भक्तिप्रेमाची सगुण मूर्ती

ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर

भक्ती आणि प्रेम हे दोन भावविशेष माणसाचे जीवन अधिक समृद्ध करणारे आहेत. कोणत्याही स्थितीत असलेल्याला जगण्यात आनंद वाटावा, अशी स्थिती निर्माण करणारे आहेत. भक्तीत प्रेम असते, पण प्रेमात नेहमी भक्ती असते असे नाही. मुलाच्या आईवरील प्रेमात भक्तीचा काही अंश जरूर असतो, पण आईचे मुलावरील प्रेम हे वात्सल्यमय असते. त्यात भक्तीचा लवलेशही नसतो. असूही नये. मोठ्या भावावर असलेल्या प्रेमाला काहीवेळेला भक्तीची जोड मिळते. पत्नीचे पतीवरील प्रेमही क्वचित भक्तीच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचते. पण सामान्यतः भक्ती ही वेगळी गोष्ट, मात्र भक्तीमध्ये प्रेम असावेच लागते, कारण भक्तीत जिव्हाळा ओतायचा झाला, तर तो प्रेमाशिवाय ओतता येणे शक्य नाही. म्हणून तर मधुराभक्तीचा महिमा विशेष प्रमाणात गायिला जातो. मधुराभक्ती म्हणजे परमेश्र्वर हा आपला पती आहे आणि आपण त्याच्या प्रेयसी किंवा पत्नी आहोत, अशी भावना निर्माण होणे. ही भावना उच्चतम भक्तीची निदर्शक आहे, असे पूर्वापार समजले गेले. म्हणून तर संत कबीर म्हणतात, ""एक एक गोपीके प्रेममें, बह गए लाख कबीर।।''

सकाम आणि निष्काम भक्ती

आपण देवाची भक्ती करतो त्यावेळेला सकाम भक्तीत प्रेम असेलच असे नाही. निष्काम भक्तीत मात्र प्रेमाचा अंतर्भाव होऊ शकतो. पण विठुराया किंवा गणराया यांच्यावर मराठी माणूस जे प्रेम करतो, ते प्रेम "या सम हे' या जातीचे आहे. नीट विचार केला तर ध्यानात येईल, विठ्ठलाच्या दरबारात हजर होण्यासाठी जसे लाखो वारकरी तहानभूक विसरून दर आषाढीला पंढरपुरात गर्दी करतात, किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो गणेशभक्त गुलालाने आनंदात रंगतात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात, तसा भाग्ययोग इतर देवतांच्या कुंडलीत क्वचितच आढळेल. श्रीविठ्ठल आणि श्रीगणेश ही महाराष्ट्राची लोकदैवते आहेत. या दोन्ही दैवतांवर मराठी माणूस मनापासून प्रेम करतो आणि तुकोबांनी तर विठ्ठल आणि गणपती हे वेगवेगळे नाहीत असे सांगणारा एक अभंगच लिहिला. विठ्ठलावर संतकवींनी ज्या विविध रचना केल्या, त्यात विठ्ठलाला नको ती संबोधनेही वापरली. त्याला प्रेमाने दुरुत्तरेही केली. त्याचे कौतुक किती केले याला तर सीमाच नाही. विठ्ठल हा संतांच्या प्रेमाचा विषय आहे आणि म्हणाल तर गणेश हासुद्धा गणेशभक्तांच्या प्रेमाचा विषय आहे.

मनोहारी श्रीगणेश

अगदी मनापासून ज्याच्यावर प्रेम करावे, असा गणपती हा देव आहे. तो चार हात, मोठे कान, वाकडी सोंड या रूपामुळे थोडा वेगळा वाटत असला तरी त्याचे ते रूपही मनोहर आहेच आणि आपला विठुराया तर असा आजकालच्या नजरेने "सुंदर' वाटावा असा कुठे आहे? पण भक्तांच्या नजरेला तो "मदनाचा पुतळा' वाटतो. तुकोबा त्याला "सुंदर ते ध्यान' म्हणतात. प्रेमाचाच हा प्रकार आहे. प्रेमाच्या नजरेने पाहिले तर विठ्ठल जसा सुंदर वाटतो, तसा गणपतीही सुंदर वाटतो. आणि आणखी एक गोष्ट. गणपती हा तुमच्या - आमच्यासारखाच सर्वसामान्यांच्या आवडीनिवडीत रमणारा, रंगणारा देव आहे. त्याला गोडधोड आवडते, तो आनंदात असला की नाचतो. नाचायला लागला की सगळे जग स्वतः विसरतो आणि इतरांनाही विसरायला लावतो. तो खोडकर आहे. वडिलांच्या डोक्यावरचा चंद्र लपवून तो त्यांचीही खोडी काढण्यास कमी करीत नाही. सर्वसाधारण मुलांसारखा तो आपल्या भावाशी भांडतो. भांडण सोडवण्यासाठी आईला साकडे घालतो. तो प्रेम करतो, लढतो. आपण आयुष्याच्या ज्या ज्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, त्या सर्व परिस्थितीतून कसे शिताफीने निभावून जावे याचे प्रात्यक्षिकच जणू त्याने आपल्या विविध अवतारांत दाखविले आहे.

सर्वांमध्ये रस असलेला देव

मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि आवडीच्या वाटतात, त्या सर्व गोष्टींमध्ये रमणारा देव म्हणजे गणपती. गणपती हा गोडधोड खाणारा आहे. त्याला "लाडू मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे' प्रसन्न करतात. तो मोजकेच का होईना, पण अंगावर दागिने घालतो. पण असे असले तरी तो सुखासीनतेत रमणारा देव नाही. वेळप्रसंग घडला तर तो हातातील शस्त्रांचा उपयोग करायला मागेपुढे पाहात नाही. तो देवांचा सेनापतीही आहे. असे सांगतात की, 21 शिपायांचा एक गट असे 21, पुन्हा या 21 गटांचा एक मोठा गट असे 21 मोठे गट अशा पद्धतीने गणपतीने आपले सैन्य उभारले आणि सैन्याच्या अशा स्वरुपाची रचना आजही केली जाते. गणपती सेनापती म्हणून इतका श्रेष्ठ आहे की तो रणांगणात कधीही हरलेला नाही. तो निरंतर अजेय आहे. बरे, असे असूनही तो केवळ लढणारा शिपाई गडी नाही. त्याला नृत्य, नाट्य, गायन अशा कलांमध्ये विशेष रस आहे. "गणराज रंगी नाचतो' असे आपण कौतुकाने म्हणतो. सिद्धि - बुद्धि अशा दोन पत्नी निरंतर त्याच्यासोबत असतात. वादविवादात, लढाईत जिंकायचेच अशा निष्ठेने तो वावरतो. आपण लढाईत कमी पडू अशी शंका आली तर कपटाचा डाव मांडण्यासही तो मागेपुढे पाहात नाही. गणेशाचे हे स्वरूप म्हणूनच आपल्याला विलोभनीय वाटते आणि त्यामुळेच गेली काही हजार वर्षे आपण मनोभावे त्याचे पूजन करीत आलो आहोत आणि त्याबरोबरच त्याच्यावर मनापासून प्रेमही करीत आलो आहोत.

1 comment:

vivekcare4u said...

Ekdum Mast lihile aahe ha.......