणेशचरणी वाहनरूपी मूषक तसा संगणेशचरणी "माऊस' आपण वापरतो. हा योगायोग नसावा. कालानुरूप प्रतीके बदलतात. भारतीय प्रज्ञेने, भारतीय प्रतिभेने जगावर राज्य केलेले आपल्याला हवे असेल तर आपल्या गणेशभक्तीला, गणेशपूजनाला व एकूणच गणेशोत्सवाला आपण एक व्यापक अर्थ दिला पाहिजे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

No comments: