भक्तिप्रेमाची सगुण मूर्ती

ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर

भक्ती आणि प्रेम हे दोन भावविशेष माणसाचे जीवन अधिक समृद्ध करणारे आहेत. कोणत्याही स्थितीत असलेल्याला जगण्यात आनंद वाटावा, अशी स्थिती निर्माण करणारे आहेत. भक्तीत प्रेम असते, पण प्रेमात नेहमी भक्ती असते असे नाही. मुलाच्या आईवरील प्रेमात भक्तीचा काही अंश जरूर असतो, पण आईचे मुलावरील प्रेम हे वात्सल्यमय असते. त्यात भक्तीचा लवलेशही नसतो. असूही नये. मोठ्या भावावर असलेल्या प्रेमाला काहीवेळेला भक्तीची जोड मिळते. पत्नीचे पतीवरील प्रेमही क्वचित भक्तीच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचते. पण सामान्यतः भक्ती ही वेगळी गोष्ट, मात्र भक्तीमध्ये प्रेम असावेच लागते, कारण भक्तीत जिव्हाळा ओतायचा झाला, तर तो प्रेमाशिवाय ओतता येणे शक्य नाही. म्हणून तर मधुराभक्तीचा महिमा विशेष प्रमाणात गायिला जातो. मधुराभक्ती म्हणजे परमेश्र्वर हा आपला पती आहे आणि आपण त्याच्या प्रेयसी किंवा पत्नी आहोत, अशी भावना निर्माण होणे. ही भावना उच्चतम भक्तीची निदर्शक आहे, असे पूर्वापार समजले गेले. म्हणून तर संत कबीर म्हणतात, ""एक एक गोपीके प्रेममें, बह गए लाख कबीर।।''

सकाम आणि निष्काम भक्ती

आपण देवाची भक्ती करतो त्यावेळेला सकाम भक्तीत प्रेम असेलच असे नाही. निष्काम भक्तीत मात्र प्रेमाचा अंतर्भाव होऊ शकतो. पण विठुराया किंवा गणराया यांच्यावर मराठी माणूस जे प्रेम करतो, ते प्रेम "या सम हे' या जातीचे आहे. नीट विचार केला तर ध्यानात येईल, विठ्ठलाच्या दरबारात हजर होण्यासाठी जसे लाखो वारकरी तहानभूक विसरून दर आषाढीला पंढरपुरात गर्दी करतात, किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो गणेशभक्त गुलालाने आनंदात रंगतात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात, तसा भाग्ययोग इतर देवतांच्या कुंडलीत क्वचितच आढळेल. श्रीविठ्ठल आणि श्रीगणेश ही महाराष्ट्राची लोकदैवते आहेत. या दोन्ही दैवतांवर मराठी माणूस मनापासून प्रेम करतो आणि तुकोबांनी तर विठ्ठल आणि गणपती हे वेगवेगळे नाहीत असे सांगणारा एक अभंगच लिहिला. विठ्ठलावर संतकवींनी ज्या विविध रचना केल्या, त्यात विठ्ठलाला नको ती संबोधनेही वापरली. त्याला प्रेमाने दुरुत्तरेही केली. त्याचे कौतुक किती केले याला तर सीमाच नाही. विठ्ठल हा संतांच्या प्रेमाचा विषय आहे आणि म्हणाल तर गणेश हासुद्धा गणेशभक्तांच्या प्रेमाचा विषय आहे.

मनोहारी श्रीगणेश

अगदी मनापासून ज्याच्यावर प्रेम करावे, असा गणपती हा देव आहे. तो चार हात, मोठे कान, वाकडी सोंड या रूपामुळे थोडा वेगळा वाटत असला तरी त्याचे ते रूपही मनोहर आहेच आणि आपला विठुराया तर असा आजकालच्या नजरेने "सुंदर' वाटावा असा कुठे आहे? पण भक्तांच्या नजरेला तो "मदनाचा पुतळा' वाटतो. तुकोबा त्याला "सुंदर ते ध्यान' म्हणतात. प्रेमाचाच हा प्रकार आहे. प्रेमाच्या नजरेने पाहिले तर विठ्ठल जसा सुंदर वाटतो, तसा गणपतीही सुंदर वाटतो. आणि आणखी एक गोष्ट. गणपती हा तुमच्या - आमच्यासारखाच सर्वसामान्यांच्या आवडीनिवडीत रमणारा, रंगणारा देव आहे. त्याला गोडधोड आवडते, तो आनंदात असला की नाचतो. नाचायला लागला की सगळे जग स्वतः विसरतो आणि इतरांनाही विसरायला लावतो. तो खोडकर आहे. वडिलांच्या डोक्यावरचा चंद्र लपवून तो त्यांचीही खोडी काढण्यास कमी करीत नाही. सर्वसाधारण मुलांसारखा तो आपल्या भावाशी भांडतो. भांडण सोडवण्यासाठी आईला साकडे घालतो. तो प्रेम करतो, लढतो. आपण आयुष्याच्या ज्या ज्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, त्या सर्व परिस्थितीतून कसे शिताफीने निभावून जावे याचे प्रात्यक्षिकच जणू त्याने आपल्या विविध अवतारांत दाखविले आहे.

सर्वांमध्ये रस असलेला देव

मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि आवडीच्या वाटतात, त्या सर्व गोष्टींमध्ये रमणारा देव म्हणजे गणपती. गणपती हा गोडधोड खाणारा आहे. त्याला "लाडू मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे' प्रसन्न करतात. तो मोजकेच का होईना, पण अंगावर दागिने घालतो. पण असे असले तरी तो सुखासीनतेत रमणारा देव नाही. वेळप्रसंग घडला तर तो हातातील शस्त्रांचा उपयोग करायला मागेपुढे पाहात नाही. तो देवांचा सेनापतीही आहे. असे सांगतात की, 21 शिपायांचा एक गट असे 21, पुन्हा या 21 गटांचा एक मोठा गट असे 21 मोठे गट अशा पद्धतीने गणपतीने आपले सैन्य उभारले आणि सैन्याच्या अशा स्वरुपाची रचना आजही केली जाते. गणपती सेनापती म्हणून इतका श्रेष्ठ आहे की तो रणांगणात कधीही हरलेला नाही. तो निरंतर अजेय आहे. बरे, असे असूनही तो केवळ लढणारा शिपाई गडी नाही. त्याला नृत्य, नाट्य, गायन अशा कलांमध्ये विशेष रस आहे. "गणराज रंगी नाचतो' असे आपण कौतुकाने म्हणतो. सिद्धि - बुद्धि अशा दोन पत्नी निरंतर त्याच्यासोबत असतात. वादविवादात, लढाईत जिंकायचेच अशा निष्ठेने तो वावरतो. आपण लढाईत कमी पडू अशी शंका आली तर कपटाचा डाव मांडण्यासही तो मागेपुढे पाहात नाही. गणेशाचे हे स्वरूप म्हणूनच आपल्याला विलोभनीय वाटते आणि त्यामुळेच गेली काही हजार वर्षे आपण मनोभावे त्याचे पूजन करीत आलो आहोत आणि त्याबरोबरच त्याच्यावर मनापासून प्रेमही करीत आलो आहोत.

रूप गणेशाचे...

अरुण दाभोलकर

दाभोली. तळकोकणातलं एक छोटंसं गाव. पानं, फुलं, डोंगर, दऱ्या, समुद्र आणि किनाऱ्यांन नटलेलं. चित्रकारानं काढलेल्या चित्रातल्यासारखं. मी इथंच जन्माला आलो. माझ्या घराभोवतीच्या नारळ - पोफळीच्या बागा, आंबा - काजूचे डोंगर, खानोली - वायंगणीचा समुद्र आणि त्याच्या फेसाळ लाटा... याच मातीत माझ्या चित्रकलेची बीजं रुजलीयत... या साऱ्याचा विचार करताना आठवणी दाटतात त्या आमच्या घरालगतच्या करंगुटकरांच्या कुटुंबाच्या. या कुटुंबातील सर्वच माणसं प्रतिभावंत चित्रकार. कारागीर. माझं चित्रकलेबद्दलचं आकर्षण, आवड, समज ही त्यांच्या गणपतीच्या शाळेशी, त्या सर्व माणसांशी निगडित आहे आणि आज सगळे ओळखतात ती "दाभोलकरी चित्रशैली' करंगुटकरांच्या मला लाभलेल्या सहवासाची देणगी आहे.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या हाती एक नितांत सुंदर, स्वस्त, प्रवाही आणि तुटपुंज्या वेळात झटपट काम करता येणारं रंगमाध्यम मिळालं. कॅम्लीन वॉटरप्रुफ इंक बाजारात आली आणि मी त्यावर चक्क तुटून पडलो. हा काळ होता 1980 चा. ही रंगीत शाई काम करताना एवढ्या बेमालुमपणे एकमेकांत सामावून जाते की मूळ रंग, छटा आणि त्याचं अस्तित्व कायम राखूनही मनात असणारे, नसणारे, अगोदरच न ठरवलेले अनेक मूर्त आणि अमूर्त आकार सहजगत्या आपणहून साकारतात.
असाच एकदा रंगशाईशी खेळत होतो. रंग, कागद, ब"श यांची जुळवाजुळव करीत होतो. संकष्टचतुर्थीचा तो दिवस होता. म्हटलं - कागदावर आज एक गणपती काढावा म्हणून सुरुवात केली... आणि रंगांच्या त्या झटपट खेळातून, बेजबाबदार रंगभरणीतून डोळ्यांना सुखावणारा एक मंगल आकार तयार झाला. मी स्वतःच अवाक झालो! काहीही न ठरवता हा विलक्षण प्रतिभा असणारा आकृतीबंध कागदावर उमटलाच कसा, याच्या आश्र्चर्यातून सावरायला बराच वेळ लागला. त्यानंतर दिवसभरात पहिला गणपती, दुसरा, तिसरा असे गणपतीचे मूर्त - अमूर्त असे खूप आकार तयार झाले.
त्यापुढील आठ - दहा दिवस रंगांनी आणि त्यांच्या नेत्रदीपक दर्शनाने झपाटलो. कल्पनेत नसणारे, न ठरवलेले आणि तरीही गणपतीसारखेच भासणारे, मंगल आकार तयार झाले. आठ दिवसांनीही तंद्री उतरेना.
गेली 32 वर्षे माझ्या हातून हजारो गणपती आकाराला आले. मुळात गणपतीचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रचंड प्रेम हेच मला "गणपतिवाले दाभोलकर' म्हणून नावरूप देणारे ठरले. काही वर्षांपूर्वी मी बेळगावला एका प्रदर्शनाच्या निमित्ताने गेलो होतो. त्या प्रदर्शनातील गणपतीची रूपं ही कर्नाटकी साज घेऊन अवतरली होती. काळ्या रंगातील गोलघुमट असे ते गणपती माझ्या मनात घर करून होते. मुळात गणपती हा गोलाईच्या रूपात तुम्हाला दिसत असतो, अशी माझी तरी धारणा आहे. डोके, छाती, पाय, हात हे सगळे भाग एका सुरवातीच्या काळात गोलाकार असतात.. आणि मी त्याला फिनिशिंग देतो इतकंच. तर काळ्या पाषाणात कोरल्यासारखे ते कर्नाटकी गणपती शिल्पाच्या रूपात मी आकारले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. 20 वर्षांपूर्वी या काळ्या पाषाणी गणपतीच्या गि"टिंग कार्डस्ना महाराष्ट्रातच नव्हे, अवघ्या भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली.
पंढरपुरला तर माझं बऱ्याच वेळा जाणं झालंय. पांडुरंगाच्या त्या मूर्तीसमोर गेलं की भान हरपायला होतं. तहानभूक विसरून विठोबाच्या ओढीने लाखो वारकरी पंढरीला का धाव घेतात, हे त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाल्यानंतरच लक्षात येते. हाच अनुभव पांडुरंग गजाननाच्या रूपात साकारताना मला आला. विटेवर उभा असलेला आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेल्या या गणरायाच्या मागील लाल, पिवळा, निळा असे असं"य रंग गाभाऱ्याचा भास निर्माण करतात. हे चित्र आता डिजिलट प्रिंटिंगच्या अत्याधुनिक तंत्राने मोठ्या आकारात आणता आल्यामुळे त्याला एक वेगळाच टच निर्माण झालाय. सध्या या चित्राला खूपच मागणी आहे. अलीकडच्या काळातहा हा माझा सर्वांत लोकप्रिय गणपती.
माझ्या हातून उतरलेल्या अशाच आणखी एका गणेशाच्या आकाराने खूप समाधान मिळवून दिलं ते म्हणजे संपूर्ण लाल रंगातील नृत्य करणारा गणपती. रंग आणि नृत्य यांचा तो अफलातून मिलाफ होता. हे चित्र काढून आता बरीच वर्षं झालीत. तरी आजही त्याच्याकडे मी पाहतो, तेव्हा तो मला नुकताच काढल्यासारखा वाटतो...
ठरवल्याप्रमाणे मला कधीच कुठलं चित्र काढता आलेलं नाही. गणपतीचं तर नाहीच नाही. मुंबईहून दाभोली गावी परत गेल्यानंतर चित्रकार व्हायचं हे मात्र मनात होतं. चित्रकलेसाठी सतत भ"मंती झाली. यावेळी वेगवेगळ्या प्रांतांतील गणपतींचा जो आकार माझ्या मनात रुजला, तोच माझ्या ब"शमधून कॅनव्हासवर उतरला. त्यासाठी मला विशेष असं काही करावं लागलं असं मुळीच वाटत नाही.

गोंयची चवथ

डॉ. सुभाष भेण्डे

चवथ जवळ आली की गोंयकारांची झोप उडते. यावर्षी चवथ कशी साजरी करायची याचे बेत आखले जातात. मुंबईला व्यापार उदीमात रमलेले, नोकऱ्या सांभाळणारे गोंयकार दोन दोन महिने आधी बसून गाड्यांचे आरक्षण करू लागतात. यावर्षी कोण जाणार आणि कोण राहणार याविषयी कडाक्याची चर्चा होते आणि अखेरीस "सर्वांनीच जायचं!' असा नामी तोडगा काढला जातो. मुंबईहून काय काय आणायला हवं याची पुन्हा पुन्हा विचारणा केली जाते आणि हळुहळू मुंबईहून आणायच्या सामानाची यादी वाढत जाते. अगदी शेवटच्या घटकेलासुद्धा चार दोन पदार्थांची त्यात भर पडते.
पोटभर पाणी पिऊन शेतं तृप्त झालेली असतात. भाताची रोपं हातभर वर सरकलेली असतात. श्रावणातले उदंड सण उत्साहात साजरे होतात. श्रावणी रविवारी फुलांच्या झाडावरली पत्री गोळा करून सूर्यपूजा केली जाते. मग रात्री उपवास. श्रावणी सोमवाराचं महात्म्यही तसंच. दुपारी गोडधोड, रात्री उपवास. नव्या युगातल्या सुना सुधारलेल्या. तरीपण जुन्या रूढींविषयी जिव्हाळा बाळगणाऱ्या. श्रावणात अळम्याचं तोणाक खायला मिळणार म्हणून घरात लहानथोर आतुरलेली.
हां हा म्हणता श्रावण सरतो. चवथ येऊन ठेपते. आगरातली कामं थोपवून धरली जातात. श्रीगजाननाच्या आगमनासाठी स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. चार दिवस खपून सोनेरी वर्खाचं सुबक मखर तयार केलं जातं. मखरामागे मोठा आरसा. मखराच्या पुढल्या भागाला कमळाची, मोराची चित्रं डकवलेली. (चित्रविचित्र चित्रं डकवण्याचं काम अपार उत्साहात चालूच असतं. उत्तरपूजा होऊन श्रीची मूर्ती विसर्जित करण्याची वेळ आली तरी घरातला छोटा बाबुश "राव रे पाच मिन्टां.. हे हत्तीचे चित्र लायता' अशी विनवणी करत असतोच!) पडवीवर श्रीच्या बैठकीची व्यवस्था होते. मग छताला चांगली लांबरूंद माटोळी बांधायची. असोला नारळ, सुपारीचे पिवळे बेडे, पपनस, तवशी, केळीचे घड माटोळीला गच्च लटकतात. घरातल्या बायका तांब्या - पितळेची भांडी चिंचेनं ल"ख घासून पुसून चकचकीत करतात. चंदनाचं गंध उगाळायची सहाण धुवून ठेवतात. तांब्याचा पडगा केंद्रस्थानी ठेवला जातो. कामं करून थकल्यावर बसल्याबसल्या कापसाच्या वाती वळायच्या. समयांची स्थापना होते. दोन दिवस वाती अखंड पेटायला हव्यात. त्यासाठी भरपूर तेलाची पूर्वतयारी.
मग अन्नासाठी दाहीदिशा फिरणारी सोयरे मंडळी तृतियेला दिवसभर, चवथीच्या पहाटे हळुहळू थडकू लागतात. त्यांचं चहापाणी, फराळ, भोजन आटोपता आटोपता मध्यरात्र होते. प्रवासानं थकलेली मंडळी गप्पा मारत झोपेच्या आधीन होतात तोच फटाक्यांच्या धाड्धाड आवाजानं दचकून जागी होतात. चवथीच्या दोन दिवसांत झोपेचं कसलं कौतुक? उरलेले तीनशे त्रेसष्ट दिवस झोपायचं आहेच की!
पहाटे मुलं मुली आगरातली, बागेतली फुलं वेचून आणतात. फुलांची मखराभोवतीची आरास रंगीबेरंगी दिव्यांच्या आराशीहून अधिक शोभिवंत दिसते. बाहेरून आलेले सोयरे-धायरे श्रींच्या सेवेत आपलाही सहभाग या भावनेने कुठे मखरावर चित्र चिकटव, कुठे माटोळीला फळं बांध, मुंबईहून आणलेल्या फटाक्यांची सामग"ी मुलांच्या हवाली कर, यात मग्न होतात. बायका मंडळी भाज्या चिरून ठेवणं, सोलकढीसाठी नारळाचा रस काढणं, नारळ खवणं अशी कामं करताना भूतकालीन चवथीच्या गमतीजमती एकमेकींना सांगण्यात रंगून जातात.
मग अनादी गणपती स्वामी वाजत गाजत येतो. त्याची मूर्ती घरातला कर्ता पुरूष पाटावर बसवून सावधपणे घेऊन येतो. पोरंटोरं भोवती गर्दी करतात. फोगोट्या वाजू लागतात. श्रीगजानन आसनाला टेकून येत्या जात्याला हात उंचावून आशीर्वाद देतो. घरातलं वातावरण एकाएकी मंगलमय होऊन जातं. धुपाचा, उदबत्त्यांचा सुगंध चौफेर दरवळू लागतो.
मग पूजेसाठी भटजीबुवांचा शोध सुरू होतो. भटाला कितीतरी दिवस आगाऊ नोटीस दिलेली असते. पण मागणी प्रचंड. भटांची सं"या मर्यादित. "भट त्या वाड्यार पावला. आत्ता शिरवैंकरांकडे आयलां, हेगडे देसायांकडले लोक ताची वाट पळैतात' अशा "ब"ेकिंग न्यूज' स्वयंभू वार्ताहर अधूनमधून आणत असतात. एरवी भटाला कोणी विचारत नाही. पोटापाण्यासाठी बिचारा अन्य कामं करत असतो. चवथीच्या काळात त्याला प्रचंड भाव! धावीस बिऱ्हाडं त्याची चातकासारखी वाट पाहात असतात. इतक्या घरांतील मंगलमूर्तींची पूजा करून त्याच्या तोंडाला फेस येतो. थकवा येतो. श्रीगजानन सगळं काही निभावून नेतो.
एकदा पूजा पार पडली की भोजनासाठी पानं पडतात. डायनिंग टेबलवर बसायची सवय झालेली मुंबईची व्ही.आय.पी. मंडळी कशीबशी मांडी घालून जमिनीवर बसतात आणि शिवराक जेवणाचा जमेल तसा व जमेल तितका आस्वाद घेऊ लागतात. मुगाच्या गाठी, पातोळ्या, खतखते, आंबाड्याची उडदमेथी, नीरफणसाची कापा ऊर्फ फोडी, तांदळाचा पायस, जिरं घातलेलं वरण असा नामी बेत असतो. एकमेकांना आग"ह करून समस्त जन "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' मोठ्या उत्साहाने व ताकदीने तडीस नेतात. जेवण उरकेपर्यंत अडीच तीन वाजतात. त्यानंतर बायकांची पानं. बायका जेवून उठेपर्यंत पुरुष मंडळी डाराडूर झोपलेली.
संध्याकाळी पुरुषमंडळी पाच घरी जाऊन गणेशमूर्तींचं दर्शन घेतात. त्यासाठी कुणी निमंत्रणाची वाट नाही पाहात. उघड्या दरवाजातून आत शिरायचं, नमस्कार करायचा आणि प्रसाद घेऊन पुढचं घर गाठायचं. कुणी भेटलं तर थोडावेळ गजाली, मुंबईला गर्दी कशी वाढते आहे, महागाई कशी गगनाना भिडते आहे. मॉलचं न मल्टीप्लेक्सचं प्रस्थ कसं पसरतंय याच्या वार्ता गोंयकारांना देऊन पुढे सटकायचं. तोंडओळख असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या "कसो आसा?' प्रश्नाला "घट!' असं उत्तर देऊन मोकळं व्हायचं. स्वतःच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी वृद्ध पिढी उपस्थित असतेच. रात्री परतताना चंद्र दिसणार नाही याची खास काळजी घ्यायची असते. चुकून चंद्राचं दर्शन झालं तर चोरीचा आळ येऊ नये म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्याच्या कौलावर दगड फेकायचे. घरातून शिव्यांचा आवाज आल्यावर चोरीचा आळ टळला म्हणून समाधानानं परतायचं. (अलीकडे ही भाबडी मंडळी फारशी दिसत नाहीत!)
रात्रीचे दोन प्रहर उलटले की आरत्यांचा धडाका. मग हार्मोनियमवरची धूळ झाडायची. कुणा शेजाऱ्याचा पखवाज, तर कुणाचा तबला. "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची', "लवथवती विक"ाळा' यासार"या मराठी आरत्यांबरोबरच "शेंदुर लाल चढायो' ही रुचीपालट म्हणून राष्ट्रभाषेतली आरती दणक्यात म्हटली जाते. रात्री पुरुष मंडळींना उपवास. थोडंसं काही तोंडात टाकून भजनाची बैठक सुरू होते. आसपासची मंडळी गोळा होतात. खड्या आवाजातल्या गायकांना प्रचंड मागणी. तुकाराम, एकनाथांपासून सोहिरोबानाथांच्या रसाळ भजनांपर्यंत निवडक भजनांची उजळणी होते. पोरंटोरं भजनांवर ताल धरतात. बायका मागं बसून भजनांचा मनमुराद आस्वाद घेतात.
भजन संपतं तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. झांजा वाजत राहतात. फटाक्यांचे आवाज शांत वातावरणात घुमू लागतात. निजलेली पाखरं त्या आवाजानं पंख फडफडवित उठतात आणि डोळे मिटून अंधारात झेप घेतात. भजन करून थकलेल्या मंडळींना केळीच्या पानावर पंचखाद्य दिली जाते. जिभेवर ठेवली की विरघळणारी ती चविष्ट पंचखाद्य कितीही खा"ी तरी आणखी खावीशी वाटते. भाजलेल्या मुगाचे कण हाताखाली आले की पोटात कसं "गोविंद गोविंद' होतं. प्रसाद अपुरा पडतो. मग पपनसं कापावी लागतात. तवशी चिरणं भाग पडतं. पिकलेल्या केळ्यांचे घड शोधून काढावे लागतात.
दुसरे दिवशी संध्याकाळी श्रींची उत्तरपूजा होईपर्यंत घरात नुसता हैदौस चालू असतो. "शित रोस' हा दुपारच्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. शिवराक जेवणातला सर्वांत "एक्सायटिंग' पदार्थ म्हणजे भजी. बटाट्याची, वांग्याची, मिरचीची. केवढाही ढीग पडो, तात्काळ त्याचा फन्ना. गृहिणी कपाळावरचा घाम पुशीत घाण्यावर घाणा काढत असतात. हास्यविनोदाला ऊत येतो. गेल्या अनेक चवथींच्या आठवणी निघतात. "त्यावेळची मजा आता नाही उरली' अशी नेहमीची तक"ार करता करता ताव मारणं सुरूच असतं.
उत्तरपूजा सुरू असतानाच मागीलदारातून मासळीची आयात होत असते, असा गोंयकारांविषयी प्रवाद आहे. तो कितपत खरा आहे याची कल्पना नाही. गोंयकारांचं मत्स्यावताराविषयीचं आकर्षण अधोरेखित करण्यासाठी तसा आरोप केला जात असावा.
उत्तरपूजा झाली की विसर्जनाची तयारी सुरू होते. संधीप्रकाशात मंगलमूर्तींची मिरवणूक वाजतगाजत खाजणाच्या दिशेने जाऊ लागते. पाऊस नसेल गॅसबत्त्या बाहेर काढल्या जातात. पोरंटोरं उरलेसुरले फटाके बाहेर काढतात. पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करून गजाननाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो.
मंडळी परततात. कुणीच फारसं बोलत नाही. मनं उदास झालेली. काहीतरी महत्त्वाचं हरपल्याची भावना. गजाली सरतात. काहीच नकोसं वाटतं. लवकर निजानिज होते. सगळीकडे शांत शांत होतं.
पुढचा दिवस उजाडतो. मुंबईला, गोव्यातल्या गोव्यात चाकरीच्या गावी जायचे वेध लागतात. बांधाबांध सुरू होते. मात्र, बाजारात आलेल्या बांगुडल्यांचं त्रिफळाचं सुकं दुपारी पानात पडलंच पाहिजे असा पुरुषमंडळींचा कटाक्ष असतो. जमलं तर विस्वणाची पॉस्ता! दबलेल्या आवाजात गप्पा सुरू होतात. निरोपाची बोलणी, पुढल्या वर्षी तीन चार दिवस आधीच येण्याचं अभिवचन.
संध्याकाळी पाखरं आपापल्या घरट्याकडे उडून जातात. मखरापुढची रोषणाई सुन्न होते. कोपऱ्याकोपऱ्यात शुकशुकाट पसरतो. "चवथ बरेबशेन जाली' म्हणत मंडळी आपापल्या कामाला लागतात...

लोकजीवनातील श्रीगणेश

पु. शि. नार्वेकर

श्रीगणेशाला गोव्याच्या लोकजीवनात जितके महत्त्व आहे तितके अन्य कोणत्याही देवतेला नाही, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. गणपती हा सर्व आबालवृद्धांचा आवडता देव. गणेशचतुर्थी जवळ येताच विशेषतः मुलांमध्ये एक नवचैतन्य संचारते. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने शाळेला आठ - दहा दिवसांची सुटी असते. गणपती यायला अजून चार दिवस बाकी असले तरी ही मुले फटाके उडविण्यात दंग असतात. फटाक्यांची माळ एकदम लावायची नाही. ती सुटी करायची आणि फटाके खिशात भरून ठेवायचे. हातात एक पेटलेली उदबत्ती. तिला सुट्या फटाक्याची वात लावायची. सुर्रर्र आवाज झाला की ती फटाकी वर उडवायची. ठोऽऽ असा आवाज झाला की बालमंडळी खूष! कधीकधी फटाका हातातच फुटायचा व हात भाजायचा. पण त्याची फारशी चिंता नाही. भाजलेल्या हाताला तेल लावून स्वारी पुन्हा फटाके उडवण्यात दंग. आई ओरडायची, पण तिकडे लक्ष द्यायचे नाही. हा मुलांतील उत्साह पाहिला की वाटते, चतुर्थी हा खरोखरच मुलांचा सण.
देशात अनेक राज्ये आहेत. तेथील लोकजीवनात वेगवेगळ्या सणांना महत्त्व आहे. गणपती सगळीकडे आहे, पण त्याची फारशी अपूर्वाई नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यामुळे घरात पुजल्या जाणाऱ्या गणपतीला फार महत्त्व नाही. बंगालमध्ये दुर्गापूजा महत्त्वाची. महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठा. गोव्यातही दिवाळीचा सण साजरा होतोच. अलीकडच्या काळात तर नरकासुराने गावोगावी थैमान मांडले आहे, पण जुन्या काळात हे प्रकार फारसे नव्हते. गोव्यात बहुतेक सण साजरे होतात. पण गणेशचतुर्थीचे महत्त्व त्यांना नाही. शहर असो वा खेडेगाव, तेथील घराघरांतून गणपती मोठ्या भक्तिभावाने पुजला जातो. त्याची पूजा करण्यात, भजन करण्यात, आरत्या म्हणण्यात सारा गाव दंग असतो. शहरांपेक्षा खेडेगावांत गणपतीचा बडेजाव मोठा. आज खेडेगाव पूर्वीसारखा एकमेकांपासून तुटलेला राहिलेला नाही. सगळीकडे पक्के रस्ते झालेले आहेत. त्यावरून बसेस धावताहेत. लोकांचा शहरांशी संपर्क मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जुन्या काळी तो फारसा नव्हता. त्यामुळे खेडेगावांतील लोकांचा गावातील लोकांशीच संपर्क जास्त असायचा. दिवाळीच्या दिवशी तर आपापल्या वाड्यावरील लोकांकडे पोहे खाण्यासाठी जाण्याची प्रथा खेडेगावात होती. आज ती फारशी उरलेली नाही. शहरे महानगरे बनत आहेत, तर खेडेगावातील खेडेपण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
गोवामुक्तीपूर्व काळात खेडेगाव पूर्णतः मागासलेले होते. अनेक गावांत धड प्राथमिक शाळाही नसायची. एखाद्या खोपटीवजा जागेत एकदोन चहाची हॉटेले दिसायची. गावात भुसारी किरणामालाचे एखादे दुकान असायचे. बहुतेक लोक शेती - व्यवसायात गुंतलेले असायचे. शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतीउत्पादनही तुटपुंजे असायचे. त्यामुळे गावात गरीबी दिसायची. मजुरीची कामे करू इच्छिणारे लोक पुष्कळ असायचे, पण काम मिळत नव्हते. त्यामुळे लोकांच्या हाती पैसा नसायचा. चतुर्थी जवळ आली की त्यांच्या पोटात धाकधूक सुरू व्हायची. कसा साजरा करणार चतुर्थीचा सण, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहायचा. पण अशावेळी गावात असलेले भुसारी दुकानदार त्यांचा प्रश्न सोडवायचे. चतुर्थीच्या सणासाठी हवे असलेले धान्य, कडधान्य, गूळ, तेल इत्यादी जिन्नस त्यांना उधार द्यायचे. अट एकच - महिन्याभरात त्याने उधारी फेडायची. तोवर शेते पिकून पिवळी व्हायची. गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला शेतातील पिवळट झालेली भाताची कणसे आणून दाराला बांधायची प्रथा आजही खेडेगावात आहे.
जुन्या काळातील खेडेगावातील घरे म्हणजे मातीच्या भिंती व कौलारू छप्परे. आमचे गाव तर फारच मागासलेले. बहुतेक घरांच्या भिंती "कारवां' नामक जंगली काठ्यांच्या. त्यावर मातीचा गिलावा. छप्पर गवताचे व माडाच्या चुडतांचे. घर कसेही का असेना, चतुर्थीच्या दिवशी गणपती येणारच. श्रीगणेश हा असा एक देव आहे की त्याच्याजवळ गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. जातीपातीचाही भेदभाव नाही. हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा व दुःख हरण करणारा. त्याचा अभय देणारा वरदहस्त पाहिल्यावर संसारतापाने पिडलेल्या लोकांना केवढा तरी दिलासा मिळायचा.
झोपडीचे प्रवेशद्वार तर इतके बुटके की बुटक्या इसमालाही वाकूनच आत प्रवेश करावा लागायचा. आत पाहिले तर एका मेजावर गणराया आरामात लोडाला किंवा सिंह, मोर, हंस यांना टेकून बसलेला. पिवळा-लाल पीतांबर, खांद्यावर हिरवा-गुलाबी शेला, डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात सोन्याचा रत्नजडित हार, हातात-दंडात सोन्याचे अलंकार. असा हा गजानन प्रसन्नपणे भक्तांकडे पाहताना भासायचा. डाव्या हातात बहुधा मोदक असायचा किंवा आणखी काही. पण उजवा हात मात्र वरदहस्त. काही गणपती वेगवेगळी रूपे धारण करणारे. पण कितीही वेषांतर केले तरी भक्त त्याला ओळखतातच. कारण बालपणापासूनच त्यांचा तो सवंगडी!
आज गोव्यातील खेडेगावांतसुद्धा वीज पोचली आहे. चतुर्थीच्या सणात तर घरात विजेचा लखलखाट असतो. दरवाजात गणपतीच्या मागेपुढे, मखरावर विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांची रोषणाई केली जाते. गणपतीच्या डाव्या-उजव्या बाजूला पितळी समया तेवत असतात. विजेच्या झगमगाटात त्यांचा उजेड किती पडणार? पण जुन्या काळी खेडेगावात वीज नसायची. त्या समयांच्या प्रकाशातच गणरायाच्या मुखावरचे तेज झळकायचे. त्या बालपणीच्या काळात आम्ही मित्र गावातील प्रत्येक घरात जाऊन गणपतीचे दर्शन घेत असू. गावाची विभागणी तीन भागांत झाली होती. नदीवर पोर्तुगीजकालीन पूल होता. त्याच्या पलीकडेही काही वाडे होते, पण ते दूर असल्याने आम्ही तेथील गणपती पाहण्यासाठी जात नव्हतो. आमचा वाडा मध्यभागी होता. दक्षिणेकडे रेल्वे स्टेशन होते. त्याच्या पलीकडे काही घरे होती. बहुतेक रेल्वेत काम करणाऱ्या लोकांची. इतरही काही लोकांची होती. आज बहुतेक घरे पक्क्या बांधकामाची झालेली आहेत. पण जुन्या काळी त्या गवती छप्पराच्या झोपड्या होत्या. आम्ही मुले त्या काळी या सगळ्या घरांतील गणपती पाहायचो.
आजही पंचमीच्या दिवशी लहानमोठे सर्वजण गणपती पाहण्यासाठी जातात. उघडीप असली तर एखादेवेळी पाऊसही हजेरी लावतो. त्यावेळी लोक गणपतीदर्शनाला फारसे जात नाहीत. तरीसुद्धा पाच गणपती पाहायला हवेत अशी लोकांची श्रद्धा दिसते.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व"त असते. "तृतीया' या शब्दाचा अपभ"ंश होऊन "तय' शब्द झाला. या दिवशी बायका उपवास करतात. पूर्वी हिमालयकन्या पार्वतीने भगवान श्रीशंकरच आपल्याला पती मिळावा म्हणून तप केला होता, ते हे व"त. सर्वच बायका त्या दिवशी उपवास करतात, पण सगळ्याच घरांत ही "तय' पुजली जात नाही. काही घरांत "देवी' पुजली जाते. हेसुद्धा पार्वतीचेच एक रूप. पण ती आता "गौरी' राहिलेली नसून "दुर्गा' झालेली आहे. महिषासुरमर्दिनी हे तिचे उग" रूप असते. तिच्या या रूपाला बालगणेश भितो म्हणून हे व"त पंचमीच्या रात्री गणपती पोचविल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला येते. क्वचित ती तिथी तिसऱ्या दिवशी येते. काही घरांत गणपती राहिलेला असतो. आता थोडा वयाने मोठा झालेला असला तरी तो बालगणेशच असतो. ही देवी म्हणजे, घरातील सौभाग्यवतीने विहिरीवर जाऊन (आता नळावर) पाण्याने भरून आणलेला कलश. त्यात एका विशिष्ट जातीच्या झुडपाची फांदी. काही घरांत त्या देवीला मुखवटे घालतात. कलश आणताना त्या स्त्रीच्या तोंडात पाणी असते. पुढे घरातीलच एखादी मुलगी चुना घातलेले पाण्याचे भांडे घेऊन चालत असते. ती ज्याप्रमाणे जमिनीवर ते पाणी टाकीत असते त्याच ठिकाणी त्या स्त्रीने पाऊल ठेवायचे असते. अशा प्रकारे मिरवणुकीने "देवी' पुढील दाराने घरात प्रवेश करते.
गणपती आदल्या रात्री आपल्या गावी गेलेला असला तर प्रश्नच नाही, पण तो राहिलेला असला तर काय करायचे? अशावेळी गणपती आणि ती येणारी देवी यांच्यामध्ये पडदा धरून तिला आत आणायचे. गणपती गेलेला असला तर त्याच्या आसनावरच देवीला ठेवायचे, अन्यथा आत देवघरात. हे व"त तीन दिवसांचे असते. गौरीआवाहन, पूजन आणि विसर्जन. हे व"त स्त्रियांचे असल्याने त्यांनीच पूजाविधी करायचा असतो. पण सगळ्याच कुटुंबांत हे व"त नसते. विशेषतः ज्या घरात हरितालिका पुजतात त्या घरी हे नसते.
वास्तविक पाहता चतुर्थीच्या दिवशी गणपतीबरोबरच शंकर-पार्वतीची स्थापना त्याच्या उजव्या बाजूला झालेली असते. फुलझाडांच्या डहाळ्या असलेल्या जुडीभोवती गौरीचे चित्र असलेला कागद गुंडाळून तिच्या गळ्यात मंगळसूत्राचे काळे मणी असलेली दोरी बांधली जाते. गणपतीबरोबर शिव-पार्वतीचीही यथासांग पूजा केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेश बालक असतो. म्हणून एकाच पानावर मातापुत्राला नैवेद्य असतो. तत्पूर्वी गणेश हा मोदकप्रिय असल्याने त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. गणपतीचे वाहन उंदीर. त्याच्यासाठीही वेगळे पान असते.
गणेशाला सर्वजण बालरुपातच पाहतात. घरातील लहान मुलांवर करावे तसे त्याच्यावर प्रेम करतात. अन्य देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेताना जशी भयमिश्रित श्रद्धा वाटते तशी चतुर्थीच्या गणपतीविषयी वाटत नाही. हा तर कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा. सर्वांचाच लाडका. तो मग लंगोटी लावलेला बालरूपातील असो किंवा लालपिवळा पीतांबर नेसून सिंहासनावर बसलेला प्रौढ गणपती असो, सर्वजण त्याच्याकडे लहान मुलाकडे पाहावे तसे कौतुकाने पाहतात. गणपतीचे हे स्थान शिवविष्णूलाही दुर्मीळ. याबाबतीत त्याच्याशी तुलना करायचीच तर यशोदेच्या मांडीवर बसलेल्या किंवा तिची नजर चुकवून देवाच्या नैवेद्यासाठी बनविलेले लाडू देवाला दाखविण्यापूर्वीच खाणाऱ्या नंदकिशोराशीच करता येईल.
श्रीगणेशाचे आगमन होणार म्हणून घरात केवढा उत्साह, केवढी गडबड. पुरुषमंडळी सजावटीच्या कामात दंग, तर स्त्रीवर्ग करंज्या, मोदक बनविण्याच्या कामात गढलेला. मुलांना उद्योग फटाके उडवण्याचा तर मुली दिवस उजाडण्याआधीच परसबागेत किंवा जेथून मिळतील तिथून पत्री आणण्यासाठी गेलेल्या. जाई, जुई, मोगरा, चमेली, शेरवड, कर्णा, जास्वंदी किती विविध प्रकारच्या फुलझाडांची पत्री. फुलेही किती विविध प्रकारची. त्यातील लाल जास्वंदीचे फूल तर गणरायाला अधिक प्रिय. पत्री आणि फुले खुडून आणण्याची जबाबदारी लहान मुलींची. सोबत दूर्वाही हव्यात. कारण गणेश दूर्वाप्रिय.
इतक्यात गणरायाचे आगमन होते. घरातील सौभाग्यवतीने दारात पाट मांडून ठेवलेला असतो. त्याच्याभोवती घाईघाईने रांगोळी काढलेली. बाजूस समई ठेवलेली. गणपती दारात येताच गृहिणी मूर्ती आणणाऱ्या इसमाच्या पायावर आधी तांब्यातील पाणी ओतते. (अर्थात ते गणेशाचेच पादप्रक्षालन.) नंतर त्या मूर्तीभोवती उदबत्ती ओवाळून त्याचे स्वागत करते. मूर्ती पाटावर ठेवली जाते.
घरातील मुले, मुली, स्त्रिया सगळी मूर्तीभोवती गोळा होतात. कसा असेल गणराया? सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. वरचे कागदी आच्छादन काढले जाते. "वा! सुंदरच मूर्ती आहे!' मूर्ती कशीही असली तरी घरातील स्त्रिया हेच उद्गार काढतात.
स्वागताचा हा औपचारिक विधी पार पडल्यानंतर स्नान वगैरे करून शुचिर्भूत झालेला घरातील ज्येष्ठ पुरुष मूर्ती मेजावरील चौपाईवर ठेवतो. तेथे मखर वगैरे आधीच तयार असते. गणपतीमहाराज आसनस्थ होतात. त्यानंतर पूजन, आरती, नैवेद्य इत्यादी.
कुठल्याही गावातील कुठलेही घर असो, गणपतीची आरती "सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची' याच पारंपरिक आरतीने सुरुवात होते आणि समाप्ती "घालीन लोटांगण वंदीन चरण' या कर्पुर्रातीने होते.
चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी घराघरांतून भजन-आरत्यांचे कार्यक"म चालूच असतात. गावात एखादे भजनी मंडळ बहुधा असतेच. त्याचे गट पाडले जातात. कुणी कुणाच्या घरी आरत्या करायच्या ते ठरविले जाते. "सुखकर्ता' ही आरती व "घालीन लोटांगण' कटाक्षाने म्हटले जाते. त्यापेक्षा जास्त काही म्हणणे मंडळाला शक्यच नसते, कारण वेळ थोेडा, घरे जास्त. मु"य भजनाचा कार्यक"म मग पंचमीच्या मध्यरात्री जेव्हा सगळे गावातील गणपती चौकात येऊन रांगेने बसतात तेव्हा साग"संगीत होतो. अर्थात पर्जन्यराजाने सौजन्य दाखविले तरच.
फुगड्या हा स्त्रियांचा खास कलाप्रकार. पूर्वी खेडेगावातील गणपतीसमोर फुगडी ही असायचीच. वाड्यावरील महिलावर्ग प्रत्येक घरात जाऊन एकदोन तरी फुगड्या घालायचा. पण जुन्या काळातील स्त्रियांना जशी फुगड्यांची हौस होती, तशी ती आता शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींमध्ये दिसत नाही. त्यामुळे एकूणच फुगडी हा कलाप्रकार आता स्पर्धात्मक कार्यक"मांपुरताच उदाहरण बनून राहिला आहे.
काही गावांतून पूर्वापार एक प्रथा चालत आलेली असून ती अजूनही टिकून राहिलेली दिसते. एका वर्षी दीड दिवसाचा गणपती तर त्या पुढच्या वर्षी पाच दिवसांचा. हा नियम सगळ्या गावासाठी, किमान वाड्यांसाठी तरी असतो. इतरत्र दीड दिवसाचा नियमित व स्वेच्छेनुसार किंवा नवसपूर्ती म्हणून पाच, सात, नऊ दिवसांचा गणपती ठेवला जातो. काहीजण गणपती ठेवला तर चौथ्या- पाचव्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात. पण तसा नियम नाही.
श्रीगणेशचतुर्थीसंबंधात लिहिताना त्या बनविणाऱ्या मूर्तिकारांचा आवर्जून उ"ेख केला पाहिजे. हा केवळ धंदा नसून ते परंपरेने चालत आलेले एक व"त आहे असे ते मानतात. गोव्याची लोकसं"या खूप वाढलेली आहे. तुलनेने गणपतींची सं"याही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी गोव्याबाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि मातीचेही गणपती आणले जातात.
जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण शहरी जात. तिथेच स्थायिक होत. पण चतुर्थीला ते सहकुटुंब मूळ घरात येत. आज परिस्थिती बदललेली आहे. एकाच गावात दोन स""या भावांची दोन वेगळी घरे असली तर गणपतीही दोन असतात. कुणी गावात नवीन घर बांधले की चतुर्थीच्या पहाटे त्याच्या दारात गणपतीची मूर्ती ठेवणारे उत्साहीही असतात.
पंचमीच्या रात्री उत्तरपूजा झाल्यानंतर श्रीगणेश आपल्या जावी जाण्यास निघतो. गावात नदी किंवा ओढा त्यांचे विसर्जनस्थळ असते. पूर्वी पुरुषमंडळीच फक्त गणपती पोचवायला जात. आज घरातील बायकामुलेही उत्साहाने जातात. फटाक्यांचा कडकडाट चालू असतो. टाळमृदंगासह भजनीमंडळ आघाडीवर असते. कधीकधी या मिरवणुकीत सामील होण्यासाठी वरुणदेवही आपल्या सैन्यासह येतो. लोकांचा गजर चालू असतो- "गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...'

आमचा गणेशोत्सव

डॉ. विठ्ठल ठाकूर
एके दिवशी मी महाराष्ट्रात गणेशचतुर्थीच्या दरम्यान पोचलो होतो. कोणीतरी म्हणाले, "चतुर्थीला इथेच राहा. नाही तरी गोव्यात चतुर्थी असतेच कुठे?'.
मला हसूच आलं. महाराष्ट्रासंबंधी जसे गोव्यात गैरसमज आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही जास्त गोव्याबद्दल महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा ही शुद्ध असते, हा त्यापैकी एक. मराठी भाषा तेथे वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. तेथील लोकप्रतिनिधीसुध्दा भाषणात "आनी', "पानी' शब्द वापरतात, तेव्हा ते गोड वाटतात. त्यांना भाषेबद्दल न्यूनगंड नसतो. गोवेकर मात्र मराठी भाषा बोलताना न्यूनगंड बाळगतात किंवा तो जाणीवपूर्वक रुजवला असावा. गोव्यात ख्रिश्चन लोक बहुसं"येने आहेत, कोकणी भाषेचाच उपयोग केला जातो आदी गैरसमजांबरोबरच आमच्या चतुर्थी उत्सवाबद्दलही महाराष्ट्रात गैरसमज आहे. गोव्यातील चतुर्थी म्हणजे काय? तेथील लोकांना पटवून देणं तसं कठीणच!
पोर्तुगिजकालीन चतुर्थी कशी होती मला माहीत नाही, पण माझ्या आठवणीतील चतुर्थी मात्र नि:संशय "आठवणीतीलच' आहे. आठवणीतच राहणारी आहे. गोंयकारांना चतुर्थी "चढत' असते. महाराष्ट्रात चतुर्थी प्रामु"याने सार्वजनिक. गोव्यात ती वैयक्तिक! वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या घरापुरती असा अर्थ नाही घ्यायचा. गणपती येतोच मुळी पाहुण्यासारखा आणि राहतो घरच्यासारखा. इथं तो सर्वांच्या सुख दुःखांचा साक्षीदार. पण त्या दिवसांत सुखच जास्त, तर दु:ख उगीच आपलं गणपती विसर्जनाच्या वेळी "नुस्तं' मागच्या दारानं पडवीत येतं, तसं मागच्या बाजूला किंवा गाऱ्हाण्याच्या वेळी. गणपतीचा दीड दिवस मु"यतः आनंद सोहळा!
आमच्या घरी गणपती आणणे म्हणजे एक आनंद सोहळाच असायचा. दोन - तीन महिने आधीपासूनच त्याचेे ग"हणासारखे वेध लागायचे. घर मोठं म्हणण्यापेक्षा प्रचंड म्हणावं असं. भिंतींमध्ये दोन्ही बाजूंनी कपाटं खोदूनही मध्ये दोन फूट भिंत उरायचीच. आणि या घरात विविध ठिकाणं ही डंपिंग स्टेशनं असायची. एखादी वस्तू शोधणे म्हणजे सर्व घर पालथे घालणे. मिळेलच याची शाश्र्वती नाही. एकदा असाच एक गॅस सिलिंडर आणला होता, तो कोपऱ्यात उभा केला, तासाभरात सर्व घर सिलिंडरच्या शोधात. कारण त्या एका तासात त्यावर कपड्यांचा ढिग पडला होता अन् त्याच्यात तो बुडून गेला होता. हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की, चतुर्थीची आमची सुरुवात ही घराची साफसफाईपासून सुरू व्हायची. चतुर्थीपूर्वीचे तीन चार शनिवार - रविवार या कामात जायचे, माणसं गोळा व्हायची, एक एक साल (साल म्हणजे लांबलचक खोली. येथे जेवणावळ बसत असे. प्रत्येक सालाला जोडून एक एक खोली. असा एकंदर घराचा प्लॅन.) सफाईसाठी हातात घ्यायचं. संपूर्ण सामान हलवून सफाई झाल्यानंतर पुन्हा त्या सामानाची मांडणी करायची. साफसफाई चालू असताना कित्येक जुन्या हरवलेल्या वस्तू मिळायच्या. मग त्या वस्तूंच्या कहाण्या एकमेकांना सांगितल्या जायच्या. मग तिथं पंचतंत्रातील गोष्टींप्रमाणे, गोष्टीतून गोष्ट निघायची. काम करता करता मन भूतकाळात फिरून यायचं, प्रफुि"त व्हायचं.
घर साफ होताना पाहण्यात एक वेगळीच मजा होती. साफ झाल्यावर ते वेगळंच दिसू लागायचं. ते हसू लागायचं, गणपतीच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. ते एकदम ओळखायला यायचं नाही. मग लक्षात यायचं - असंही घर असू शकतं आणि हे तसं ठेवणं काही फारसं कठीण नाही. अर्थातच ते तसंच असणं शक्य नव्हतं आणि ते तसं कधीच झालं नाही, राहिलं नाही. म्हणून दरवर्षी, दर चतुर्थीला ही साफसफाई अशीच होत गेली आणि माझ्या गणेशचतुर्थीचा संबंध असा साफसफाईशी जोडला गेला.

साफसफाईनंतर पूर्वतयारीशी संबंधित दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे गणेशमूर्तीकडील सजावट व दुसरे म्हणजे नेवऱ्या - मोदक. आमच्या घरात चित्रकलेचा टिपूस सुध्दा कुणाकडे सापडणार नाही. माझा कावळा सुद्धा "काळ्या रंगाचा पक्षी' अशा घाऊक स्वरूपात मी खपवत असे आणि शिक्षक दयाबुद्धीने तो 30 टक्के मार्कांत स्वीकारत असे. पण गणेशमूर्तीकडील व समोरील सजावट मात्र मस्त व्हायची. असं"य हात या सजावटीला लागत असत म्हणून बहुधा.
सुरवातीलाच गणेशमूर्ती ठेवण्याचा मध्य शोधण्यात बराच वेळ जात असे. फुटपट्टीने मोजल्यास तो मध्यभागी दिसत नसे, ही त्यातली मु"य अडचण. बहुतेक भिंतीतच काही चुका असतील. सर्वांच्या नजरेखालून तो पुढे, मागे, बाजूला होत असे. शेवटी कोणीतरी विशेषाधिकार वापरून त्याला स्थिर करीत असे. मग कागद कापणे, त्याला आकार देणे, खळ (घरगुती डिंक) लावणेे, ठराविक क"माने चिकटवणे आदी गोष्टी क"माक"माने आणि चढत्या रात्रीला साक्ष ठेवून होत असत. ही सजावट आम्हांला फारच सुंदर वाटायची, कारण त्यामागे कष्ट असायचे. त्या जागरणात घरात वासाच्या रूपात दरवळणारी कॉफी पेल्यातून बाहेर यायची अन् एक वेगळीच मजा देऊन जायची.

नेवऱ्या - मोदकांची सर्व जय्यत तयारी माझी आई ठेवत असे. बायका मंडळींची कामे लाटणे, सारण करणे वगैरे असायची. पुरुष मंडळीही लाटण्याचा प्रयत्न करत, पण पिठाचे विविध नकाशेच बहुधा तयार होत. लहान मुलांची कामे तयार नेवऱ्या, तळण्याच्या जागेपर्यंत नेणे व तळून आलेल्या नेवऱ्या डब्यात ठेवणे. यात त्यांची भांडणे होत, मग त्यांचा तेच स्वतःचा क"म ठरवत. मुलं मोठी होत जात तशी त्यांना पदोन्नती मिळत जाई. नेवऱ्यात सारण भरण्यापासून ते नेवऱ्या लाटण्यापर्यंत हा प्रवास होत असे. कुठच्याही कंपनीने शिकावे असा हा धडा होता. इथे पदोन्नती जमेल तितकी लवकर दिली जात असे. कंपन्यांत ती जमेल तितकी पुढे ढकलली जाते एवढाच फरक. योग्य वेळी दिलेली पदोन्नती माणसाची क"यशक्ती वाढवते व पर्यायाने कंपनीचे उत्पादनही वाढते एवढाच धडा शिकला गेला तरी कितीतरी कंपन्या आहे त्याहून जास्त प्रगती साधतील. किती नेवऱ्या कराव्यात याबद्दल माझ्या आईचे काही गणित असे, त्याप्रमाणात ती पीठ तयार करायची. तेवढे पिढ संपवणे हे आम्हा साऱ्यांचे कर्तव्य असायचे. हा तिचा अंदाज आजपर्यंत कधी एका नेवरीने चुकला नाही किंवा कदाचित नेवऱ्या झाल्यावर त्यांची सं"या बघून त्यांच्या वाटणीच्या सं"येमध्ये ती फेरफार करत असावी.
चतुर्थी आणि ओझे याचा संबंध गोव्यात फार आहे. गोवेकरांना ओझ्याचं "ओझं' होतं असं गृहीत धरून लिहिले गेलेले लेख मी वाचले आहेत. माझ्या घरात ओझ्याची पद्धत नव्हती. ना आम्ही ओझं दिलं, ना आम्ही घेतलं. त्यामुळे या प्रकाराबाबत आम्ही अनभिज्ञ. पण ह"ीच लग्न करून आलेल्या सुनांनी जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं होतं की, ओझं म्हणून काय पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ओझं नकोय. इथं ती पद्धत नाही. तू ती सुरूही करू नकोस, पण तिकडून काहीतरी यायचंच. मग आम्ही त्याच पाटल्यातून तेवढंच सामान त्याच माणसाकडून पाठवत होतो. त्यामुळे गोव्यात तरी ओझ्याचं ओझं असत नाही अन् हा व्यवहार प्रेमापोटीच होतो अशी माझी तरी समजूत आहे. पण आता जाणीव होते की जुने असूनही माझे वडील किंवा चुलते खरोखरच नवमतवादी होते अन् आपल्या पातळीवर, जमेल तेवढी समाजसुधारणा आपण करत होते. ना त्यांना कधी प्रसिद्धीची हाव होती अन् ना त्यांनी लेख लिहून ती मिळवायची आस धरली. न पेक्षा स्वतः सत्यनारायणाची पूजा करायची अन् अंधश्रद्धेविरुद्ध लेखांचा रतीब घालायची प्रवृत्ती असणारी माणसे समाजात असतातच की!
आमचं घर ब"ाह्मणाचं. हा तसा खूपच सोज्वळ शब्द झाला. लोकांच्या भाषेत भटाचं. मग गावच्या पूजा करणे हा आमच्या ड्यूटीचा भाग होता. गावात पाच - सहा वाडे असायचे आणि या वाड्यावर आम्ही सर्व भावंडे व चुलते पूजेसाठी जायचो. चतुर्थीची सकाळ आणि विसर्जनाची संध्याकाळ असा हा कार्यक"म असायचा. दुसऱ्या दिवशीची सकाळ गावातील सत्यनारायण पूजा करण्यात जायची. आमच्या घरात कनवाळूपणाची एक धारा कधीपासून तरी वाहात आहे असं मला वाटतं. प्रत्येक जण दुसऱ्याला कसली तरी (विशेषतः पैशांची) मदत करत असायचा, दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेत असायचा. नंतर त्या माणसांची कृतघ्नता (पैसे परत न देणे, "नाही देत, काय करतोस ते कर' असं उलट विचारणं वगैरे) अनुभवली की चडफडायचा. माझ्या वडिलांची, चुलत्यांची पण दयावृत्ती चतुर्थीच्या दिवसांत वाहात जायची. एखाद्या वाड्यावरचे शिष्टमंडळ यायचे. "यंदा पूजेला आम्ही एक रुपया देऊ. परिस्थिती बिकट आहे. दोन्हीवेळचा मिळून गणेशपूजेचा एक नारळ देऊ' वगैरे मागण्या ते करायचे आणि वडील, चुलते ते कर्णाच्या औदार्याने मान्य करून टाकायचे. एका वर्षी तर मी तुळशीच्या पूजा, चार आणे प्रत्येकी दक्षिणा घेत केलेल्या आहेत. तीस एक पूजा करून नारळानं जड झालेली पिशवी खांद्यावर, डोक्यावर घेत, खिशात वट्ट साडेसात - आठ रुपये घेऊन रात्री एक वाजता उपाशीपोटी, अनवाण्या पावलांनी घरी पोचलो आहे.
अंधश्रद्धा विरोधक कधी कधी या पूजा, भटाचं उदरभरण करण्यासाठी निर्मिलेल्या आहेत, असलं काही तरी उथळ लिहितात, तेव्हा वाटतं, यांना एकदा तरी भर चौकात उभं करावं. 10 - 20 मिनिटे चालणारी तुळशीपूजा (त्याच्यात दोन मंगलाष्टके, आवाजाची अट नाही, कारण आमचा आवाजसुद्धा पूजा म्हणता म्हणता बसून जायचा आणि शेवटी सुजायचा. चार आण्याचं विकतचं दुखणं.) 30 वेळा तरी म्हणायला लावायची आणि चार चार आण्यांचे आठ रुपये करून, 30 नारळ डोक्यावर ठेवून घरापर्यंत अनवाणी चालत पाठवायचं. नाही यांनी लेखन थांबवलं तर नाव बदलेन. प्रत्येक चतुर्थीला आम्ही हा विनोद करून भरपूर हसलो आहोत.
अजूनही माझे भाऊ कुणाची तरी अडचण सांभाळायला वगैरे पूजेला जातात आणि मिळालेल्या पैशांत आपले पैसे घालून कुठल्या तरी संस्थेला निनावी दान देतात.
अशा रीतीने आमची चतुर्थी कष्टमय होती. पण हे सारे कष्ट हरितालिका व गणपती पूजा पाहताना - करताना वितळून जायचे. पैकी हरितालिका हे पार्वतीने शंकरप्राप्तीसाठी केलेले व"त - वटपौर्णिमा या तिच्याच दुसऱ्या व"त वा पूजनाप्रमाणे. त्या दिवसांची घरातल्या बायकांची चालणारी लगबग जशी मी लहानपणी अनुभवली, तोच अनुभव दरवर्षी अगदी तसाच येतो. किंबहुना गणेशपूजेचे रंग बदलले असतील, हरतालिकेचे रंग मात्र तसेच राहिले. कधीतरी नवीन मुलगी या व"ताबद्दल बोलते, "कशाला पार्वतीने एवढा खटाटोप केला वगैरे'. त्यावेळी एक लक्षात येते. नियतीचे स्वतःचेच काही खेळ असतात. देवालाही ते चुकत नाहीत. शंकराचा भडकपणा जखडून ठेवायला, बंधनात ठेवायला पार्वतीचा सात्विकपणाच आवश्यक असावा आणि म्हणून शंकरप्राप्ती ही पार्वतीवरील एक जबाबदारी असावी. काहीही असले तरी असली व"तवैकल्ये परंपरेप्रमाणे चालत राहिली आहेत आणि याच आधाराने कुटुंबसंस्थाही टिकवत आलेली आहेत.
गणेशमूर्ती आधल्या दिवशी आणली जायची. तिची स्थापना दुसऱ्या दिवशी विधीवत व्हायची. आमचे एक चुलते पूजा करण्यात एकदम निष्णात. मंत्रांचे ते उच्चार, त्यासोबत त्या सर्व चराचरसृष्टीचे आधिपत्य असणाऱ्या विघ्नहर्त्याला त्याच सृष्टीतील फुले अर्पण करत असताना, पावित्र्याचे मंगल वातावरण भारून टाकायचे. गावच्या पूजेला जायचे असल्यामुळे, पूजा सकाळी सकाळीच व्हायची. काहीवेळा तर त्या मंत्रोच्चारानेच जाग यायची. साखरझोपेत ते मंत्र ऐकताना कुठल्यातरी आश्रमात वा जंगलातल्या गुहेत असल्यासारखा भास व्हायचा. मखरात बसलेला तो दीड दिवसांचा राजा आमच्या अडचणी समजून घेत असणार अशी भावना प्रत्येक चतुर्थीप्रमाणे अजूनही दाटून येत असते. समर्पित झाल्यावर मनात दाटून येणारी ती शून्याची पवित्र भावना आताशा मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये वेगळ्या नावाने शिकवतात. आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेत त्याचं शिक्षण असं घरबसल्या दिलं गेलं आहे. मॅनेजमेंटमधले टीमवर्क, डेलिगेशन वगैरे सर्व शब्द या व अशा असं"य सणांमध्ये गुंतले गेले होते अन् हे ट्रेनिंग कसल्याही हजारो रुपयांच्या फीशिवाय घरोघरी लोकांकडे सुपूर्द केले गेले होते. ती ट्रेनिंग्स संपल्यावर, सुटकेची भावना निर्माण होते. इथं गणेश विसर्जनाच्या वेळी मनं गदगदून जायची. केवढा प्रचंड विचार पूर्वजांनी करून ठेवला होता याची जाण आल्यावर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचं की हे सगळं फालतू, वेळकाढू म्हणत त्याच्यावर टीका करायची हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा, कुवतीचा अन् मर्यादेचाही प्रश्न आहे. पण किमान चतुर्थीच्या निमित्ताने भारून जाणारे, हसणारे, कात बदलणारे घर तरी खरे आहे ना?

बालपणातला गणेशोत्सव

डॉ. प्रल्हाद वडेर


माझ्या आठवणीतला गणेशोत्सव म्हणजे 60 - 70 वर्षांपूर्वीचा काळ. माझं गाव पुणे - बेळगाव रस्त्यावरचं कणगले हे एक छोटंसं खेडेगाव. (हातकणंगले हे गाव वेगळं. ते प्रा. म. द. हातकणंगलेकरांचं!) जेमतेम 500 उंबऱ्यांचं आमचं गाव. ब"ाह्मणांची घरं अवघी पाच किंवा सहा. इतर वस्ती मराठे, महार, साळी, माळी, जैन व मारवाडी गुजर यांची. त्यामुळं तिथं गणेशोत्सवाचा आजच्यासारखा थाट नव्हता. त्याचे मार्केटिंगही झालेलं नव्हतं. टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं वारंही आमच्या गावात पोहोचलं नव्हतं. ते मी शिकत असलेल्या सात मैलांवरच्या निपाणी या छोट्याशा शहरात नंतर नंतर सुरू झालं होतं.
माझ्या लहानपणीचा गणेशोत्सव हा पूर्णपणे कौटुंबिक व धार्मिक स्वरूपाचा होता, पारंपरिकतेने आलेला होता. माझे पणजोबा व वडील (आजोबा अकाली गेले होते) यांत गणपतीच्या सणात पणजोबांचाच उत्साह अधिक होता. आमच्या दुमजली घराच्या पुढच्या सोप्यात ठराविक कोनाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. वर्षानुवर्षे ती जागा बदलत नसे. चतुर्थीच्या आधी दोन चार दिवस त्या कोनाड्याला पांढराशुभ" चुन्याचा हात दिला जाई व तांबड्या किंवा हुरमुजी रंगानं थोडीशी पानाफुलांची नक्षी तसेच "श्री गजानन प्रसन्न' अशी अक्षरं गावातला दत्तू पेंटर येऊन काढत असे. बाकी सजावट बिजावट काही नसे. मखर वगैरे किंवा गोव्यातली माटोळी या प्रथा नव्हत्या.
गजाननाची मूर्ती कुंभार ग"ीतून आदले दिवशी संध्याकाळी साधेपणानं (म्हणजे वाजत गाजत नव्हे) आणली जाई. ती आणताना घरातल्या लहान मुलांची कुंची घालण्याची प्रथा होती. मूर्ती आदल्या दिवशी आणण्याचं कारण पणजोबांना पहाटे उठून घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना, पूजा उरकून इतरांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना करायला जायचं असे. दुपारी आरती वगैरे करून दीडेक वाजता सावकाश नैवेद्य दाखवला जाई. आरत्या सुध्दा पारंपरिक असत. साधा झांजेचा ठेका असे. त्यावेळी आमच्या इथं फटाके उडविणं वगैरे काही नव्हतं. ते फक्त दिवाळीत. तेही लहान मुलं असल्यास, मोठे फटाके न लावता फुलबाज्या, चंद्रज्योती अशा काही निरुपद्रवी फटाक्यांचा वापर केला जाई.
गणपतीची मूर्ती त्याला कुंची घालून पाटावर ठेवून पणजोबाच घरी आणत. त्यावेळी मी त्यांचा एकुलता एक नातू (मला बहीण, भाऊ कोणीच नव्हतं) त्यांच्याबरोबर असे. वडील अशा धार्मिक गोष्टीत, पूजापाठ वगैरेंत लक्ष घालत नसत. ब"ाह्मण म्हणूनही ते कुठे जात नसत. ते प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांचा भटजी म्हणून जाण्यालाही विरोध असे. श्राध्दपक्षाचे भटजी म्हणून तर ते कोठेच, कधीच जात नसत, चक्क नकार देत. पणजोबांना खरं तर मला गावातला एक उत्तम भटजी बनवायचं होतं. त्यामुळे मी इंग"जी शाळा शिकू नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला होता. पण वडील बधले नाहीत आणि मी भटजी व्हायचा वाचलो. नाहीतर मी प्राध्यापकाऐवजी वेदशास्त्रसंपन्न (वे. शा. सं.) भटजी झालो असतो.
आता पुन्हा गणेशोत्सवाकडे वळूया. त्या काळात गणेशोत्सवाला उत्सव म्हणता येणं कठीण होतं. कारण उत्सवाची अशी कोणतीच चिन्हं त्यात सापडली नसती. धर्म हा घरच्या उंबऱ्यातच राहिला पाहिजे, तो बाहेर सार्वजनिक रूपात येता कामा नये हाच जणू त्यावेळचा दंडक होता. तो किती योग्य होता हे आज धर्मानं सगळीकडे पसरलेल्या हातापायांवरून कळून येते. सकाळी यथासांग पूजा, दुपारी आरत्या, नैवेद्य वगैरे झाल्यावर जेवण. आमचा गणपती कोकण किंवा गोव्यासारखा दीड दिवसांचा "मेहमान' कधीच नसे. तो कमीत कमी सहा किंवा सात दिवसही मुक्काम ठोकून असे. पहिल्या दिवसाच्या मोदकांनंतर मग गोड खीर, कधी पुरणपोळ्या असा नैवेद्याचा बदलता "मेनू' असे. गौरीचं आगमन झाल्यावर तिसरे दिवशी चक्क पालेभाजी, ज्वारीची भाकरी, नाचणीचे आंबील असा खास "गावरान' बेत असे. त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरीसह गणपती विसर्जनाचा दिवस येई. गणपतीच्या मूर्तीचं सोवळं ओवळं कटाक्षाने पाळलं जाई. आज जशी पुण्याच्या दगडूशेट गणपतीची आरती कोणीही, कशीही करतो तसा प्रकार तेव्हा नव्हता. सोवळं नेसूनच पूजा, आरती करावी लागे. त्यासंबंधात आम्हा मुलांना मोठ्यांकडून ओरडून घ्यावे लागे, तर कधी दोन चार धपाटेही खावे लागत. स्त्रियांच्या मासिक पाळीचा तर आम्ही धसकाच घेत असू. इतकं सगळं वातावरण अत्यंत कर्मठ सोवळ्यातलं असे. कुठं कुणा अशा स्त्रीच्या कपड्यावर पाय पडला, हात लागून शिवाशीव झाली की सचैल आंघोळ करण्याशिवाय गत्यंतर नसे. अशा वेळी गणपतीचं सोवळं ओवळं, पावित्र्य कटाक्षानं पाळलं जाई. गणेश चतुर्थीच्या त्या सहा सात दिवसांत एक दिवस संध्याकाळी "मंत्रपुष्पांजली' नावाचा कार्यक"म काही घरांमध्ये होत असे. म्हणजे संध्याकाळ झाल्यावर पाच - सहा ब"ाह्मण घरी येऊन मंत्राची आवर्तने करीत. त्याला "देवे' म्हणत. हे देवे म्हणण्याची एक स्पर्धा असे. "ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्माणि प्रथमान्यसन' हे मंत्रपुष्प दोन रांगांतल्या ब"ाह्मणांकडून म्हटलं जाई. एका रांगेत दोन ओळी म्हटल्या की दुसऱ्या ओळीतील ब"ाह्मणांचा आवाज चढत असे. पुन्हा पहिल्या ओळीकडं त्यापेक्षा मोठ्या आवाजात मंत्रपुष्पाचा घोष होई. असा गजर एक दीड तास होत असताना घर त्या आवाजात भरून जाई आणि अगदी
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति।।
हे मंत्रपुष्प समाप्त होईपर्यंत चालू राही. आम्हा मुलांना ब"ाह्मणांची ती तारस्वरात मंत्रपुष्प म्हणण्याची स्पर्धा फार मजेशीर वाटे. त्यानंतर प्रत्येक ब"ाह्मणाला बेसन लाडू, दडपे पोहे व मसाल्यांचं दूध भरपूर प्यायला दिलं जाई. हाच कार्यक"म अन्य ब"ाह्मणांच्या घरीही कमीअधिक फरकानं होई. अर्थात हे मंत्रपुष्प दरवर्षी होत असे असं नव्हे, पण ते जेव्हा होई तेव्हा दणक्यात संपन्न होई, "मेनू' मात्र तोच असे. आत्तासारखं फरसाण तेव्हा नव्हतं. चिवडा, चकली दिवाळीतच होत असत. म्हणून त्यात नावीन्य वाटे. आता हे पदार्थ नेहमीच मिळत असल्याने त्यातील मजाच गेलीय.
शेवटच्या दिवसाचा कार्यक"मही असाच एकत्रितपणे होई. आमच्या गावाला समुद्र सोडाच, पण तरही नव्हती. होता तो उथळ वाहणारा ओढा. त्याकाळी गणेश विसर्जन तेथे होत नसे, ते होई आमच्या घराच्या खालील बाजूस असलेल्या विहिरीत. तिथलंच पाणी आम्ही इतर वापरासाठी, तर पिण्याचं पाणी ओढ्यावरील छोट्याशा डोहातून आणलं जाई. एरवी स्वच्छ घासलेल्या कळशांतून व उन्हाळ्यात माठातून त्याचा वापर होई.
संध्याकाळी चारच्या सुमारास गणपतीची उत्तरपूजा सुरू होई. नेहमीच्या पूजेप्रमाणेच सोवळं नेसून गंध, अक्षता, फुले वाहून नैवेद्य दाखवून आरती सुरू होई. ते झाल्यावर सर्वांनी नमस्कार घालून आशीर्वाद घेतल्यावर मग पाटावरील गणेशमूर्ती किंचित हलवून "पुनरागमनायच' ची प्रार्थना होई. घरापासून जवळच असलेल्या विहिरीकडं गणेशमूर्ती पाटावरून नेली जाई. तेथे सर्व मंडळी जमत आणि दोर बांधलेल्या बादलीत मूर्ती बसवून दोन तीन वेळा वर घेऊन शेवटी पाण्यात सोडली जाई. तेव्हा आम्हा मुलांना खूप वाईट वाटे. पहिल्यांदा तर ही मोठी मंडळी एवढी सुंदर मूर्ती विहिरीत का सोडतात असं वाटून त्यांचा खूप राग येई. गणपतीला निरोप देऊन आम्ही जड मनानं सर्वजण घरी येत असू. गणपतीच्या रिकाम्या पाटावर एखादं भरलेलं भांडं ठेवलं जाई. निर्माल्य, फुलं, कापसाची वस्त्रंं वगैरे सर्व गोळा करून गणपतीबरोबरच त्याचं विसर्जन झाल्यामुळे तो संबंध कोनाडा अगदी सुनासुना वाटे. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' ही घोषणा नंतर कित्येक दिवस कानांत घुमतच असते. रात्री जेवण सुध्दा धड जात नसे, इतका त्या मूर्तीवर आमचा जीव जडायचा. तो विरह आम्हाला खायला येई. गणपतीबरोबर घरातील गौरीचंही विहिरीत विसर्जन होई. गणपती आधी येई, मग गौरी. मात्र दोघं मिळून आम्हाला विरहात टाकून निघून जात.
असा हा गणपती उत्सवाचा घरगुती मामला होता. त्यात थाटमाट, दिखाऊवृत्ती, डामडौल नव्हता. त्यात खरी श्रद्धा होती, भक्तीचा जिव्हाळा होता, प्रेमाचा ओलावा होता. गणेश उत्सवाचं मार्केटिंग नंतर झालं. मी निपाणी शहरात हायस्कूलमध्ये शिकायला गेलो, तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम पाहिला. रोज व्या"यान, कीर्तन, चर्चा दहा दिवस प्रथमच ऐकली. मुंबईत गेल्यावर तर तेथील प्रचंड मंडप, रोषणाई, नृत्य, नाट्य, गायन आदी कार्यक"म पाहिले. गणपतीच्या प्रचंड मूर्ती, हालते देखावे, यांत्रिक करामती, आकर्षक रोषणाई डोळे दिपवणारी होती. मोठ्या माणसांनी तसेच अगदी नटांपासून पुढाऱ्यांपर्यंत लोकांनी केलेल्या आरत्या पाहिल्या.
पण माझ्या मनात आहे तो माझ्या बालपणातील गणेशोत्सव नव्हे तर सण. पिवळा किंवा लाल पीतांबर नेसलेली, दागिने, हार घातलेली, एका हातात लाडू, इतर हातात शस्त्रे व एक हात आशीर्वाद देण्यासाठी उचललेली अशी, प्रसन्न चेहऱ्याची गणपतीची मूर्तीच आजही माझ्या डोळ्यांसमोर येते. आज गणपती "ग्लोबल' झालाय, पण त्याच्यात मी लहानपणी जे पाहिलं "ते' नाही असंच मला वाटतं. कारण त्यावेळी "ते' प्रत्येकात आतून होतं, आज "ते' कुठंही दिसत नाही...

बालपणची चवथ

भिकू पै आंगले

श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे तीन महिने म्हणजे हिंदूच्या सणांची आणि भजन, कीर्तन, प्रवचन यांची उधळण असते. नागपंचमीपासून या उत्सवांना प्रारंभ होतो. चतुर्थी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज हे हिंदूंचे महत्त्वाचे सण. त्यापैकी एक गणेश चतुर्थी होय. हा सण म्हणजे आनंदाची कारंजी आणि एकत्र कुटुंबाच्या सहजीवनाचा संस्मरणीय क्षण. कुठून कुठून आपल्या मूळ घराकडे - नव्हे मठीकडे लोक धाव घेत एकत्र कुटुंब पद्धतीचे तोरण आपल्याला महाद्वाराला लावतात. आपल्या जीवनातील ते दिवस गावाकडे येण्यासाठी राखून ठेवतात. आपल्या मुलांना धार्मिक संस्कृतीची जाण आणि कुटुंबातील इतर नात्यागोत्यातील व्यक्तींचा परिचय देत तो वाढीला लावण्याचा श्रीगणेशा असतो.
अशा घरात कुटुंबातील एक व्यक्ती आपला संसार थाटून असते. बाकीची माणसे आपापल्या कामानिमित्त वा नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असतात. तेव्हा सणासाठी येणाऱ्या सर्वांची व्यवस्था दोन चार दिवसांसाठी त्या व्यक्तीला करावी लागते. घर बंदच असेल तर एक दोन कुटुंबे दोन - चार दिवस आधी येऊन चतुर्थीच्या सणाची सर्व व्यवस्था करीत असतात. घराच्या साफसफाईपासून ते हरितालिका, गणपती आणि ऋषीपंचमी यांच्या पूजेची, स्वयंपाक आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू कुटुंब प्रमुखांना तयार ठेवाव्या लागतात किंवा त्या कुटुंबातील एक व्यक्ती आळीपाळीने ती जबाबदारी स्वीकारून झालेला सारा खर्च वाटून घेतात. पण प्रतिवर्षी गणेश चतुर्थी यथाशक्ती, योग्यप्रकारे थाटामाटात साजरी झालीच पाहिजे याबद्दल निश्चिती असते. ते एक एकत्र कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन असते असे म्हटल्यास वावगे होऊ नये. लहान मुलांचा तर तो आनंदोत्सव असतो. घरातील आणि शेजाऱ्यांच्या मुलांचा तो मित्रमेळावा असतो.
माझ्या जीवनातील तो सण म्हणजे मला उत्साहाचा, कार्यशक्तीचा आणि जिभेचे चोचले पुरवण्याचा एक उत्कृष्ट प्रसंग वाटायचा. एरव्ही टाळाटाळ करणारा मी वडील माणसांच्या हाकेला "ओ' देऊन कार्यतत्परता दाखविण्यास त्यावेळी सिद्ध होत असे. "जयराम' (माझे गृहनाम) अशी हाक आली रे आली की लगेच हुकूम ऐकायला सिद्ध होत असे. काम बहुधा बाजारात जाऊन काही जिन्नस आणण्याचे असे. मी धावत जाऊन पळत येत असे, कारण माझ्या गैरहजेरीत इतरांना (बच्चे मंडळीला) खाऊ मिळाला तर मी त्यापासून वंचित होऊ नये हा त्यामागचा हेतू असायचा. चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या कुटुंबांबरोबर आलेली मुले आणि वास्तव्य करून असलेली मुले यांची एक फौजच होत असे. तेव्हा फराळाच्या विविधतेची चैन असायची. गोडधोड खाण्यासाठी आमच्या जिभा चटावलेल्या असायच्या.
खरी मजा यायची ती मखर सजविण्याची. गतवर्षी केलेली सजावट - मु"यत्वेकरून कागद खरवडून सांगाडा स्वच्छ करायचा. रंगीबेरंगी, नाना तऱ्हेच्या छटा असलेल्या खास कागदांनी ते मखर पुन्हा सजविण्यासाठी एका मोठ्या व्यक्तीच्या साहाय्याने आम्ही कागद कापून ते खास तयार केलेल्या पिठारी गोंदाने चिकटवीत असू. त्या मखराचा सांगाडा चौकोनी, त्रिकोणी वगैरे नाना आकारांनी तयार केलेला असायचा. त्या मापाने कागद कापणी झाल्यावर त्यावर शोभा येण्यासाठी पशू, पक्षी किंवा वेगवेगळ्या देवांची आयुधे असलेली चित्रे चिकटवली जायची. तसेच गणपतीच्या मूर्तीची बैठक (चौरंग) आणि तो वर ठेवण्यासाठी टेबल हे देखील सजवले जायचे.
एकदा मखराचे, बैठकीचे आणि टेबलाचे काम झाले की आम्ही माटोळी सजवण्यासाठी आंब्याच्या डहाळ्या, त्या ऋतूमधील भाजी, फळे, बोंडासह केळीचा घड, मोठ्यात मोठा न सोललेला नारळ, सुपारीचा लोंगर इत्यादी जिन्नसांची आवश्यकता आम्हांला वाटे. घरी या वस्तू उपलब्ध नसतील तर त्या वाड्यावरील घरातून मिळवत असू आणि तेही सहजपणे न साधल्यास चोरी करून आणल्यास त्यावेळी आम्हाला पाप लागणार नाही अशी आम्ही मनाची समजूत करून घेत असू. उद्देश एकच. यंदाची गणेश चतुर्थी साजरी करताना कोणतीही कमतरता भासू न देण्याची जबाबदारी आम्ही मुले घेत असू. याप्रसंगी एकमेकांना कामामध्ये मदत करण्यासाठी प्रत्येकजण तयार असे आणि इथेच "एकमेकां साह्य करू। अवघे धरु सुपंथ' याची सत्यता पटे.
हरितालिकेच्या दिवशी सकाळीच आम्हा मुलांची "पत्री' आणण्यासाठी धावपळ होत असे. आजूबाजूच्या डोंगर टेकड्या आम्ही पालथ्या घालीत पूजेसाठी लागणारी पत्री आणून वडील माणसांची आणि घरातील बायकांची वाहव्वा मिळवीत असू. त्याचा परिणाम म्हणजे रग्गड खायला मिळायचे. सायंकाळच्या वेळी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी धडपड असे.
सर्वांनी डोक्यावर टोपी चढवूनच मूर्ती आणायला जायचे अशी सक्ती असे. त्यावेळी बरोबर तळी (तांदूळ, नारळ, पान, सुपारी आणि सव्वा रूपया) हीच त्या मूर्तीची मूर्तिकाराला देण्याची प्रथा मला आजही आठवते. मूर्तीकार मूर्तीचे पैसे घेत नसे. ती एक गणेश सेवा ते मानीत. तीन चार किलोमीटर चालत आम्ही त्या मूर्तिकाराकडे जात असू. तो मूर्तीकार पाच - सहा कुटुंबांसाठीच मूर्ती बनवत असे. तो त्याचा व्यवसाय नव्हता. भुसारी दुकान (घरगुती गरजेच्या वस्तूंचे दुकान) हा त्याचा व्यवसाय आणि आतल्या खोलीत ही त्याची गणेश सेवा चाले. मूर्ती आणताना आत्ताप्रमाणे मिरवणूक वगैरे नसायची. आम्हा मुलांकडे टाळ, झांज वगैरे वाजवायची आयुधे असायची. घरी आल्यावर सुहासिनी मूर्तीला "रहाट' (उथळ थाळ्यात कुंकवाचे पाणी) दाखवून तिचे स्वागत केल्यावर पूजेच्या जागेवर तिची स्थापना खाली तांदूळ आणि चेहऱ्यावर नवीन कापड टाकून केली जात असे. ते कापड दुसऱ्या दिवशी यजमान पूजेला बसण्यापूर्वी काढून मूर्तीचा चेहरा इतरांच्या दर्शनासाठी खुला ठेवला जात असे. मूर्ती घरी आणल्यावर फटाके वाजवून स्वागत केले जायचे. ते फटाके फक्त मोठी मुले किंवा मोठी माणसेच उडवीत. आम्हा मुलांच्या वाट्याला बिनधोक्याचे "लवंगी' फटाके यायचे.
आमच्या काही कुटुंबांमध्ये मूर्तीबरोबरच कागदाचा गणपती पूजला जातो. अजूनही ती प्रथा चालू आहे. त्याचे कारण म्हणजे आम्ही मूळचे असोळणे (सासष्टी) गावचे. तेथे पोर्तुगिजांचा त्यांच्या अमदानीत जबरदस्त पगडा. ख्रिश्चन समाज त्यांनी तेथे हिंदू लोकांना बाटवून वाढवला. अवघी काही हिंदूंची कुटुंबे तेथे भीतीग"स्त अवस्थेत जीव मुठीत धरून राहत होती. त्यांना देवदेवतांच्या पूजा - अर्चा करण्यास मनाई होती. निरांजने जाऊन तेथे मेणबत्त्या आल्या होत्या. अजूनही असोळणे गावात उत्सवाच्या वेळी मेणबत्त्यांची आरास केली जाते.
अशा कुटुंबांमध्ये गणेशचतुर्थीच्या वेळी मूर्तीच्या ऐवजी गणपती, शंकर व पार्वती यांची चित्रे एका मोठ्या लाकडी पेटीच्या झाकणाच्या आतील बाजूस चिकटवली जात असत. ओसरीवर एक वडीलधारी व्यक्ती राखणदारासारखी बसून राही. आत पूजा चालू असायची. अशावेळी सैनिकांची गस्त असली की आत तशी वर्दी जायची. लगेच ती पेटी बंद करून कुलूप ठोकले जाई. तिन्ही देवता बंदिस्त. सैनिक दृष्टीआड झाल्यावर पुन्हा पूजा चालू. त्यामुळे आज आमच्या गणेश चतुर्थीच्यावेळी मूर्तीबरोबर कागदी गणपतीची पूजा उघडपणे केली जाते.
पूजेसाठी त्या काळी भटजींची आवश्यकता भासतच असे, अशी परिस्थिती नव्हती. प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती संपूर्ण शाकाहारी असायची. त्याच्याकडेच दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक विधी पार पाडण्याची जबाबदारी असे. त्या व्यक्तीला तसे शिक्षण दिले जात असे. आता तर, गेल्या काही वर्षांपर्यंत हाती पुस्तक (चातुर्मास - पूजा अर्चा) घेऊन मी पूजा सांगत असे आणि माझा मोठा भाऊ पूजा बांधीत असे.
हे सगळे चालू असताना आम्हा बालगोपाळांची नजर आणि जीभ स्वयंपाकघराकडे असायची. विशेषत: गोडधोड खाण्यामध्ये आमची स्पर्धा असायची. पक्वान्नांवरील पुरणाच्या करंज्यांवर आम्ही हात सोडून ताव मारीत होतो. ढेकरावर ढेकर येईपर्यंत आम्ही पोटपूजा बांधीत होतो. सायंकाळी तयार केलेल्या करंज्या वाड्यावरील ख्रिश्चन समाजातील कुटुंबांकडे भेट म्हणून आम्हा मुलांकडून पोचविल्या जात असत. ही सामाजिक एकात्मता त्यावेळी होती. आज तिला ओरड करूनही तडा गेला आहे.
सर्वात गंमत म्हणजे त्या दिवशीचे "चंद्रदर्शन'. आम्हा मुलांना आवर्जून सांगितले जाई, "हे बघा, आज चंद्राकडे पाहू नका हं. पाहिलात तर आळ येतो म्हणे' आणि काय सांगू हटकून आमची दृष्टी चंद्राकडे जायची! सांगितले नसतं तर कदाचित जाणारही नव्हती. त्यावरून फार पूर्वी मी कोकणातील एक घरगडी नाच करताना ऐकलेले गाणे आठवले. त्यातील शब्दात थोडी घसरण झाली असेल पण आशय ध्यानी घ्यावा.
"उंदरावरोनी गण्या पडला रे
तेला पाहून चंद्र हांसेला रे - चंद्र हांसेला
गण्याने तेला शाप दिधला रे - शाप दिधला
तुला जो पाहील माझ्या दिसाला रे - माझ्या दिसाला रे
बालंट येईल तेच्या वाट्याला रे - तेच्या वाट्याला'
त्या लहानपणात पुढचं कोणी पाहिलं? आळ आला की बालंट आले की काहीच नाही हे त्या गण्यालाच माहीत!
गणपती विसर्जनाच्या वेळी मात्र आम्हांला फार वाईट वाटायचे. रडूच यायचे! गणपतीची पूजेची बैठक रिकामी झालेली पाहून घरचेच एखादे माणूस गेल्यासारखे वाटे आणि डोळे अश्रूंनी भरून जायचे आणि त्याहीपेक्षा मी व्याकूळ होत असे ते आलेली सारी कुटुंबे परतीच्या वाटा धरीत आणि सोबत माझे सवंगडी जात तेव्हा. "गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या' असाच निरोप मी जाणाऱ्या माझ्या साऱ्या कुटुंबीयांना देत असे. पुढे कित्येक दिवस ते आनंदाने घालवलेले क्षण माझ्या स्वप्नात यायचे आणि त्या स्मृतींत मी खूपच रमून जात असे!

बालपणातली चवथ

शरत्चंद्र आ. देशप्रभू

"नेमेचे येतो पावसाळा' या उक्तीनुसार उंच गणेशमूर्ती आणि समुद्रात केले जाणारे विसर्जन हे मुद्दे दरवर्षीप"माणे ऐरणीवर आल्याचे मुंबईच्या वृत्तपत्रातील वृत्तांत वाचून समजले. हे मुद्दे भावनिक असले तरी पर्यावरणाचा आणि पर्यायाने आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याचा विचार वैज्ञानिकदृष्टीने झाला पाहिजे. दोन्ही प्रश्नांना पूरक असा सर्वसमावेशी, पर्यावरण सुसंवादी कार्यक"म शासकीय व संस्थांच्या पातळीवर आखण्याची व राबवण्याची आज निकड होऊन बसलेली आहे.
आजच्या या हायप्रोफाईल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मला आठवते गतकालीन सरंजामशाहीच्या मावळत्या काळात पेडणे गावात साजरी केलेली आमच्या घराण्यातील चवथ. श्रावण महिन्यास प्रारंभ म्हणजेच खऱ्या खुऱ्या अर्थाने सण साजरे करण्याचे मुक्तद्वार. आकुलो कुकुलो, सुताची पुनव, नागपंचमी व जन्माष्टमी अशी संगतवार सणांची मांडणी. शिवाय श्रावणी सोमवार, शनिवार तसेच रविवार पण जोडून साजरे करण्याचा कोकणात प्रघात आहेच. कदाचित हे सर्व सण श्रावणात पूर्वनियोजित केले असले पाहिजेत, ते पुढचे मेगा इव्हेंट गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठीची मनोभूमिका निर्माण करण्यासाठीच. कारण चतुर्थीचे वेध खऱ्या खुऱ्या अर्थाने श्रावणमासीच लागायचे.
आमच्या घरी गणपती घरी करण्याची प्रथा असल्यामुळे शाडूच्या मातीची "ओझी' कोरगांवहून येत. ही ओझी गुळाच्या ढेपांच्या आकाराची किंबहुना जरा मोठीच असत. मातीची ओझी फोडून भिजवण्या फुगवण्यापासून ते मूर्ती रंगवून तयार करीपर्यंतचा अनुभव रोमांचकारी असे. माती फुगल्यावर गणपती थापायची कृती होत असे. यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे आकार देणे. यात हात, कान, नाक, सोंड चिकटवणे होत असे. साचा वापरणे प्रतिष्ठेच्या साच्यात बसत नव्हते. नंतर आले सुकवणे. तोपर्यंत जन्माष्टमी यायची. यानंतर खडबडीत मूर्ती धातूच्या प्लेटच्या आधाराने नितळ करणे, हा सारा प्रकार विस्मयजनक असे. आमचा गणपती करण्याची प्रकि"या चतुर्थीपूर्वीच एक महिना व्हायची. कारण मूर्तीच्या अंगकांतीचा रंग शुभ". माती ओलसर राहिली तर शुभ" रंग काळवंडतो. यासाठी मूर्ती सुकवण्यासाठी पुरेपूर अवधी देणे उचित ठरते. नंतर बोळु घोटून घोटून केलेला रंग तीन थरांनी मूर्तीला लावला जात असे. आतासारखा ऑईलपेंट नव्हता. यानंतर मुकुट भरणे. वेगवेगळ्या आकाराच्या विविध रंगी चमक्यांनी मुकुट कलात्मक रीतीने सजवायचे. हे काम नाजूक असल्यामुळे घरची मंडळी पण कोरगांवहून येणाऱ्या अनुभवी कारागिरांना हातभार लावीत असे. नंतर कालौघात ही प्रथा बंद पडली व त्याची जागा मुकूट रंगविण्याने घेतली. हे काम पण जिकिरीचे होते. मातीच्या मुकुटाला गोंदवजा द्रव फासून मूर्तीकार सोनेरी पावडर हाताच्या तळव्यावर ठेवून एका फुंकरीने मुकुटावर उडवून मुकुट रंगवीत असे. हे काम करायला अंगी उपजतच कला असावी लागे, कारण सोनेरी पावडरीच्या फुंकरीने चढवलेला थर मुकुटावर समान व्हायला बरीच कसरत करावी लागे. यातून दुहेरी हेतू साध्य होई. सोनेरी पावडर फुंकरताना उडालेले कण चपखलपणे पितांबराला चिकटून बसत. त्यामुळे पितांबर जर लावल्यासारखा झगमगून उठे. यानंतर नजर उघडणे व गावच्या सोनाराने येऊन मूर्तीच्या हातात सोनेरी वर्ख दिलेली मेणाची कंकणे भरवणे आदी सोपस्कार पूर्ण होत. आमच्या आजोळी श्रीमंत आरोबेकर देसाई यांच्या वाड्यावर सहा फूटी मूर्ती करत. त्यासाठी पन्नास ते साठ ओझी लागत.
त्यावेळचे मखर करणे एक आनंददायी यातायात! मखराची रचनाच कलाकुसरीमुळे लक्षात राहण्याजोगी होती. मखर उभारणे व पट्टे कापणे सुरू झाल्यावर साऱ्या कुटुंबियांत अवर्णनीय उत्साह संचारत असे. मखराच्या उभ्या आडव्या लाकडी पट्ट्यांचे मोठ्या कुशलतेने मोजमाप घेऊन कापलेले रंगीबेरंगी पट्टे एखाद्या झावळाप्रमाणे उभे आडवे विणायचे. हे काम किचकट असले तरी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यावेळीसुध्दा बघायला लोकांची गर्दी उसळत असे. कालांतराने हे मखर जीर्ण झाल्याने अडगळीत टाकले, परंतु नंतर कित्येक वर्षे लोक या मखराची आठवण काढून उसासे टाकीत. आरोबा येथे देवदेवतांचे फोटो असलेले मखर करायचे.
चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घरच्या परंतु पेडणे महालात विखुरलेल्या पिढीजात सेवेकरांना "परब' वाटायची पध्दत होती. अजूनही आहे. यावेळी सेवेकऱ्यांना दर्जाप्रमाणे नारळ व पैसे देत असत. ही पध्दत पिढ्यानपिढ्या चालून आलेली आहे. टिकून आहे - यातील उदात्त हेतूमुळे... चवथीला कुणाला अडचण भासू नये हाच एकमेव उद्देश.
मूर्तीची षोडशोपचार प्राणप्रतिष्ठा करण्याची जबाबदारी पुरोहिताची. हे पुरोहित आपली सेवा एकाच कुटुंबाला वाहत असत. त्याकाळी अशा पुरोहितांंना व सेवेकऱ्यांना जमिनीचा तुकडा दिलेला असे. याला उत्पन्न तोडून देणे असे म्हणत. या जमिनीची मालकी कुटुंबाकडे असली तरी भोगवटा सेवेकऱ्याकडे. यात शाडूची माती पुरविणारे, मूर्ती घडवणारे कुंभार, शेणसडा करणारे, माटोळी बांधणारे, आरती करणारे, सोनार, गणपती वाहून नेणारे, पार्सेचे मुसलमान वाजंत्री यांचा समावेश असे. ज्यांना उत्पन्न तोडून दिलेले नसल्यास त्याची भरपाई "परब' देऊन करत असत. कालांतराने कुळकायदा आल्यावर ही प्रथा अस्तंगत झाली, तरीही काही घराण्यांत या पुरातन संस्थेचे अवशेष आढळून येतात. त्यावेळचे आमचे पुरोहित एवढे शुर्चिभूत की घरून पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पायतणे न वापरताच येत. परंतु आता मला प्रश्न पडतो की हे गृहस्थ खडावा का वापरीत नसत? प्राणप्रतिष्ठेचे षोडोशोपचार झाल्यावर गणपतीची मूर्ती एका आगळ्या तेजाने झळाळून जाई. इतकेच नव्हे तर गणपती पुजण्याचे मोठे "साल' एका भारलेल्या वातावरणाने आच्छादित होत असे. सगळीकडे अवर्णनिय लहरी व स्पंदने जाणवू लागत! यातील श्रध्देचा भाग व वैज्ञानिक सिध्दांत कदाचित "सनातन'वाले आपल्या परीने विशद करू शकतील. परंतु एकंदर वातावरण चार्जड् वाटायचे. ही स्थिती दीड दिवस म्हणजे उत्तर पूजेपर्यंत टिकत असे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी ताशावर काठी पडली की अंग शहारून येत असे. दोन दिवस वाजंत्री आणि मुले यांची चांगली गट्टी जमायची. वाजंत्री धर्माने मुसलमान असले तरी त्यांचा गणपती उत्सवात सहभाग असे. दुरून का होईना ते आमच्यासमवेत सुरात, तालात आरती म्हणत असत. दोन दिवस मांस-मच्छीचे जेवण विसरून सुग"ास भोजनाचा आस्वाद घेत. आम्ही चंद्रज्योती पेटवून उरलेले तारांचे तुकडे या वाजंत्र्यांकडे सुपूर्द करीत होतो. त्याचा उपयोग ते बायकांसाठी वेगवेगळे आकडे करण्यासाठी करत. हे वाजंत्री मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्वांशी सलो"याचे संबंध होते. या वाजंत्र्यांचा मुक्काम गणेश विसर्जन होईपर्यंत असायचा. आम्हा देशप्रभू घराण्यातील सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन पेडण्याहून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नईबाग नदीवर होते.
गणेश चतुर्थीच्या रात्री आरती, नंतर पुराण व कीर्तन व्हायचे. पुराण सांगण्याचे काम पिढीजात पुजारी कुटुंबातील व्यक्ती करत. पुरोहिताचा यात सहभाग नसे. माझ्या आठवणीतल्या पुराणिकांंना अंग घुसळून पुराण सांगण्याची सवय होती. ते "तेव्हा' व "आणि' या शब्दांचा वाक्यागणिक उच्चार करायचे. "तेव्हा' हा शब्द "तेंहा' असे उच्चारायचे. त्यांच्या या लकबीमुळे कदाचित त्यांचे पुराण श्रवणीय होत असेल. कीर्तनाचा भार मळगांवकर कुटुंबावर. हे शाक्त पंथी. मळगांव (महाराष्ट्र) गावातून हे दिवसा किंवा रात्री कंदील घेऊन चालत येत असत व देशप्रभूंच्या वाड्यात कीर्तन करत. मला आठवतात ते शेवटचे मळगांवकरबुवा हे शेवटी तर एवढे विकलांग झाले होते की कीर्तन करतेवेळी पेंगत व नकळत देवाकडे पाठ करून आ"यान चालू ठेवत. मग त्यांना यजमान प्रेमाने खडसावत. "अहो बुवा, तुम्ही कीर्तन खंय करतात? देवापुढे की देवाच्या फोटोफुडे', मग बुवा खजिल होऊन वळून आ"यान चालू ठेवत. आ"यान कसले तर देवदेवतांचे चमत्कार व प्रबोधन राहिले बाजूलाच आणि भर स्वत:च्या जीवनातले प्रसंग कथन करण्यावर - चर्वितचर्वण केलेले. बुवांचे लक्ष बारीक वात करून ठेवलेल्या कंदिलाकडे. कारण जेवढे कीर्तन लांबेल तेवढे दिव्यातील केरोसीन जळणार. दोन रुपयांच्या बिदागीत तर वाढ होणे शक्य नाही! तीही नियमित मिळाली नाहीतर नवरात्रौत्सवात देण्याचे पोकळ आश्वासन. त्यावेळी हे बुवा आमच्या चेष्टेचा विषय होत. आता जाण आल्यावर वाईट वाटते. परंतु दारिद्य"च इतके भयानक की हे बुवा पाच कुटुंबांतून मिळणाऱ्या दहा रुपयांच्या बिदागीसाठी खस्ता काढायचे. त्यादिवशीच्या कार्यक"माची सांगता कलावंतिणीने केलेल्या गणेश वंदनेने (नृत्याद्वारा) होत असे. ही कलावंतीण वयस्कर, परंतु घराण्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून येत असे. या कलावंतिणीने भक्तीभावाने केलेली गणेश वंदना विस्मरणात जाणे कठीण. नव्हते आवाजात माधुर्य ना गाण्यात लय ना पदन्यासात ताल! परंतु तिची घराण्यावरची अविचल निष्ठा आम्हांस अचंबित करीत असे.
त्याकाळी आमच्या गावात वीज नव्हती. पेट्रोमास दिवेपण क्वचितच. अल्लाउद्दिनच्या स्वयंचलित दिवाबत्तीने प"वेश केलेला. परंतु ती दिसे तुरळक वाड्यांत. पण समईच्या मंद प्रकाशात उजळलेली सुशोभित गणेशमूर्ती पाहण्याचे भाग्य वेगळेच. तेवणाऱ्या समईमुळे मूर्तीसभोवती एक आकर्षक तेजोवलय निर्माण होत असे व मूर्तीच्या सात्विक चेहऱ्यावरचे भाव जास्तच आश्वासक वाटत.
त्याकाळी प्रचलित प्रथेप्रमाणे जाणती मंडळी चंद्रदर्शन होण्याच्या व पर्यायाने आळ येणाचा संभव असल्याने बाहेर न पडणेच पसंत करत, परंतु आमच्यातील काही खोडकर मुले, "तो बघ, माळयेच्या छपराचेर वानर बसला' असे वरच्या दिशेला बोट दाखवून चंद्रदर्शन करवीत. आम्हीपण गाफील म्हणून फसायचो. नंतर कळून यायचे की वानरे रात्रीच्या अंधारात संचार करीत नाहीत. व गणेशोत्सवाच्या पाच दिवसांंत तरी हे हनुमानाचे प्रतीक फटाक्याच्या आवाजाने कुठेतरी अंतर्धान. मग आळ न येण्यासाठी खोटी खोटी चोरी आणि वर वर शिव्यांची लाखोली.
आमच्या लहानपणी दारूकामाचे सामान चीनहून माकावद्वारे येत असे. माकाव हे पोर्तुगीज वसाहतील बेट. त्यावेळी लवंगी फटाके प्रसिध्द. परंतु का कोण जाणे, आम्ही अ"खा फटाका क्वचितच पेटवू! माळेतील बत्तीस "फुगट्यो' वेगवेगळ्या काढून विविध तऱ्हांनी पेटवायचो. कांही व"ात्य मुले शेणात फुगेटी पेटवून शेणाचे शिंतोडे सवंगड्यांवर उडवीत व टाळ्या पिटत. नारळाच्या करवंटीत पण फुगेटी पेटवून करवंटी हवेत भिरकावलेली पाहून मजा लुटत. काही मुले घरामागच्या खाजगी तळीच्या पृष्ठभागावर पेटत्या फुगेटीचा स्फोट करून पाण्याचे तुषार उडवित. या प्रयोगात टायमिंगचे भान ठेवणे अत्यंत जरूरीचे असे. असे विविध प्रकार व तऱ्हा!
ऋषिपंचमीचा दिवस उजाडल्यावर मनात कालवाकालव व्हायची. संध्याकाळी गणेश विसर्जन होणार आणि आम्ही स्वर्गीय आनंदाला मुकणार. आमची चवथ दीड दिवसांची असल्यामुळे जास्तच खंत वाटायची. आमच्या घराण्यात दीड दिवसावर नवसाप्रित्यर्थसुध्दा गणपती ठेवण्याचा प्रघात नाही. विषण्णतेचा आलेख दिवसभर वाढतच व्हायचा. सुग"ास भोजन रुचत नसे. तशाच अवस्थेत आम्ही विसर्जनासाठी लागणारे फटाके गोळा करायचो. उरलेले आनंदाचे क्षण हातातून निसटू नयेत म्हणून कसोशीने प्रयत्न करायचो. उत्तरपूजेनंतर उदासिनता उच्चबिंदू गाठायची. मग फटाक्यांच्या कर्णकर्कश (फक्त विसर्जनावेळी) आवाजात व वाद्यांच्या जोशात गणपतीची मिरवणून होत असे. आम्ही गणपतीसोबत चालत व्हायकाउंट स्कूलपर्यंत जायचो. गणपती वाहून न्यायला "माचील' असे. अजूनही आहे.
चवथीचा आनंद घेण्यासाठी चवथ मनात फुलली पाहिजे. आणि तीही श्रावण मासाच्या आरंभीच! आताशा चित्र वेगळेच दिसून येते. पूर्वी गणेश विसर्जन केल्यावर चेहरे कोमेजत, तर आता विसर्जन केल्यावर लोक चिंतामुक्त होतात. कारण काय तर आत्यंतिक ताणतणाव, अंतर्गत वाद, अपुरे मनुष्यबळ व एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱ्हास. कालाय तस्मै नम:!

कोकणातला गणपती

चंद्रकांत रामा गावस

भगवान परशुराम निर्मित कोकण भूमीत सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यान्पिढ्या जोपासण्यात आला आहे. या भूमीतील प्रसिद्ध मंदिरे, जत्रा, उत्सव, धार्मिक परंपरा, संतांची शिकवण, सिद्ध पुरूषांचा सत्संग यामुळे कोकणचा धार्मिक व सांस्कृतिक चेहरामोहराच बदलून गेलेला आहे. कोकणी माणसाचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती. गणपती पूजनाला येथे जास्त महत्त्व आहे. जागोजागी विघ्नहर्त्या गणपतीची मंदिरे आढळतात. हजारो गणेशभक्त श्री गणपतीची आराधना करतात. कोकणात हा सण इतर उत्सवांपेक्षा विशेष उत्साहवर्धक मानला जातो. गावात आणि शहरात सुध्दा गणेेशोत्सव साजरा केला जातो. मात्र घरोघरच्या गणपती पूजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. लहानांपासून थोरांपर्यंत जो तो आपल्या परीने या उत्सवाचा आनंद लुटतो. मुंबईत, पुण्यात स्थायिक झालेले कोकणातील बरेच चाकरमानी गावातील गणेशोत्सवासाठी न चुकता येतात. ते मूळ घराण्यातील गणपती उत्सवात आनंदाने भाग घेतात. गणपती उत्सवाला गावी येता यावे म्हणून गाड्या, रेल्वेसाठी त्यांना आगाऊ दोन - तीन महिने आरक्षण करावे लागते. तसेच जादा गाड्या सोडाव्या लागतात.

जय्यत तयारी

अलीकडील 40 ते 50 वर्षांत गणपतीची उपासना करण्याकडे कोकणी लोकांचा कल वाढल्याचे प्रकषार्र्ने जाणवते. लहान थोर मंडळी गणेशोत्सवाची तयारी उत्साहाने करतात. गणपतीच्या आसनाच्यावर "माटी' बांधतात. हिला "माटोळी', "मंडपी' असेही म्हणतात. निसर्गातल्या फलाफुळांनी नटलेली ही माटोळी गणेशमंचाला अधिकच आकर्षक करते. ग"ामीण भागात या माटीला रानात मिळणाऱ्या शेरवडं, हरणे, कांगलां, कवंडाळ, कोकणे, वाघाचे पंजे अशा रानवनस्पती व रानफळांनी सुशोभित केले जाते. या वस्तू गोळा करण्यासाठी लोकांची मोठी धावपळ असते. गणपतीच्या आसनाच्या मागील बाजूच्या भिंतीवर कमळे, निसर्गचित्रे, देवांची चित्रे पाहावयास मिळतात. बायका करंज्या, मोदक, लाडू, शंकरपाळ्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनविण्यात गुंग असतात.
कोकणात बहुतेक गणेशमूर्ती चिकणमातीच्या असतात. त्यामुळे त्या आकर्षक असतात. गणेशाच्या आसनाभोवती सुंदर, देखणे मखर व मनमोहक सजावट केली जाते. गणेशोत्सव काळात गावातील महिलांच्या फुगड्यांतील उत्साह अवर्णनीय असतो. फुगडी एक लोककला. या लोककलेला या उत्सवात बराच उजाळा येतो. फुगड्या घालणाऱ्या महिला फुगड्या खेळताना फुगडी म्हणतात, ती अशी -
"गणपती देवा, करीन तुझी सेवा
नवस करीन रे, नवस करीन रे
पाच फुलांनी, पाच फळांनी
दूर्वा वाहीन रे,
कपाळीचो कुंकू जन्मभर
आणखी काय मागीन रे'
अशाप्रकारे गणपतीची स्तुती करतानाच गणपतीकडे अखंड सौभाग्याची प्रार्थनाही फुगडीद्वारे केली जाते. फुगडी ही जणू स्त्री मनाचा आरसाच असतो. लोकमताशी व लोकजीवनाशी नाते सांगणारी फुगडीतील गीते गणेश चतुर्थीच्या फुगड्यांतून म्हटली जातात. त्यामुळे बायकांच्या अंगातील सुप्त गुणांना नकळत उजाळा मिळतो. अशाच प्रकारे काही हास्य गीतेही बायका फुगडीतून सादर करतात, जशी -
"गडबड घोटाळा जाला जाला
बाहेर पावणा आला आला
पावण्याक बसाक दिली शेंदरी
तेनी केली तेची बोंदरी'
आणि
"जावेक जाव शिकयता
घोटयेत भाकर लिपयता
ये गे जावया वाड्यात बसान खावया
वाड्यातली भाकर गोड गे
जावेचो काडलो झोड गे....'
याप्रमाणे झिम्मा फुगड्यांनाही या उत्साहात बराच ऊत येतो. गणेश चतुर्थी म्हटल्यावर अभंग व भजन यांना फुगडी इतकेच महत्त्व आहे. या भजनात ग्यानबा, तुकोबांच्या अभंगांनी आणि गजरांनी बरीच रंगत येते. भजनाची सांगता
देवा - देवींच्या आरत्यांनी होते. तरूणांचा या भजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

मोठ्या कुटुंबांचे गणेशोत्सव

कोकणात काही घरंदाज घराण्यांचा गणेशोत्सव एकत्रित साजरा केला जातो. मोठ्या कुटुंबात विभक्त व्यवहार असले तरी घराण्यांच्या परंपरेनुसार गणेशोत्सव एकत्र साजरा केला जातो. कोकणातील कुडाळ तालुक्यात माड्याची वाडी येथे सर्व गावडे कुटुंबीयांचा 150 ते 200 लोकांचा मिळून एकच गणपती पूजला जातो. सगळे खेळीमेळीने, उत्साहाने हा सण साजरा करतात. एवढ्या लोकांचे सहभोजन गणपतीसमोर होते. कुडाळपासून 12 किलोमीटर अंतरावरील आवळेगावामधील फौजदारवाडीत वास्तव्य करणाऱ्या सावंत यांचा एकत्रित शंभर - दीडशे कुटुंबांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. कोणत्याही प्रकारचा भांडण, तंटा न करता अगदी आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांचा असतो. रात्रभर भजनांनी जागर करण्याचा उत्साह व चण्या - वाटाण्यांच्या खमंग उसळीवर यथेच्छ ताव मारण्यात कोकणी माणूस अत्यंत आनंददायी वातावरणात रमून जातो.

एक गाव एक गणपती

ग"ामस्वच्छता अभियानात कोकणातील मालवण तालुक्यातील आंबडोस गाव अग"ेसर आहे. या गावाला स्वच्छता अभियानचे पहिले पारितोषिक महाराष्ट्र शासनाने प्रदान करून गौरव केला आहे. या गावात "एक गाव एक गणपती' ही संकल्पना साकारण्यात आली आहे. हा उपक"म आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. या संकल्पनेनुसार गावात घरोघरी गणपती पूजनापेक्षा गावच्या सर्व रहिवाशांचा एकच गणपती असल्यास सर्व गावकरी, वृद्ध, तरूण - तरूणी, पुरूष, महिला, मुले एकत्र येतील. त्या अनुषंगाने एकीचे बळ वाढेल. वाया जाणारा वेळ, अनावश्यक खर्च, धावपळ, भांडण, तंटे या गोष्टींना आळा बसेल. गावात शांतता व सुबत्ता नांदेल. आजकाल आजूबाजूच्या गढूळ वातावरणाचा गणेेशोत्सवावर अनिष्ट परिणाम झाला असून धार्मिकतेपेक्षा बाजारूपणाला, दिखाऊपणाला वाव मिळला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकवर्गणी, जाहिराती, लॉटरी याद्वारे जनतेची प"चंड लूट होत आहे. उत्सवातील सांस्कृतिक कार्यक"म म्हणजे रोंबासोंबा नृत्य, कर्णकर्कश आवाजातील वाद्यांचा साज, संस्कृतीची विटंबना करणारी समूहगीते यामुळे पवित्र, संस्कारित, आनंददायी उत्सवाला गालबोट लागते. या गोष्टी समाजातून पूर्णपणे हद्दपार होणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबडोस गावच्या लोकांची गणपती उत्सवाची आदर्श व मौलिक संकल्पना स्वीकारण्याची गरज आहे.
मनोहारी गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर आपण तिचे स्तवन करताना म्हणतो,
हे मंगलमूर्ती तूच आमची स्फूर्ती
गणनायक तू, ज्ञानदायक तू
सिध्दनायक तू, बुध्दिदायक तू
यशदायक तू, सुखदायक तू
दे आम्हा वरदान, दे आम्हा वरदान।
शेवटी गणपती बाप्पा स्वगृही जायला निघतात. तेव्हा लहानथोर सगळ्यांनाच का कोणास ठाऊक खूप वाईट वाटते. रोज आरती म्हणून व अभंग गाऊन त्या मूर्तीने घराच्या चराचरात चैतन्य आणलेले असते. सगळे श्री गणपतीला पुन्हा पुन्हा सांगतात,
"गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हांला
मोरया रे बाप्पा, मोरया रे'.
----

गणपती येई घरा...

विजय कापडी
गणेशचतुर्थीचा सण तोंडावर आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सारे एकेक करत आमच्या जुन्यापुराण्या- एरवी बंदच असलेल्या- वडिलोपार्जित घरात प्रवेश घेत होतो. एव्हाना आधी येऊन थडकलेल्यांनी घर धुऊनपुसून साफ केलं होतं. ज्येष्ठ नागरिक जमले होते. तरणीताठी मंडळी आपापल्या नोकरी-धंद्यात एवढी म्हणून मग्न होती की त्यांना आधी येणं अशक्यच होतं. आधी येऊन रिकामं बसणं म्हणजे केवढंतरी आर्थिक नुकसान त्यांना सहन करावं लागलं असतं. ते त्यांनाही नको होतं आणि त्यांच्याकडच्या आमच्यासार"या रिकामटेकड्या ज्येष्ठांनाही! हरितालिकेच्या दिवशी सकाळी सकाळी येऊन थडकणार. तोपर्यंत जमल्यास सगळी तयारी करून ठेवा असं त्यांनी मोबाईलवरून कळवलं होतं.
...तर आमच्यापरीनं आम्ही तयारीला लागलो होतो. स्वयंपाकघरात बायका नेहमीच्या उत्साहानं कामाला लागल्या होत्या. जेवणावळीची आणि चतुर्थीत करण्याच्या पदार्थांची तयारी जोरात सुरू होती. दिवाणखान्यात कुणी मखर साफ करत होता तर कुणी माटोळीच्या लाकडी चौकटीवरची वर्षभरात साचलेली धूळ पुसून काढत होता. वजनदार टेबल ओढल्यामुळे एकाचा पाठीचा कणा दुखावला होता. तो आराम करत बसला होता. तेवढ्यात समोरचं दार वाजलं. "कोण बरं असेल?' असं स्वतःशीच पुटपुटत संथ पावलं टाकत मी दाराशी गेलो. दार उघडलं तर दारात गणपती उभा! सोंड असलेला, डोक्यावर सोनेरी मुकुट, खांद्यावर शाल, सुंदर पिवळे धोतर नेसलेला, चार हातांचा गजानन! पायाशी उंदीरमामाही होता. मी त्याला निरखून पाहिले. सोंड डाव्या बाजूला झुकलेली होती. गणपतीच्या दर्शनानं झालेला पोटभर आनंद वरकरणी न दर्शविता मी विचारता झालो, ""गणपतीबाप्पा... तू?''
""हो... मीच! ओळख नाही पटली? आता पटेल....'' असं म्हणत गणपतीनं आपल्या सोंडेनं माझ्या गालावर एक चापटी मारली. एका हातानं उगाचच गाल चोळल्यासारखं करत मी म्हणालो, ""पटली रे बाबा... ओळख पटली! पण तू एवढ्यात का आलास? तुला यायला अद्याप दोनतीन दिवसांचा अवधी आहे.'' मी भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे त्याचं लक्ष वेधवत म्हटलं.
""आहे हे ठाऊक! हे बघ, जादा शहाणपणा करण्याचं कारण नाही. माझ्या आगमनाची तयारी केवढ्यावर आलीय ते पाहायला आलोय,'' गणपती किंचित रागानं म्हणाला.
""बघ ना! पण आत प्रवेश मात्र करू नकोस. उगाच धांदल उडेल आम्हा सगळ्यांची. आम्ही सारे ज्येष्ठ नागरिक. दुसरं काम नाही म्हणून लवकर येऊन तयारी करतो आहोत. आमच्याकडच्या तरण्याताठ्यांना त्याचं काही नाही बघ. येतील हरितालिका वा चतुर्थीच्या दिवशी....''
""उगाच पिरपिरू नकोस रे... तुझ्यावेळचे दिवस आठव. त्यावेळी तूदेखील उशिराच यायचास आणि तुझ्याकडची वडीलमंडळी सारी तयारी करायचे.''
""बाप्पा... म्हणजे तुला सगळं आठवतं? आश्चर्यच आहे....''
""न आठवायला काय झालं? मी तुझ्यासारखा ज्येष्ठ नागरिक झालोय थोडाच!'' खणखणीत सुरात गणपती वदला.
""बाप्पा, यंदा काही खरं नाही बघ... महागाईनं पेकाट मोडून ठेवलंय... कसंतरी करून भागवणार आहोत.''
""आहे रे ठाऊक... दरवर्षीचीच पिरपिर आहे ती! आठवून बघ... गेल्यावर्षीच नव्हे, त्याआधीच्या वर्षीच नव्हे तर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वीही हीच रड होती. महागाईनं पेकाट मोडलं! अरे, पूर्वी तुमच्यातले पुढारी जरा कुठं महागाई झालेली दिसली की तुम्हा साऱ्यांना जमवून सरकारचा निषेध करायची, मोर्चा न्यायची, नारे द्यायची... आता सगळं थंडथंड का असतं रे? आणि एक लक्षात ठेव, महागाईनं वाढायचंच असतं. कमी होते ती महागाई कसली?''
""आहे रे ठाऊक...'' असं गणपतीलाच म्हणायचा चान्स घेत मी म्हणालो, ""पण यंदाची महागाई काही वेगळीच आहे बघ!''
""वेगळीबिगळी काही नाही! अरे, तुम्ही आम आदमी ना रे? आम आदमीचं काम काय आहे ठाऊक?'' गणपतीनं जरा कठीणच प्रश्न विचारलेला दिसला तेव्हा मी उत्तरलो, ""बाप्पा, सोपे प्रश्न विचारायला काय घेशील?''
""मोदक आणि लाडू...'' हसत चटदिशी गणपती उत्तरला.
""ते मिळतील रे तुला! पण तुझ्या त्या प्रश्नाचं काय? आम आदमीनं काय करायचं असतं?'' मी भुवया उंचावत विचारलं.
""पूर्वीचे आम आदमी एक प्रामाणिक पुढारी निवडायचे आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सरकारला सळो की पळो करून सोडायचे. लक्षात ठेव, सरकार हे नेहमीच कुंभकर्णासारखं निद्रिस्त अवस्थेत असतं. त्यावर आम आदमीचा अंकुश हवाच!''
मी गणपतीला पुढं बोलू न देता म्हणालो, ""पण प्रामाणिक पुढारी आहेत कुठं? शिवाय सरकार कुंभकर्णाप्रमाणं झोपलेलं असतं असंही नाही. स्वतःच्या स्वार्थाच्यावेळी डोळ्यांत तेल घालून ते जागृतावस्थेत असतं!''
गणपती मला पुढं बोलण्याची संधी न देता म्हणाला, ""तेच तर मला म्हणायचंय. तुमचे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा सरकार झोपी गेल्याचं ढोंग करतं. ते खडबडून जागे होईल असं काहीतरी करायला हाती घ्या. दुसरी गोष्ट प्रामाणिकपणाची. तू स्वतःला प्रामाणिक समजतोस का अप्रामाणिक ते आधी सांग....''
""मी कसला प्रामाणिक? मत द्यायच्यावेळी मी पैसे घेतले. फुकटचं खाणंपिणं झोडलं. मोफतच्या सहली केल्या. देवदर्शनही उरकून घेतलं.''
""आता कसं बोललास? अरे, तूच जेव्हा अप्रामाणिकपणाचा कळस आहेस तेव्हा तुला प्रामाणिक पुढारी भेटणार कसा? हे जे सगळं चाललंय ना, ते सगळं तुझ्याच कृपेनं बरं....'' गणपतीनं सगळा दोष माझ्यावरच ढकलल्याचं जाणून मी नाही म्हटलं तरी घाबरलोच! विषय बदलण्याकरता म्हणालो, ""आज आम आदमीचं जीवन अस्थिर झालंय. केव्हा कुठं बॉम्बस्फोट होईल आणि आमचे प्राण जातील समजेनासं झालंय. मला सांग, अशावेळी तू स्वतःला विघ्नहर्ता म्हणवतोस, तू का नाही रे धावून येत आमच्या मदतीला?''
मला वाटलं मी गणपतीला चांगलाच पेचात पकडला. पण कसंच काय आणि कसंच काय! गणपती हसून म्हणाला, ""ते घडतंय तेसुद्धा तुझ्याचमुळे! अरे, बॉम्बस्फोट घडवून आणणारा तुमच्यातलाच एक असतो ना? त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत तुम्हीच तर करता! त्याला आसरा देताना सावधगिरी बाळगता? तो खूप खूप पैसे देतो आहे म्हणून त्याच्या अघोरी कृत्याकडं काणाडोळा करता की नाही?''
गणपतीच्या पेचानं मी चांगलाच उताणा पडलो होतो. काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणालो, ""हा पैसा आहे ना तोच सगळ्या समस्यांचं कारण आहे. अरे, मोठमोठ्या बॅंकेतल्या ट्रेझरीमध्ये बनावट नोटा सापडू लागल्या आहेत...''
""पुन्हा तेच! त्या बनावट नोटा कुणी ठेवल्या? संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय ही गोष्ट घडून येणे शक्य आहे का? तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता पण बनावट नोटांच्या बाबतीत तुम्ही गरीबच तर त्यांना मदत करता!'' गणपतीनं आणखीन एका दारुण सत्याचं दर्शन घडवलं.
""बनावट आणि खऱ्या नोटांच्या व्यवहारात भरपूर फायदा असतो गणराया... पण काय करणार?'' मला चेहरा पाडावा लागला नाही, तो पडला!
""हीच जर तुमची विचारधारा असेल तर प्रत्यक्ष देव म्हणजे त्यात मीसुद्धा आलोच- तुमची मदत करू शकणार नाही, लक्षात ठेव.'' गणपतीनं माझे जणू कानच उपटले.
""यावर उपाय सांगा गणराया...'' मी त्याचे पाय धरले.
""उपाय सांगणारा मी कोण? मानवजात ही परमेश्वराची सर्वात मोठी निर्मिती. विचार करण्याची शक्ती केवळ मानवातच आहे. त्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याऐवजी ती भलतीकडंच वळवून स्वतःची तेवढी तुंबडी भरण्याचे तुम्ही सारे जेव्हा बंद कराल तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या समस्यांना तुम्ही सोडवू शकाल.... बरं येतो मी! ठरलेल्या दिवशी येतो आणि उरलेलं सगळं सांगतो. तोपर्यंत आता जे सांगितलं त्यावर विचार कर. आणि नुसताच विचार करत न बसता कृतीही कर! तर मग येऊ मी?''
....आणि सोंडेनं माझ्या गालावर पुन्हा प्रहार केला. मी गाल चोळत उभा राहिलो. एवढ्यात घरातले इतर सारे माझ्याभोवती जमा झाले. रागानं विचारू लागले, ""काय झालं? दारात विठोबासारखा उभा राहून गणपतीची तयारी होईल कशी? चल... ते टेबल ओढायला मदत कर... कामचोर कुठला!''
दारात उभा राहून साक्षात गणपतीशी वरच्या पातळीवरची चर्चा करत होतो. तुम्हाला त्यात काय रस असणार? असं म्हणणार होतो, पण म्हणालो नाही. मुकाट्यानं ते सांगतील ते काम करू लागलो...

शास्त्रोक्त गणेशपूजन

चिंतामणी रा. केळकर

कोंकणवासियांचे गणेशोत्सवाचे "अप्रूप' सर्व सणांपेक्षा जास्त असते हे सर्वश्रुत आहे. शिवाय गणेशभक्त अगणित असल्याने गणेश हाच अग"पूजेचा मानकरी आहे.
प्रत्येकाच्या ऐपतीनुसार "सरंजाम' असला तरीही गरीब-श्रीमंत किंवा घरचा अथवा सार्वजनिक गणपती असो, सर्वच भाविकांना आपल्या इष्टदेवतेची पूजा विधिवत व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे.
पूजा साहित्याची प्रतिवार्षिकप्रमाणे सर्वांनाच माहिती असते; पण ती सहजसुलभ मिळण्यासारखी ठेवणे आवश्यक असते. या उत्सवात एवढा खर्च केला जातो की, प्रत्यक्ष गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या वस्तूंचा खर्च फारच गौण असतो. या पूजेसाठीच्या बऱ्याचशा वस्तू घरातच उपलब्ध असतात व थोड्याशाच विकत आणाव्या लागतात. महत्त्वाचे म्हणजे फुले, फळे, पत्री वगैरे गावात सहज उपलब्ध होतात.
पुरोहिताला पूजेसाठी फारच कमी वेळ असतो त्यामुळे सर्व तयारी जय्यत ठेवणे हे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे. अन्यथा वेळ वाया जातो व "आपत् धर्म' म्हणून कशीबशी पूजा आटोपावी लागते.
पुढे क"मानुसार "शास्त्रोक्त गणेशपूजा' कशी असते हे सांगितले आहे.
पूजाविधीसंबंधी अनेक पुस्तके, पोथ्या उपलब्ध असतात. थोड्याफार फरकाने त्यात वेगवेगळे मंत्र असतात, परंतु "सर्वदेवपूजा' म्हणजे जी सर्व देवांना चालते तीच विशेष प्रचारात असते. कोणत्या देवतेला काय आवडते किंवा काय वाहावे व काय वाहू नये याबद्दल सर्वांना माहिती असते. शिवाय या पूजेचा संकल्पच "प्रति वार्षिक विहितं श्रीपार्थिव गणपती किंवा उमामहेश्र्वरसहित श्रीपार्थिव गणपती पूजनं करिष्ये' असाच आहे. म्हणजे दरवर्षीच्या पद्धतीने ही प्रथा सर्वांनाच माहीत असते.
आचमन करून व संकल्प करून, त्यानंतर कलश, घंटा, शंख, समई यांची पूजा स्वत:वर व तेथील सर्व पूजासामग"ीवर पाणी शिंपडून (याला प्रोक्षणाविधी म्हणतात) पूजेला आरंभ होतो.
यानंतर गणेशपूजा. अग"पूजेचा मानकरी म्हणून "महागणपती पूजनं करिष्ये' असा संकल्प करून नंतर पंचामृतविरहित आवाहन - आसन (अक्षता), पाद्यं (पाणी), अर्ध्य (पळीत पाणी व त्यात गंधफूल घालून वाहाणे), वस्त्र (कुंकुमयुक्त कापसाचे वस्त्र किंवा अक्षता) नंतर गंध, हळद, कुंकू, दूर्वा घालून उदबत्ती, दिवा, नैवेद्य दाखवून विडा व त्यावरील नाण्यांवर पाणी सोडावे. नंतर कार्यारंभी तुझे पूजन करतो अशा अर्थी -
कार्य मे सिध्दीमायांतु प्रसन्नो त्वयिधातरी।
विघ्नविनाशमायांतु सर्वाणि सुरनायक।।
अनयापूजया विघ्नहर्ता महागणपती: पि"यताम् असे म्हणत ताम्हणात हातावरून उदक सोडावे.
आपणाला अभिप्रेत गणपती म्हणजे पार्थिव. मातीची मोठी उत्सवमूर्ती आणि ताम्हणात तांदळांवर आपल्याकडे सोंड करून ठेवल्या नारळाची महागणपती म्हणून असलेली पूजा हे दोन वेगवेगळे भाग आहेत हे नेहमी लक्षात घ्यावे. नारळाऐवजी सुपारीही ठेवण्याची पद्धत आहे. विडा, दक्षिणा (नाणे), नैवेद्य सर्व एकाच ठिकाणी ठेवतात. पूजाविधी संपल्यानंतर या गणेशपूजेचे विसर्जन करून ती ब"ाह्मणाला दिली जाते. जर उत्सव संपेपर्यंत यत्किंचितही हलणार नसेल तरच ठेवावी. तिचे विसर्जन करणे माझ्या मते योग्य वाटते.
उत्सवादरम्यान रोजच्या पूजेतही गणेशपूजा न ठेवता "महागणपती स्मरणंच करिष्ये' असे म्हणून गणपतीचा एखादा मंत्र म्हणून नंतरच पूजाविधी करावा. या उत्सवादरम्यान इतर काही दैनंदिन कार्ये करायची तर त्या प्रत्येकवेळी वेगळी गणेशपूजा ठेवणे स-शास्त्र आहे.

प्रथा आणि पद्धत

कोंकण प्रांतात पार्थिव गणपती सोबत उमामहेश्र्वराची (याला गौरी महादेव म्हणतात) पूजा करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी व काही समाजात - जातीत ही प्रथा नाही. काही ठिकाणी काही जातीत याबद्दल हरितालिकांची महेश्वरासहित वेगळी पूजा प्रामु"याने स्त्रियांकडून केली जाते.
गौरी महादेव : महादेवस्वरूपी अ - सोला नारळ आपल्याकडे देठ करून ठेवला जातो. गौरीस्वरूप म्हणजे झाडांच्या फुलापानांभोवती गौरीचे चित्र गळेसरीने बांधून ठेवले जाते.
पार्थिव गणपती व उमामहेश्वरसहित एकच पूजा करण्यापेक्षा अगोदर उमामहेश्वराची पूजा व नंतर मु"य उत्सव मूर्ती - अभिप्रेत पार्थिव गणपतीची पूजा करणे पद्धतशीर व योग्य असते. उपलब्ध जागा, आरास - मांडावळ याचा विचार करता असे करणे योग्य वाटते.
प"थमत: गणेशपूजेत दिल्याप्रमाणेच ही पूजा करून घ्यावी. महादेवाला कुंकूविरहित दुपदरी वस्त्र, जानवे जोड, चंदन, अष्टगंध पांढरी किंवा पिवळी फुले, बेल या उपचाराने पूजाविधी, तर गौरीला कुंकू लावलेले दुपदरी वस्त्र, हळद कुंकू, सर्व प्रकारची फुले, तुळशीपत्र घालावे. विडा, दक्षिणा, नैवेद्य हे सर्व अर्पण करावे.
"श्री उमामहेश्वराय नम: ......... (उपचाराचे नाव/कृती) समर्पयामि' एवढेच म्हणणे पुरेसे आहे.
मु"य पार्थिव, गणपतीच्या पूजेचे मंत्र, अर्थ व वाहण्याच्या उपचारांची सर्व माहिती वगैरे सर्व स्थलसंकोचास्तव देणे अशक्य आहे. देवतेची पूजा ही षोडशोपचार असते. म्हणजेच 16 प्रकारचे उपचार असून त्याचा जो क"म आहे त्याच क"माने ही पूजा होणे म्हणजेच शास्त्रोक्त पूजाविधी होय. आपण जे चिंतितो किंवा अर्पण करतो ते प्रत्यक्ष वस्तू व कृतीने देवाला समर्पण करतो हे लक्षात घ्यावे. म्हणूनच प्रत्येक उपचारानंतर त्या कृतीचे किंवा वस्तूचे नाव ... घेऊन "समर्पयामि' असे म्हटले जाते.

एक महत्त्वाचा बीजमंत्र

"गं।।' हा गणपतीचा बीजमंत्र आहे. कारण गणपती अर्थवशीर्षामध्ये : ग कार: पूर्वरूप, अकारो मध्यमरूपं, अनुस्वार : श्र्चान्त्यरूपं, बिंदुरूत्तर रूपं ... असे वर्णन केलेले आहे. (मंत्र सामर्थ्य अगाध आहे. मंत्रशास्त्र - मंत्रविधान याबद्दल तर काय सांगायचे! बीजमंत्र हा तर फारच प्रभावी असतो.)
अपुरी पुरोहितांची सं"या, गडबड, ठराविक वेळ या सर्वांचा विचार करता तुम्ही जे उपचार वाहणार आहात, त्याबद्दलचे प"त्येकाचे वेगळे मंत्र असूनही केवळ "श्री गं गणपतये नम: .... (उपचार - कृतीचे नाव) समर्पयामि' एवढेच म्हणून क"मानुसार जर पूजाविधी केलात तर तो "स-शास्त्र'च होईल.ं
पंचोपचार व षोडशोपचार हे पूजाविधीचे दोन प्रकार असून सायं किंवा रात्रीची पूजा आंघोळ करून सोवळ्यातच पंचोपचार करण्याची पद्धत आहे. हे पाच उपचार म्हणजे - गंध, फूल, धूप, दीप व नैवेद्य. उदाहरणार्थ - बीजमंत्राने गणपतीची पंचोपचार पूजा करायची तर - 1) श्री गं गणपतये नम: चंदनं समर्पयामि, 2) श्री गं गणपतये नम: पुष्पं समर्पयामि, 3) श्री गं गणपतये नम: धूपं समर्पयामि, 4) श्री गं गणपतये नम: दीपं समर्पयामि, 5) श्री गं गणपतये नम: नैवेद्यं समर्पयामि.
आचमन करून स्वत:ला आणि कुंकुमातिलक लावून नंतर एखादा गणेशमंत्र म्हणावा व वरीलप्रमाणे जर पूजा केली तर ती पूर्णत: "स-मंत्रक'च व "स-शास्त्र'च होईल. घंटानाद जो केला जातो, तो स्नाने धुपेच, दिपेच तथा निरांजनेचिच एवढ्या वेळातरी असावा असे वचन आहे. षोडशोपचारांत "अक्षता' नाहीत, पण प्रत्यक्ष पूजाविधीत त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या वाहणे आवश्यक. शिवाय एखादा उपचार नसता किंवा जानवे वस्त्रादि उपचार परत परत बदलायचे नसल्याने त्यावेळी नाव घेऊन अक्षताच घालतात.
"द्रव्याभावे प्रदातव्या क्षलिता: तंदुला: शुभा:' असे वचन आहे. उदा. "श्री गं गणपतये नम: उपवस्त्रार्थे (जानव्याबद्दल) अक्षताम् समर्पयामि' म्हणावे.

षोडशोपचार : 16 उपचार

यांचा क"म आणि त्यानुसार काय वहावे व इतर महत्त्वाच्या गोष्टी पुढे दिल्या आहेत. गणपतीचा एखादा मंत्र ध्यान करून पूजारंभ करावा.
1) आवाहन - प्रीत्यर्थ अक्षता, 2) आसनं - प्रीत्यर्थ अक्षता, 3) पाद्यं - पळीने किंवा दूर्वा-फुलाने पाणी, 4) अर्ध्य - पळीत पाणी घेऊन त्यात गंध, लहानसे फूल किंवा फुलाची पाकळी घालून वाहणे, 5) आचमन - पळीने किंवा दूर्वाफुलाने पाणी, 6) स्नानम् - पळीने किंवा दूर्वाफुलाने पाणी. (पंचामृत - दूध, दही, तूप, मध, साखर मिश्रण.)
सहाव्या उपचारानंतर पंचामृत वरीलप्रमाणेच पळी किंवा दूर्वा अथवा फूल बुडवून घालणे. यावेळी गंधोदक म्हणजे पळीत चंदन घालून स्नान, सुगंधित द्रव्याने स्नान, उष्णोदक म्हणजे गरम पाण्याने स्नान घालणे. प्रत्येक स्नानानंतर शुध्दउदक घालणे. उदा. "श्री गं गणपतये नम: उष्णोदक स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि' अशा प्रकारे स्नानापर्यंत पूजाविधी करावा. आपणाला येत असलेले स्तोत्र म्हणत गणपतीवर दूर्वेने पाणी/दूध घालत राहून अभिषेक करावा. उरलेल्या पंचामृताचा "श्री गं गणपतये नम: पंचामृत शेष नैवेद्ये समर्पयामि' असे म्हणून नैवेद्य दाखवून गंधफूल वहावे. (शेष नैवेद्य हेच तीर्थ मानतात.) एवढ्यापर्यंतच्या पूजाविधीला पूर्वपूजा म्हणण्याचा प्रघात आहे.
षोडशोपचारांतील पुढील उपचार क"मान्वये -
7) वस्त्रं - कापसाचे प्रत्येक मण्यामध्ये कुंकू लावलेले 5, 11 किंवा 21 मण्यांचे दुहेरी (जोडीने) वस्त्र, 8) उपवस्त्र - जानवे जोड, देवाच्या डाव्या खांद्य़ावरून उजव्या हाताखाली, 9) गंध - चंंदन व याचवेळी रक्तचंदन, हळद, कुंकू, अबीर एका, अष्टगंध, सुगंधी द्रव्ये वाहावी, अक्षता वहाव्या, 10) पुष्पं - यावेळी वेगवेगळी फुले, दूर्वा, शमी बेल, पत्री, 11) धूपं - उदबत्ती किंवा प्रत्यक्ष धुपाटण्यातील धूप, घंटानाद, 12) दीपं - एकारती शक्यतो शुद्ध तुपाची फुलवात, घंटानादासह, 13) नैवेद्य - जेथे नैवेद्य ठेवतात त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करावे. साधा किंवा महानैवेद्य, मोदक, करंज्या वगैरे नैवेद्य. याचवेळी तांदुळ म्हणजे विडा, त्यावर नाणे दक्षिणा म्हणून, एखादे फळ किंवा नारळ ठेवून पाणी सोडणे. पंचारती घेऊन घंटानाद करत दाखवणे..."श्री गं गणपतये नम: महानिरंजन दीपं समर्पयामि' असे म्हणून आरत्या म्हणाव्या. कापूर पेटवणे (कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि') 14) प्रदक्षिणा - स्वत:भोवती 3, 5, किंवा 7 वेळा फिरणे, 15) नमस्कार - साष्टांग 16) मंत्रपुष्प - ओंजळीने देवावर फुले वहावी. "श्री गं गणपतये नम: मंत्रपुष्पं समर्पयामि' असे म्हणत आपल्या मनातील इच्छा संकल्प सांगणे म्हणजेच "गाऱ्हाणे' घालावे.
येथपर्यंत षोडशोपचार विधिवत पूजा झाल्यानंतर परत एकदा हातावर पळीतून पाणी घेऊन "श्री गं गणपतये नम: अनेन यथाज्ञानेन यथा मिलीतो पचार: द्रव्यै: ध्यानावाहनादी षोडशोपचार पूजना"येन कर्मणा श्री भगवान गणपती: प्रियताम् न मम' असे म्हणून हातातील उदक ताम्हणात सोडणे.
पुन्हा - "श्री केशवाय नम:, श्री नारायणाय नम:, श्रीमाधवाय नम:' असे म्हणत आचमन करावे व पुढे "गोविंदाय नम:, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नम:' असे म्हणून या यथासांग (षोडशोपचारसहित, सशास्त्र, समंत्रक) पूजाविधीची सांगता होते.


----------------------
-1-
सत्यनारायणाची आरती

जयदेव जयसत्य नारायण देवा
शक्तीभावे करतो पदपंकज सेवा ।।धृ।।
आर्तांचा कैवारी दीना कनवाळू।
पालन पोषण करिसी त्राता मायाळू।।
संंकटनाशक होसी तूची कृपाळा।
आधिव्याधी पिडा नाश करी सकळा।।
व्यापुनि साऱ्या विश्र्वा दशांगुळी उरला ।
प्रलयानंतर सृष्टी रचिता जाहला ।।
अनादी अंतीही विश्र्वीं तू सारा।
तुझिया मायेचा हा खेळ सारा।।
तुजविण देवा जग हे आहे निरर्थ।
नारायण योगे नर हो कृतार्थ।
नश्र्वर विश्र्वीं तू नारायण सत्य।
नतमस्तक नमितो नारायण नित्य।।

- रचना: नारायण रामचंद्र केळकर

-2-
जयकाल जयईश जयसत्यदेवा
तुझिया दासांचा प्रणिपात घ्यावा ।।धृ।।
शंख चक" गदा पद्म तुझ्या हाती
कंठी वनमाला सुंदर शोभती।
श्रद्धा भक्ती ठेऊनि व"त जे आचरती
त्यांच्या पुरती इच्छा विघ्नेही हरती।।
केवळ संयावके तू तृप्त होसी
तुलसी दल अर्पिता सत्वर पावसी
सत्यदेव नामे कलियुगी तव "याती
सेवे ईप्सित देऊन मोक्षपदा नेसी।।
पंचामृत प"ाशता आरोग्या देणे
कथा श्रवणायोगे दु:खाते हरणे
दीन दुबळ्यांची मानून घे सेवा
हेचि विनिती तुला, जय सत्यदेवा।।
जयदेव जयदेव जय सत्यदेवा।।


- रचना : चिंतामणी केळकर आणि वाटवे बंधू

गोव्याचा गणेशोत्सव

सुधा सुरेश आमोणकर
गोव्यात गणेशोत्सवाला फार मानाचे अन् महत्त्वाचे स्थान आहे. "गणेशोत्सव' हा गोव्यातला मु"य सण. गणेशाच्या आगमनाचा उत्स्फूर्त उत्सव साजरा होतो. प्रत्येक हिंदू परिवारात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व हर्षोल्हासाने साजरा केला जातो. हिंदू परिवार एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे वेगाने वाटचाल करीत असताना गणेशचतुर्थी हा सण त्यांना काही दिवसांसाठी का होईना एकत्र आणण्याचे काम करतो.
जादूगार श्रावण येतो आणि सृष्टीला हिरव्या साजात नटवून फुलांच्या मखरात बसवून जातो. सृष्टी हिरवीगार- प्रफुि"त दिसू लागते. तिच्या प्रसन्न दर्शनाने प्रत्येकाचं मन फुलून जातं आणि त्या वेळेलाच गणेशाचं आगमन अगदी सुखदायक आणि विलोभनीय वाटतं.
गणेश हा सर्व देवांमध्ये आद्य देव
ओम नमोजी आद्या
श्री वेद प्रतिपाद्या
जय जय सं संवेदया
आत्मरूपा
देवा तुचि गणेशु
सकलार्थ मति प्रकाशु
म्हणे निवृत्ति दासू
अवधारिजो जी
अशा शब्दांत शब्दप्रभू ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच आदी दैवत श्री गणेशाचे नमन गायले आहे. या नमनात ज्ञानदेव म्हणतात, "गणेशा तूच ओंकार आहेस, तुझ्यात सर्व विश्व सामावलेले आहे. तूच सर्व कलांचा अधिपती आहेस. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, चौदा विद्या, चौसष्ट कला ही सगळी तुझीच रूपे आहेत.' ज्ञानदेवांनी गणपतीलाच नट, नटेश्वर आणि नटश्रेष्ठही ठरवून टाकले आहे. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण सर्वच क्षेत्रांत गणरायाचा संचार आहे. विद्वान कितीही शिकलेले असले तरी ते भक्तिक्षेत्रात म्हणा किंवा कलाक्षेत्रात गणाधिपतीलाच आधी वंदन करतात. कोणत्याही धार्मिक समारंभापूर्वी गणेशाचीच पूजा प्रथम केली जाते.
गोव्यात मुक्तीपूर्वीही श्री गणेशपूजन अथवा गणेशचतुर्थी सगळीकडे मोठ्या उमेदीने साजरी केली जात होती. घराघरांत गणेशचतुर्थी साजरी करण्यापूर्वी रंगसफेदी करून घर उमेदीने सजविले जात होते. घरासमोरील अंगणात लहानसा मंडप टाकून आणि तुळशी वृंदावनापाशी शेणाने अंगण सारवून रांगोळी घातली जात होती. गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री गणपतीची माटोळी विविध फळाफुलांनी सजवलेली, बहरलेली असायची. घरात ज्या जागी गणपतिपूजन असायचे त्या जागी पताका लावून दिव्याची आरास करून ती जागा शोभिवंत केली जात होती. अशा या सणाला गणेशचतुर्थीच्या दिवशी तर आनंदाला उधाण यायचं. प्रत्येक वाड्यावरील लोक प्रत्येकाच्या घरी आनंदाने मिळून-मिसळून भक्तिभावाने आरत्या, भजन करण्याकरिता जात असत. गणेशचतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत लोक यात भाग घेत असत. सर्वप्रथम दीड दिवस असलेला गणपती हळूहळू काहींच्या घरी पाच, सात, नऊ, अकरा दिवसांचा सगासोयरा बनून राहू लागला.
गोव्यातला हा घरगुती उत्सव जरी दीड दिवसाचा असला तरी या उत्सवाची तयारी करताना लोकांच्या उत्साहाला उधाण येते. श्रीमूर्ती घरी आणताना तर त्यांचे चेहरे सात्त्विक आनंदाने फुलून आलेले दिसतात. घरोघर बायकांची पाककला बहरते. मुलांना मखर सजवण्याचं वेड लागतं. मंत्रपुष्पांजलीचे घोष घुमू लागतात. भजनांचे स्वर निनादू लागतात.
गोव्यात घराघरांत गणपती पूजले जात नाहीत. इथले गणपती बहुधा कुटुंबीयांचे असतात. मूळ घराच्या चौकात वा देवळात गणपती पूजला जातो. घर माणसांनी फुलून जाते. हा उत्सव कौटुंबिक एकोपा आणि सामाजिक सलोखा याची ऐट मिरवत दीड वा पाच दिवस आनंदाच्या डोही तरंगत असतो. ही एका कुटुंबातली दूरवरची माणसे एकत्रपणे गणेशचतुर्थी साजरी करतात. दूरवरचे लोक मुंबईहून, दुबईहून, अमेरिकेतून मुद्दाम येतात. आपापल्या घराण्याच्या मूळ जागी जमतात. गणेशमूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात. आप्तेष्टांना प्रेमानं भेटतात. तीही माणसे प्रफुि"त होतात. कोकण- गोव्याची माणसे जगभर पांगलेली असली तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ती आपल्या मूळगावी- मूळघरी जमतात. आपल्या पाळामुळांचं, वाडवडिलांचं स्मरण करतात आणि पुन्हा दूरदेशी निघून जातात.
"पैरी'ची परंपरा गोव्यात अजूनही दृष्टीस पडते. "पैरी' म्हणजे कुटुंबातील एका सदस्याला मिळणारी कुलदेवतेची पूजा करण्याची संधी होय. गणपतीचेही सगळे विधी त्यानेच करावे असा रिवाज आहे. घराण्याचं दैवत पूजायला मिळतंय याचा त्यांनाही अभिमान वाटतो. ही "पैरी' कुटुंबात चक"गोलाकार फिरत असते. त्यामुळे सर्वांना देवपूजेची संधी मिळते. सर्वांना पूजेचा लाभ व्हावा म्हणून आळीपाळीने खर्च करण्याची संधी दिली जाते. "पैरी' असते त्यानेच गणपतीची ओवाळणी करून मूर्ती घरात घ्यायची असते. परंपरेनुसार "पैरी'वाल्याने देवळाच्या दारावर उभे राहून शंखनाद करायचा व आरतीसाठी साद घालायचा अशी प्रथा आहे. त्यानंतर सामूहिक आरती होते. गावभरातील बहुतेक लोक आरतीसाठी घराघरांत जातात.
गोव्यात पुराणाबरोबरच (काहींच्या घरात) सद्यस्थितीवर आधारित देखावेही असतात. एकापेक्षा एक देखावा सरस-वरचढ असतो. कुटुंबीय मोठ्या हौसेने देखावे सजवतात. नाचतात, गातात. मग सामूहिक आरती होते. होडीतून गणपती विसर्जनासाठी नेले जातात.
आज जग जवळ आलं आहे, परंतु माणसं एकमेकांपासून दूर गेली आहेत. जीवनस्पर्धा वाढलेली आहे. ताणतणाव वाढलेले आहेत. परस्परांच्या गाठीभेटी दुर्मीळ झाल्या आहेत. अशा काळात या गणेशपूजनाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. एकमेकांच्या सुखदुःखाची दखल घेतात, एकमेकांचे भले इच्छितात ही गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या किती मोलाची आहे? गणेशाचं धार्मिक महत्त्व लोकांना अजूनही वाटतं. परंतु त्यापेक्षा त्याचं अधिक महत्त्व आहे ते सांस्कृतिकच असं मला प्रांजळपणे वाटतं.
"भारतकार' हेगडे-देसाई यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, "देवांकरिता मनुष्ये नाहीत, मनुष्यांकरिता देव आहेत.' गोव्यातील गणेशपूजनाच्या दीड दिवसाचा सोहळा पाहिला की भारतकारांचे म्हणणे पटू लागते. गजाननाचं अस्तित्व लोकांकरिता आहे. लोकजीवनाला उत्साहित करणे, आनंदित करणे, लोकांच्या पठण कलेला, गायन कलेला प्रोत्साहन देणे, लोकांमधला प्रेमभाव वृद्धिंगत करणे हे फार मोठे सांस्कृतिक कार्य श्री गजाननाच्या कृपेने गोव्यात गावोगाव, घरोघर चालू आहे.
लोकांचं गणपतीदर्शनात समरसून जाणं दिसतं. त्यांचा सात्त्विक भाव, त"ीनता, त्यांची अखंड श्रद्धा, त्यांची अनन्य भाविकता दिसते. आणि ती खरीच मला विलोभनीय वाटते. गणेशाच्या भक्तिभावातून येणारी ही जाग मला फारच मौलिक वाटते. आणि ही भावना माझ्या मनाला प्रफुि"त करते.
आता गोव्यातही गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव होऊ लागले आहेत. दीड दिवसाचे घरगुती गणेशपूजन असो किंवा दहा दिवसांचे सार्वजनिक उत्सव असोत, श्रीगणेशाच्या कृपेने गोव्यातल्या सांस्कृतिक जीवनाला उधाण येते. माणसामाणसांतील प्रेमाला भरते येते. गणेशोत्सवाच्या धार्मिक कार्याची ही सांस्कृतिक फलश्रुती लाखमोलाची आहे.
आजच्या काळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना काही चांगल्या सृजनात्मक आणि परिणामकारक कार्यक"मांची आखणी करता येईल. प्रसन्नचित्त भक्तिभावाच्या वातावरणाची खऱ्या अर्थाने निर्मिती व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी भजनाची सुरुवात टाळ, मृदंग, ढोल, झांज, ताशा, पेटी, तबला, घुमटवादनाने करावी. त्यातून नव्या पिढीला नवदर्शन, नवा प्रत्यय येण्याची दाट शक्यता आहे. त्यातूनही त्यांना अलौकिक आनंद मिळू शकतो. त्याचसोबत नव्या पिढीला आकर्षित करणारे पाश्चात्त्य संगीत, नृत्य काहीवेळापुरतं मर्यादित असू शकतं. त्यातून जुन्या-नव्या पिढीतले हे अंतर हळूहळू कमी होऊ शकते. त्याचबरोबर प्रबोधनात्मक उपक"म हाती घेतल्यास समाज, गाव, परिसर साक्षर, व्यसनमुक्त होण्यास मदत होऊ शकते. भौतिक संपन्नतेबरोबर निर्माण झालेल्या सामाजिक, मानसिक, कौटुंबिक, वैयक्तिक अस्वस्थेची कारणे दाखवणाऱ्या अनेकविध कार्यक"मांची आखणी करता येईल. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळू शकते.
आज सार्वजनिक गणेशोत्सवाची अत्यंत गरज आहे ती सामाजिक जनजागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी. सार्वजनिक गणेशोत्सव सत्कारणी लागावा म्हणून या उत्सवात मनोरंजनात्मक कार्यक"मांत सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक"मांचे आयोजन करता येईल. नाटकांच्या माध्यमाद्वारे दारू, चरस, गांजा यांचे दुष्परिणाम, एड्स रोगाची महाभयानकता, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणप्रसार, स्वच्छता मोहीम यांवर प्रकाशझोत टाकणे अत्यावश्यक आहे. विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञानावर आधारित चाचण्या, वादविवाद, लेखन, वाचन, कथाकथन इत्यादीमुळे या स्पर्धेच्या अनुषंगाने त्या भागात राहणारी मुले एकत्र येतील व त्यांच्यातील सुप्तगुणांना चालना मिळेल. व्यक्तिमत्त्व विकासालाही प्रेरणा मिळून त्यातून त्यांना अखंड आत्मविश्वास मिळू शकतो तसेच सृजनशीलतेचा प्रभावही त्यांच्यावर पडू शकतो.
गोव्यातला हा गणेशोत्सव, गावागावांमध्ये कुटुंबा-कुटुंबांमध्ये एक वेगळंच अपूर्व वातावरण निर्माण करून जातो. एक प्रभावी परिणामकारक एकोप्याचं संमेलन घडवून आणतो. एकमेकांचं मन फुलवून जातो. सर्वांना आनंदित करून सोडतो. पुढच्या वर्षी असाच उत्साह, उमेद मिळो, असाच आनंद लुटायला मिळो हीच इच्छा गोवेकरांना उत्कट शक्ती देऊन जाते. हाच ना जीवनातला सुखदायी गणेशोत्सव!
भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा करावा असं गोवेकरांना वाटत असणारच. म्हणून त्यांना आणि इतरांना त्यातील सोज्वळ आनंद मिळवायची एक सुंदर संधी मिळू शकेल. समाजातल्या सर्वधर्मीयांना एकत्र आणणे फार गरजेचे आहे. सर्वांना हा उत्सव आपलाही आहे असे वाटणे नितांत आवश्यक आहे. म्हणून तिथं एक ख्रिस्ती धर्माची प्रार्थना, एखादा इस्लामी नाज, यहुदी प्रार्थना, बौद्ध प्रार्थना आणि तत्सम प्रवचन तथा कीर्तनही ठेवता येतं. गोमंतकीयांनाही इतर धर्मांमध्ये चालणाऱ्या प्रार्थना ऐकायला मिळतील. तसंच इतर धर्मीयांना त्यांना मान्य असलेल्या परमेश्वराचं स्वरूप गणेशात अनुभवायला मिळेल. बंधुभावनेनं एकमेकांना समजून घ्यायची मनात इच्छा बाळगून जर असे कार्यक"म केले तर गणेशोत्सवाचे विशाल उद्दिष्ट प्राप्त झाले असे म्हणता येईल. शेवटी गणेशोत्सव लोकांना एकत्र आणायलाच साजरे केले जातात ना! ते कार्य या धार्मिक सोहळ्याच्या सोज्वळ वातावरणातही सहजपणे केलं जाऊ शकते. हळूहळू का होईना या सर्वधर्मसमभावाच्या लहरी निर्माण होऊन एकत्वाची भावना सर्वांना एकत्रित आणील असं मनापासून वाटतं.
सर्वांनी मिळूनमिसळून साजरा केलेल्या या गोव्याच्या देखण्या उत्सवाला भक्तिमय, भावनाप्रधान, ईश्वरमय स्वरूप येतं व हा सण मोठ्या आनंदाने, उमेदीने, उत्साहाने साजरा केला जातो. सगळीकडे आनंदीआनंदाचे वातावरण गोवेकरांच्या मनाला विलक्षण तेज देऊन जाते.

श्री गणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ

डॉ. सदाशिव गजानन देव

जून महिना सुरू झाला की गणपती उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रांतून झळकू लागतात. उत्सव मंडळांना जाग येते. नव्या कार्यक"मांच्या चर्चा सुरू होतात. उत्सवाचे वातावरण घराघरांतून जाणवायला लागते. मग उत्सवाकडे प्रवास करणारे दिवस कृतिशील बनायला लागतात. संपूर्ण देशभर ही लगबग जाणवते. गणपतीचा उत्सव म्हणजे वार्षिक लोकोत्सवच! तो अहमहमिकेने गाजवला नाही तरच नवल!
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. "विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक' अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते. आता या कोटीसुर्यसमप्रभ महाकायाचे विधिवत विसर्जन करणे एवढेच शि"ुक असते. तेही वाजतगाजत. "जे जे निर्माण होते ते ते वाढत जाते आणि उचित कालानंतर ते नष्ट होते' हा सृष्टीचा नियम सर्वांच्या अनुभवाचा आहेच! मग गणपतीही या नियमाला अपवाद कसा असेल?

गणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप


गणपती देवता हजारो वर्षे पूजनीय मानली जाते आहे. या घटनेला फार मोठा इतिहास लाभला आहे. प्रतिवर्षी या इतिहासाची एक आवृत्ती करावीच लागते, कारण नवीन घडणारी पिढी पुढील काळात ही जबाबदारी पेलणार असते. आपण राहतो त्या विश्र्वाची निर्मिती झाली त्यावेळी प्रचंड स्फोट झाला. हा आवाज "ॐ' या उच्चारणासारखा होता असे म्हटले जाते. "ॐ' हा ओंकार म्हणजेच महागणपतीचे नादस्वरूप होय. म्हणूनच गणपतीचे एक नाव "ओंकार' आहे. याचा अर्थ विश्वाच्या निर्मितीचे आदितत्व गणेशाच्या अस्तित्वाशी असे जोडले गेले आहे. भारतीय प्राचीन साहित्यात गणेशासंबंधी पाचव्या शतकापासून उ"ेख सापडतात. त्यापूर्वीच्या साहित्यात मात्र गणपतीचा उ"ेख सापडत नाही. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र, त्यामुळे त्याचा उ"ेख साहित्यात वेदकाळापासून का झालेला नाही, याचा शोध विचारवंतांनी घेतला आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी मांडलेल्या मतांना छेद देऊन सनातनी पंडितांनी गणेश देवता "वैदिक देवता' असल्याचे सिद्ध केले. यासाठी पंडितांनी "गणपत्यर्थवशीर्ष' या उपनिषदाचा आधार दिला. या उपनिषदात गणपती देवतेचे संपूर्ण वर्णन व स्वरूप यांचा ऊहापोह केला आहे. अथर्ववेदाचा हा भाग आहे. तसेच ऋग्वेदातील "ब"ह्मणस्पती सूत्र' हे गणपतीचेच सूत्र आहे. वैदिक वाङ्मयातील "ऋग्वेद' हा आदिग"ंथ आहे. "ब"ह्मणस्पती' ही एक वैदिक देवता आहे. ही देवताच गणपतीचा पूर्वावतार आहे असे मानले जाते. ब"ह्मणस्पतीच्या हातात सुवर्णपरशु आहे, तसेच या वेदोक्त देवतेचे प्रथम पूजन केले जाते. खाली दिलेल्या मंत्रात गणपती आणि ब"ह्मणस्पद या देवतांचा उ"ेख सहज लक्षात येतोः
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे । कविं कविनामुपमश्रवस्तमम।
ज्येष्ठ राजं ब"ाह्मणां ब"ह्मस्पत। आ न: शृण्वन्नुतिथि: सीद सादनम्।। (ऋग्वेद 2. 23. 1)
एकूण गणपती या देवतेबद्दल भाष्यकारांनी विपुल साहित्य निर्माण केले आहे.

श्री गणेशाचे आध्यात्मिक स्वरूप

गणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप वर दिलेले आहे. आता या देवतेचे आध्यात्मिक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. "गणपत्यर्थवशीर्षा'त या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे, ते असे.
""हे गणेशा, तू तत्व आहेस. तू प्रत्यक्ष ब"ह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस. तू सर्व काही आहेस''.
वाड्:मयाच्या अंतरंगात गणेशाचे अस्तित्व लक्षात येते, तर हीच गणेशाची उपस्थिती नादब"ह्मातही अनुभवता येते. तसेच गणेशोपासना प्रणयोपासनातूनही साध्य होते. अंतत: ही उपासना साक्षात ब"ह्मविद्याच आहे. मुद्गलपुराणात गणपतीचे असे व्यापक वर्णन केले आहे. ज्या मूलाधार चक"ात गणपतीचे अस्तित्व सतत असते ते चक" आणि तेथील कमळ लाल रंगाचे आहे म्हणून या देवतेला रक्तपुष्प, रक्तवस्त्र आणि रक्तचंदन यांची आवड आहे. गणेशाच्या पूजनात रक्तवर्ण असा विपुलतेने योजलेला आहे. गणेशाची अशी विविध वर्णने साहित्यात अनेक ठिकाणी वाचायला मिळतात.

गणेशाचे समाज स्वरूप

गणपती नावाप्रमाणेच गणनायक आहे. तो समाजातील सर्व लोकांना आपलाच वाटतो. त्यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही. सर्वच माणसांना जीवनात संकटांचा सामना करावा लागतो, लहान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. श्री गणेश देवतेवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवनप्रवास करीत असताना आपली श्रद्धा आणखी बळकट व्हावी, ती सामर्थ्यवान असावी यासाठी गणेशभक्त सदा तत्पर असतात. गणपती देवता संकटात मार्गदर्शन करते व त्यातून निभावून नेते अशी मनोमन खात्री भक्तांना वाटते. भक्ताला जसा गणेशभक्तीचा प्रत्यय येतो तसाच संस्था चालकांनाही येतो. कोणत्याही कार्याला सुरूवात करताना गणपतीचे पूजन केले जाते. घरभरणी, लग्न, मुंज यासारखी शुभकार्ये या श्रद्धेच्या बळावरच यशस्वी होतात. नाटक सुरू होताना नांदी म्हटली जाते तर तमाशाची सुरूवात गण गायनाने होते. असे हे गणेशाचे समाजस्वरूप होय.

अथर्वशीर्ष म्हणजे काय?

गणपतीच्या अनेक आरत्या, मंत्र, स्त्रोत्रे, शीर्षे, आळवण्या, श्र्लोक, ओव्या, आर्या, भूपाळ्या असे नाना प्रकार योजून गणेशभक्ती व्यक्त होत जाते. जातीनुसार, प्रदेशानुसार, वयानुसार, जीवनशैलीनुसार भक्तीचे विविध प्रकार आपण ऐकत असतो. या सर्व विविधतेचा उच्चार व संचय तयार करायचा तर मोठा कोशग"ंथ लिहावा लागेल. या लेखात फक्त अथर्ववेदात समाविष्ट असलेला "गणपत्यर्थवशीर्ष' हा मंत्र विचारात घेण्यात आला आहे. हा मंत्र संस्कृत भाषेत असला तरी तो सुलभ आणि सोप्या भाषेत लिहिला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ सहज लक्षात येतो. उपनिषद वाङ्मय वेदांगांचा एक उपभाग आहे. "गणपत्यर्थवशीर्ष' हा मंत्र आहे. उपनिषद आणि शीर्षांत भेद आहे. शीर्षांना पाठांतरानंतर फलश्रुती सांगितलेली असते. उपनिषदांना फलश्रुती सांगितलेली नसते. शीर्षे फक्त अथर्ववेदाची असतात. अशा गणपत्यर्थवशीर्षाचे पुन:चरण 21 वेळा, 108 वेळा व याग आरंभला असेल तर 1000 वेळा करतात.

पंचोपचार व षोडशोपचार पूजा

आपल्या भारतीय संस्कृतीत दोन प्रकारच्या पूजापध्दती सांगितल्या आहेत. त्यांना दैनंदिन व प्रासंगिक पूजा म्हणतात. या प्रकारांना पंचोपचार, षोडशोपचार पूजा असेही म्हणतात. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य (5) यांचा समावेश असतो तर षोडशोपचार पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, विलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प या 16 घटकांचा समावेश असतो. गणेश चतुर्थीची पूजा प्रासंगिक असते, त्यामुळे ती षोडशोपचार करावी लागते. या दिवशी व दर संकष्टी चतुर्थीला गणपत्यर्थवशीर्ष या मंत्राची आवर्तने करतात. या मंत्राचा उच्चार व त्याचा रूपांतरित अर्थ पुढे दिला आहे. शब्दश: अर्थ काहीसा कंटाळवाणा होईल. आपण जो मंत्र म्हणतो त्याचा अर्थ जर माहीत असेल तर आपली देवतेसंबंधी असणारी भावना आणि भक्ती दृढ होत जाते. या मंत्राचे एकूण तीन विभाग आहेत.

अथर्वशीर्षाचे तीन विभाग

1) प्रारंभिक प्रार्थना : ही प्रार्थना आवर्तनाच्या सुरूवातीला तसेच शेवटी म्हणतात. 2) पुन:चरण किंवा आवर्तन : "ॐ नमस्ते गणपतये' पासून "श्री वरदमूर्तयेनम:' येथपर्यंत म्हणतात. हा आवर्तनाचा मु"य भाग होय. हा भाग एकूण दहा ऋचांमध्ये विभागला आहे.
3) फलश्रुती : हा तिसरा विभाग आहे. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली तर भक्तांना काय फळ मिळते ते या भागात दिले आहे.
"गणपती अथर्वशीर्ष' वेदकाळापासून भक्तिभावाने म्हटले जाते तसेच फार मोठ्या भूभागावर उपयोजित आहे. त्यामुळे या मंत्राच्या उच्चारणात काही पाठभेद आढळतात. प्राथमिक स्वरूपाच्या या लेखात अशा त्रुटी सविस्तरपणे देण्याचे योजले नाही.
गणपती अथर्वशीर्ष हा खरे तर अथर्ववेदाचा एक उपभाग आहे. पण या मंत्राची प्रारंभिक प्रार्थना मात्र ऋग्वेदातील आहे. ऋग्वेदाचे लेखन अथर्ववेदाच्या बरेच अगोदरचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ऋग्वेदाचे लेखन इ.स. पूर्व चार ते सहा हजार वर्षांचे आहे असे तज्ज्ञ मानतात. त्यामुळे या साहित्यात असलेली संस्कृत भाषा खूपच कठीण (आजच्या संदर्भात) असल्याचे मानले जाते. इ.स. पूर्व 5 व्या शतकात थोर वैय्याकरणी पाणिनी होऊन गेला. त्याच्यानंतर संस्कृत वाङ्मयात ललित साहित्याची सुरूवात झाली. शाकुंतल, मेघदूत, बाणभट्टाची कादंबरी अशी ललित काव्ये, नाटके, कादंबऱ्यांचे लेखन पाणिनीच्या उत्तर काळातील आहे. यासाठी उपयोजित संस्कृत भाषा अभिजात संस्कृत म्हणून ओळखली जाते. या लेखनातील शब्द, वाक्यरचना तुलनेने सोपी आहे. भाषेत काळाप्रमाणे बदल होत जातात. परिणामी ऋग्वेदातील प्रारंभिक प्रार्थना समजण्यास काहीशी कठीण वाटते. पण अथर्वशीर्षातील दुसऱ्या म्हणजेच मु"य भागाची भाषा समजण्यास सोपी वाटते. खाली प्रारंभिक प्रार्थना आणि आशय दिला आहे.
प्रारंभिक प्रार्थना

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
स्थिरैरंंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायु:।
ॐ स्वस्तिनइंद्रो वृध्दश्रवा: स्वस्तिन: पूषा विश्र्ववेदा:।
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्तिनो बृस्हस्पति र्दधातु।।
ॐ सह नाववतु। सहनौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तुु। मा विद्विषावहै।
ॐ शांति: शांति: शांति:

हे प्रभू, आमचे कान, कल्याण करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी तत्पर होवोत. हे पूजनीय देवांनो, आमचे डोळे, जे जे कल्याणकारक असेल, सर्वांना उपयुक्त वाटेल, त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तत्पर होवोत. आमच्या सर्व अवयवांनी, शरीरांनी तत्पर होऊन आम्ही त्या परतत्वाचेच स्तवन करावे, चिंतन करावे.
आम्ही सर्वांनी एकत्रित संघटित रहावे, सर्वांनी सह अन्नग"हण करावे, आम्ही जे सर्व शिकत आहोत ते सर्व तेजोमय, चैतन्यमय आणि शक्तीदायी असावे. आमच्यामधील द्वेष, मत्सर, भावना नष्ट व्हाव्यात. सर्वच वेळा आमचे मन प्रसन्न, चैतन्याने भारलेले असावे.
ही प्रार्थना गणपती अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला व शेवटी म्हणायची असते.

शांती मंत्र तीनवेळा का?

संस्कृत भाषा प्रगल्भ आहे. प्रौढ आहे व प्रेरणादायी आहे. हे गुण वरील मंत्रातील शब्दरचनेवरून सहज लक्षात येतात. "ॐ शांती' या मंत्राचा उच्चार नेहमी तीन वेळा करतात. आपले मन संकटापासून सुरक्षित आणि शांत करण्यासाठी या शब्दाचा उच्चार तीनदा करतात. माणसाला भेडसावणारी संकटे तीन प्रकारची असतात. त्यामध्ये अनुक"मे मनात, शरीरात विचारांचा क्षोभ होतो व मन अस्थिर होते. काही संकटे शरीरबाह्य असतात. यात सामाजिक वाद, मतभेद, सामाजिक व्याधी यांचा समावेश असतो. अनेक संकटे माणसाच्या, समाजाच्या शक्तीच्या पलीकडची असतात. उदा. भूकंप, पूर, वादळे. आपल्या मनाला व शरीराला या तिन्ही प्रकारच्या संकटांपासून शांती आणि सुरक्षा हवी असते म्हणून "शांती' हा शब्द तीन वेळा म्हणतात. (येथे एक उपपत्ती दिली आहे. आणखीही उपपत्ती असू शकतील.)

अथ श्रीगणेशाथर्वशीर्ष व्या"यास्याम:।।
ॐ नमस्ते गणपतये।।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसी।।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।।
त्वमेव सर्वं खल्विंद ब"ह्मासि।।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।। 1।।

गणपती अथर्वशीर्ष हा मंत्र अथर्वण ऋषींनी लिहिला आहे असा उ"ेख साहित्यात सापडतो. या मंत्राची सुरूवात "ॐ' या उच्चाराने होते. सगळ्या संस्कृत वाङ्मयात मंत्राच्या सुरूवातीला मंगलाचरण लिहिताना शिष्टसंप्रदाय पाळण्याची परंपरा आहे. अथर्वण ऋषींनी स्वत: गणेशाचे स्वरूप अनुभवले ते या मंत्रातून विशद करतात. गणपती हा सर्व देवगणांचा स्वामी आहे असे भक्त मानतात. अशा गणपतीला मी (भक्त) नमस्कार करतो. हे गणेशा, या विश्वावर सत्ता गाजवणारे तत्व तूच आहेस, या सृष्टीचा निर्माता तूच आहेस. साहजिकच, या सृष्टीचा संहार तूच करू शकतोस. खरे तर या विश्वात सर्वांच्या अनुभवाला येणारे ब"ह्मतत्वसुध्दा तूच आहेस. हे अविनाशी आत्मस्वरूपही तूच आहेस.

ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि ।।2।।

ऋषी म्हणतात, "मी तुझ्याविषयी या वर्णनात केवळ जे योग्य आहे, नेमके आहे तेच सांगेन. जे वचन सर्व कालात (भूत, वर्तमान व भविष्य) सत्य आहे, तेच या मंत्रात सांगत आहे.'
अव त्वं मां ।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं।। अव दातारं।।
अव धातारं।। अवानूचानमव शिष्यं।।
अव पश्चात्तात्।। अव पुरस्तात्।।
अवत्तोरात्तात्।। अव दक्षिणात्तात्।।
अव चोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।
सर्वतो मां पाहि पाहि समंतात्।।3।।

माणसाला कोणाचीही स्तुती करणे, चांगले म्हणणे असे पूर्ण स्वातंत्र्य नसल्याचा अनुभव नित्य येतो. पूर्वीही अशीच समाजस्थिती असावी. श्री गणेशाचे यथायोग्य वर्णन करण्यासाठी मंत्रकर्ता आपले रक्षण करण्याची येथे गणेशाकडे प्रार्थना करत आहे. हे गणेशा, तू माझे रक्षण कर, तुझ्या रूपाचे वर्णन करताना मला सुरक्षित ठेव. मी लोकांना तुझे स्वरूप सांगत आहे, त्यामुळे मला संकटांपासून वाचव. माझ्या शिष्यांना अभय दे. संकटे दहांही दिशांतून व निकटच्या सान्निध्यातून येतात, त्यापासून मला सुरक्षित ठेव.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।।
त्वमानंदमयस्त्वं ब"ह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।।
त्वं प्रत्यक्षं ब"ह्मासि।।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

हे गणेशा, तूच वाणी, नाद, जीवस्वरूप आहेस. तुझे अस्तित्वच आनंदस्वरूप आहे. या सृष्टीत जे ब"ह्मस्वरूप अनुभवास येते, ते तूच आहेस. सत्, चित्, आनंद या त्रयींचे दर्शन तुझ्या ठायी मिळते. या सर्व गुणांमुळे तुझी अन्य कोणाशीच तुलना करता येत नाही. तुझे स्थान हृदयात साठवलेले आहे. ज्ञान आणि विज्ञान म्हणजेही तूच आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।।
सर्वं जगदिदं तत्वस्तिष्ठति।।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारि वाक्पदानि।।5।।

हे सर्व जगच तू निर्माण केले आहे. तुझ्या इच्छेमुळेच ते सुरक्षित राहते. तसेच त्याचा शेवटही तुझ्याच इच्छेने होणार आहे. या जगात अनुभवास येणारी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे तूच आहेस. आपल्या वर्णाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही चार स्वरूपे लाभली आहेत. त्या सर्वांत आम्हाला तुझेच अस्तित्व भासते.

त्वं गुणत्रयातीत:।। त्वमवस्थात्रयातीत:।।
त्वं देहत्रयातीत:।। त्वं कालत्रयातीत:।।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।।
त्वं ब"ह्मा त्वं विष्णुस्त्वं
रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब"ह्मभूर्भुव:स्वरोम।।6।।

समाजातील जनसमुहांचे तीन विभाग लक्षात येतात. काही माणसे सत्त्वगुणी असतात, तर काहीजण रजोगुणी असतात. मग राहिलेली जनता तमोगुणी विभागात जमा होते. हे गणेशा, तू या त्रिगुणांच्या पलीकडील उच्च अवस्थेत आहेस. मनुष्याचे तीन प्रकारचे देह - स्थूल, सूक्ष्म व सुषुप्ती अस्तित्व प्रकार मानले गेले आहेत. त्याहीपलीकडे तुझे अस्तित्व आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था तुझ्यासाठी नाहीत. मनुष्याच्या मूलाधार चक"स्थानात तुझे वास्तव्य असते. या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींचा तूच अधिकारी आहेस. थोर ऋषिमुनी तुझेच मनन, चिंतन, पूजन करतात. तूच या सृष्टीचा कर्ता, पालक, लय करणारा आहेस. तू इंद्र, वायू, अग्नी, सूर्य, चंद्र, सृष्टीचा प्राण, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार आहेस.

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तद्नंतरं।।
अनुस्वार: परतर:।। अर्धेन्दुलसितं।।
तारेण ऋध्दं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्वरूपं।। अकारो मध्यमरूपं।।
अनुस्वारश्र्वान्त्यरूपं।। बिन्दुरत्तररूपं।।
नाद:संधानं।। स हिता संधि:।।
सैषा गणेशविद्या।। गणकऋषि:।।
निचृद्गायत्रीच्छंद:।। गणपतिर्देवता।।
ॐ गॅं गणपतये नम:।।7।।

गणेशाचे असे सर्वात्मक स्वरूप सांगितल्यानंतर मंत्रकर्ता या देवतेची भक्ती कशी करावी याचा मंत्र भक्तांना सांगतात. "ग्' कार या वर्णाने या मंत्राची सुरूवात होते. "ॐ' मधील दुसरा वर्ण "अ' आहे. येथे शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. या मंत्राचा उच्चार महत्त्वाचा असून तो परंपरेप्रमाणे करावा. या मंत्रात ब"ह्मदेव, विष्णू, शिव, सूर्य आणि ओंकार या पंचायतन देवतांचे अधिष्ठान मानले आहे.

एकदंताय विद्महे।
वक"तुण्डाय धीमहि।।
तन्नो दंती प्रचोदयात्।।8।।

अशा या एकदंताला (गणेशाला) आम्ही जाणून आहोत व म्हणूनच आम्ही या वक"तुंडाचे मनन, चिंतन आणि पूजन करतो. त्या ब"ह्मस्वरूप दंतीने (गणेशाने) आम्हाला त्याची भक्ती करण्याची प्रेरणा द्यावी.

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।।
रदं च वरदं हस्तैर्बिभ"ाणं मूषकध्वजम्।।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम्।।
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणमच्युतम्।।
(भक्तानुकंपितं हे भाष्यानुसार नाही)
आविर्भूतं च सृष्ट्यादौ
प्रकृते: पुरूषात्परम्।।
एवं ध्यायाति यो नित्यं
स योगी योगिनां वर: ।।9।।

गणेशाच्या धारणेसाठी हा मंत्राचा (9) भाग दिला आहे. ज्याला एक दात, चार हात असून ज्याच्या वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हस्तदंत व उजव्या खालील हातात आशीर्वाद मुद्रा अशी गणेशाची मूर्ती आहे. उंदीर हे ज्याचे वाहन आहे, जो रक्त वर्णाचा आहे, जो लंबोदर आहे व ज्याचे कान सुपासारखे आहेत. ज्यांनी लाल वस्त्रे परिधान केली आहेत, ज्यांनी रक्तचंदनाची उटी अंगाला लावली आहे, ज्याची पूजा तांबड्या फुलांनी सजवली आहे असा हा गणेश आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करतो. गणेश देवता सृष्टीची निर्मिती करणारी, अत्यंत प्राचीन, प्रकृती आणि पुरूष यांच्याही पलीकडे जाणारी आहे. या गणेशमूर्तीचे आम्ही नित्य, निरंतर ध्यान करतो. सर्व योगी पुरूषांपेक्षाही तो श्रेष्ठ योगी आहे.

नमो व"ातपतये। नमो गणपतये।।
नम: प्रमथपतये।।
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।।
विघ्ननाशिने शिवसुताय।।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।

याप्रमाणे ध्यानधारणा केल्यावर गणेशाला नमस्कार करतात. देव समुदायांचा स्वामी, गणांचा प्रमुख अशा लंबोदराला, एकदंताला नमस्कार असो. गणपती विश्वाचा लय करणारी तसेच भक्तांना वर देणारी ती देवता आहे.
अथर्वण ऋषींनी लिहिलेले अथर्वशीर्ष येथे समाप्त होते. हा मंत्र पुन: पुन: उच्चारल्यामुळे जी फलप्राप्ती होते त्याचे विवरण खाली दिलेल्या मंत्राच्या तिसऱ्या भागात सांगितले आहे.

एतदथर्वशीर्षं योऽधीते।।
स ब"ह्मभूयाय कल्पते।।
स सर्वत: सुखममेधते।।
स सर्वविर्घ्नैबाध्यते।।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते।।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।।
सायंप्रात: प्रयुंजानो आपापो भवति।।
सर्वत्राधीयानोऽपविघ"ोे भवति।।
धर्मार्थकाममोक्षं च विंदति।।

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।।
यो यदि मोहाद्दास्यति
स पापीयान् भवति।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते
तं तमनेन साधयेत् ।।11।।
(अनुक"मे 11 "अ', 11 "ब' व 11 "क').

अनेन गणपतिमभिषिंचति।।
स वाग्मी भवति।।
चतुर्थ्यामनश्रन् जपति।।
स विद्यावान् भवति।।

इत्यथर्वणवाक्यं।
ब"ह्माद्यावरणं विद्यात्।
न बिभेति कदाचनेति।।12।।
(अनुक"मे 12 "अ' व 12 "ब').

यो दूर्वांकुरैर्यजति।।
स वैश्रवणोपमो भवति।।
यो लार्जैर्यजति स यशोवान भवति।।
स मेधावान भवति।।

यो मोदकसहस्त्रेण यजति।।
स वाञ्छितफलमवाप्नोति।।
य: साज्यसमिद्भिर्यजति।।
स सर्वं लभते स सर्वं लभते ।।13।।
(अनुक"मे 13 "अ' व 13 "ब').

अष्टौ ब"ाह्मणान् समम्यग्ग"ाहयित्वा
सूर्यवर्चस्वी भवति।।
सूर्यग"हे महानद्यां प्रतिमासंनिधौ
वा जप्त्वा सिध्दमंत्रो भवति।।
(आठ ब"ाह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम प्रकारे शिकवले असता शिकवणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो.)

महाविद्यात्प्रमुच्यते।।
महादोषात्प्रमुच्यते।।
महापापात् प्रमुच्यते।।
स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति।।
य एवं वेद उत्युपनिषद्।।14।।
(अनुक"मे 14 "अ' व 14 "ब'.)

या मंत्रांची फलश्रुती 11, 12 आणि 13 या मंत्रविभागातून सांगितली आहे. या मंत्राचा आशय पुढे दिला आहे.
गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणारा भक्त ब"ह्मस्वरूप मिळवतो. त्याला सुखप्राप्ती होते व तो संकटमुक्त होतो. सायंकाळी किंवा सकाळी किंवा दोन्ही वेळी या मंत्राचे पठण केले तर पापक्षालन होते व त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांचा लाभ होतो. हा मंत्र अश्रध्देय माणसाला शिकवू नये तसेच शिकवताना धनाची अपेक्षाही बाळगू नये. मनात असलेली इच्छा पूर्ण होणाऱ्या या मंत्राची 1000 आवर्तने करावी लागतात.
या मंत्राने गणेशाला अभिषेक करणारा भक्त उत्तम वक्ता होतो. मंत्रकर्ता म्हणतो की, उपवास करून या मंत्राचे पारायण केले तर भक्त विद्यासंपन्न होतो व असा भक्त निर्भय बनतो. गणपतीचे पूजन दूर्वांनी करणारा भक्त सधन होतो. भाताच्या लाह्यांनी पूजन करणारा भक्त बुद्धिवान होतो. जो भक्त मोदकांचा नैवेद्य दाखवितो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. तुपाने आणि समिधांनी पूजन करणाऱ्याला सर्व सुखांचा लाभ होतो. आठ भक्तांना अथर्वशीर्ष म्हणावयास शिकवणाऱ्यास सूर्याप्रमाणे प्रतिभा लाभते. सूर्यग"हण काळात पवित्र नदीच्या काठी किंवा पवित्र मंदिरात जप केल्यास सिध्दमंत्रांची प्राप्ती होते. या मंत्राच्या पठणाने भक्त संकटांपासून, महापातकांपासून, महादोषांपासून मुक्ती मिळवू शकतो.
गणपती अथर्वशीर्ष मंत्राची येथे समाप्ती होते. यानंतर प्रारंभिक प्रार्थना पुन्हा एकदा म्हणावी. हा अथर्वशीर्ष मंत्र स्नानानंतर, धूतवस्त्र नेसून पवित्र आणि शांत ठिकाणी पठण करावा. यावेळी मन शुद्ध आणि स्थिर असावे. हा मंत्र एकट्याने अगर सामूहिक पद्धतीने म्हणावा व त्यानंतर श्री गणेशाची आरती म्हणावी. गेली हजारो वर्षे लक्षावधी भक्तांनी याप्रमाणे तप:चरण केले व त्यांनी आपले जीवन संपन्न, समृद्ध केले आणि अपूर्व समाधानाचा लाभ घेतला.