अस्सा गणेश सुरेख बाई...

सौ. रेखा ठाकूर


आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.




ताशाचा आवाज टररऽऽर झाला
न् गणपती माझा नाचत आला...
कधीतरी लोकगीतसदृष्य या गाण्याचे बोल कानावर पडले आणि अगदी मनोमन पटून गेले- नृत्य म्हणजे उल्हास, नृत्य म्हणजे चैतन्य... गणपतीच्या आगमनाबरोबर हे सारं अनाहूतपणे येतंच. त्यामुळे नाचणारा गणपती प्रतीकच होऊन येतो. आमच्याकडे नृत्यमुद्रेतल्या गणपतीचे एक मोठ्ठे पोस्टर आहे. मागच्या दोन हातांमध्ये परशू आणि कमळ. पुढच्या दोन्ही हातांची मुद्रा अशी की त्यातून ‘तथास्तु’चा झंकार उमटावा. उजवा पाय चवड्यावर किंचित उचललेला आणि डावे पाऊल गिरकी घेण्याच्या पवित्र्यात. नखशिखांत नटलेला मूषक कौतुकभरल्या नजरेने आपल्या स्वामीच्या कला पाहतो आहे. या चित्राकडे पाहिले की प्रसन्नतेचा शिडकाव झाल्यासारखे वाटते. खिन्नतेच्या जाळ्या गळून पडतात आणि सोनसळी उन्हं बागडू लागतात आसपास. त्यामुळेच मला नाचणार्‍या गणराजाचे अप्रूप अधिक आहे.
गणपती आले की मग आठवणींची पाने फडफडू लागतात. माझ्या माहेरी माझे आईवडील नोकरीवाले. बिर्‍हाडाची बेताची जागा. त्यामुळे गणपती आणला की सारे यथासांग व्हायला हवे या आईच्या श्रद्धेमुळे इच्छा असूनही घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे घरी ‘बाप्पा’ येण्याचा थरार मला ठाऊकच नव्हता. आमच्याकडे सार्वजनिक गणपती मात्र धूमधडाक्यात असायचे. तिथे पडून असायचे. पण भक्तिभावाने घरात आणला जाणारा, सजवलेल्या मखरात विराजमान होणारा, लाल फुलं, दूर्वा ल्याणारा आणि घमघमत्या वासाचे शुभ्र मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावयाचा ‘घरचा गणपती’ शेवटी वेगळाच ना!
कालांतराने ‘झाले मी सून गोव्या घरची’ म्हणत मी धाडकन गोव्यात आले. आमचं इकडचं सख्खं-चुलत असं एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दीर-नणंदा, मुलंबाळं असं २०-२५ माणसांचं नांदतं घर गोकुळासारखं. तिकडून (म्हणजे फार लांबून नव्हे हो, महाराष्ट्रातून. पण इकडच्या काही मंडळीना महाराष्ट्र म्हटलं की जरा मळमळतं) आल्यामुळे मला ‘एकत्र कुटुंब’ ही संकल्पना नवीनच होती. इथल्या संस्कृतीला एक स्वतःचा वेगळा चेहरा आहे. तो मला अजून अपरिचित होता. ‘हम दो, हमारे दो’ अशा चौकटीत वाढल्यानंतर इथे आपलं जमेल ना अशी थोडी धुकधुक वाढली होती. पण या प्रेमळ घराने मला कुठलेही आढेवेढे न घेता सहज स्वीकारले. आमचं शंभर वर्षांचं जुनं घर. भक्कम. खूप खोल्या. गडगंज माजघर. तिथे प्रशस्त ओट्यावर देवघराची जागा. अनेक देवदेवतांच्या तस्विरींचा लवाजमा. मोठ्या देव्हार्‍यात अनेक मूर्ती... शाळिग्राम, बाण गंगा, वस्त्रात गुंडाळलेले कुठले पवित्र आकार. (अद्याप सगळे देव मला नावानिशी ठाऊक नाहीत.) माझे सर्व सासरे पौरोहित्य करणारे (म्हणजे ‘भटपण’), त्यामुळे घरात पूजाअर्चा, सणवार, सोवळंओवळं असायचं. पण त्याला कर्मठपणाचा किंवा कर्मकांडाचा वास नसल्यामुळे मला त्यात सामावून जाणं सहज जमलं. पारोशानी देवाची पेढी ओल्या वस्त्राने पुसणे, पूजेची उपकरणे चकचकीत करणे, रांगोळी रेखणे वगैरे आनंदाने करू लागले. सासरे सोवळे नेसून मनोभावे पूजा करायचे. दूर्वा, तुळशी, बेल, तांबड्या-पांढर्‍या-पिवळ्या फुलांची गर्दी. त्यात बुडालेले सुस्नात देव. उदबत्ती, धूपाचा गंध, घंटेचा मंजूळ नाद आणि त्यांच्या तोंडून येणारा मंत्रघोष... काहीतरी वेगळंच अनुभवायला मिळायचं. श्रावणातला प्रत्येक वार (एक बिचारा बुधवार सोडला तर) मानाचा. त्यात नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण, त्यामुळे ही श्रावणधून पटकन संपत यायची. त्याआधीच घराला गणपतीचे वेध लागले. माझे मन उत्सुकतेने भरून गेले. ‘गणपती’ ही काय चीज आहे याची माझी कल्पना फारच तोडकी. त्यामुळे अंदाजच बांधता येईना. ‘पहिलावहिला गणपती’ आयुष्यातला.
रात्रीच्या पंगतीत येत्या शनिवार-रविवारी घरसफाईचं पक्कं झालं. नोकरीवाल्या मंडळींसाठी शनि-रविची योजना. मग काय घरात मंगलकार्य उभं राहिल्याची लगबग सुरू झाली. एवढं मोठं पुराणं घर... माणसांबरोबरच झुरळी, कोळी, उंदीर सुखाने राहत होतीच. सकाळी भरपेट खाऊन सार्‍यांनी कंबर कसली. लांब दांड्याच्या झाडूने धूळ, जळमटे साफ झाली. प्रत्येक वस्तू उचलून बादल्या-बादल्या पाण्याने सारी जमीन (फरशी) स्वच्छ झाली. अडगळ काढून तिचा निचरा झाला. भिंतीवरच्या पूर्वजांच्या तस्विरी स्वच्छ झाल्या. त्यांना नवे हार चढवले गेले. पडदे साबणपाण्यातून काढून उन्हात वाळायला पडले. सतत २-३ तास कामाची वेठ मारल्यावर अधेमधे चहाची आधणे आणि शेवचिवड्याचे बकाणे. खूप दिवसांनी निवांत एकत्र आल्याने थट्टामस्करी, हशा चालू राहिले. ही झाली बाह्य गणपतीसाठीची पूजेची खास. तांब्या-पितळेची उपकरणे सासरे काढायला लागले... अबब! दोन-अडीच फुटी पितळी भक्कम समया. तांब्याची ताम्हणे, लोट्या, पळ्या, तबके, कितीतरी निरांजने. मग आमसूल-मीठ लावून (धुऊन परत चुलीतल्या राखेने घसाघस घासून) उजळण्यात आम्ही गुंतलो. दुपार केव्हाच झाली. सुगरण सासवांनी चण्याची आमटी, सुरणाची कापं असा सर्वांचा आवडता पारंपरिक स्वयंपाक बनवला. त्यावर ताव मारून थोडी वामकुक्षी करून परत कामाला जुंपले. संध्याकाळपर्यंत घर चकचकू लागलं. एवढं काम करायची सवयच नव्हती. थकायला झाले, पण मजा आली.
आमच्याकडे गणपतीचा नैवेद्य म्हणजे उकडीचेच मोदक. पण गोव्यात नवर्‍या! त्याच्या खास प्रीतीच्या (आम्ही त्याला करंज्या म्हणतो आणि त्या दिवाळीलाच होतात). आता घरात एवढी माणसं, त्यात आला-गेला पैपाहुणा, लेकीबाळी (सासुर्‍याला आलेल्या), सगेसोयरे... त्यामुळे नेवर्‍यांचा नग चारशे ते साडेचारशे आणि दोन प्रकारचे (पीठाचे आणि बेसनाचे) लाडू शंभर-दीडशे. झाल्यास घरचा खास चिवडा, शंकरपाळे वगैरे ऐकून मला भोवळच आली. कसं व्हायचं एवढं? नेवर्‍यांचा मांड मांडला परत पुढच्या शनिवारी. कामावरून येईपर्यंत अतिशय कामसू सासूबाईंनी सारी जय्यत तयारी केलेली. पोळपाट, लाटणी, धुतलेले पाट, मोठ्ठ पातेलं भरून सारण (सुकं भाजलेलं खोबरं, खसखस, तीळ, गूळ, साखर, थोडा रवा आणि गव्हाचं भाजलेलं पीठ जायफळ, वेलची पावडर घातलेलं. हे सारण असं सुंदर दिसायचं की मोह व्हावा...), मैदा आणि भरायचं सारण यासाठी तसराळी, त्यात मापाचे बेतशीर चमचे, पात्यांच्या कडांना लावायला वाट्यातून पाणी आणि हलका काथा, कढया, झारे, वातीचा भला मोठा स्टोव्ह, तयार नेवर्‍या वारडू नयेत म्हणून त्यावर घालायला ओला पंचा आणि शेवटी तयार माल ठेवण्यासाठी कागद पसरलेला होता.
आम्ही सारे वेगवेगळ्या कामावर नेमले गेलो. २०-२५ वर्षांपूर्वी फूड प्रोसेसर वगैरे नसल्याने पीठ मळणे, तिंबणे हे सारे एका दिराकडे, साचे नसल्याने भरण्याचे काम एकाकडे, आम्ही काहीजणी फक्त पाती करण्याच्या कामावर, एक सासूबाई तळणीच्या तज्ज्ञ. स्टुलावर बसून स्टोव्हवरच्या कढईचा ताबा घेतला त्यांनी. कॅसेटवर ‘वस्त्रहरण’, ‘असा मी असा मी’, मध्येच नाट्यसंगीत, कधी जसराज, कधी मालिनी असं सतत चालूच. त्यात तोंडाचा पट्टा. म्हणता म्हणता झारा नेवर्‍यांनी ओसंडू लागला आणि मला एकीचे बळ काय असते याचे साक्षात उदाहरणच दिसले.
रात्री श्रमपरिहारार्थ पत्त्यांचा डाव रंगला. उरलेली कामे दुसर्‍या दिवशी अशीच हसत-खेळत. आता गणराज वेशीपर्यंत पोहोचलेच होते. हरितालिका येऊन गेली. पूजा झाली, कथा वाचली, आरती झाली, दिवसभर तर्‍हेतर्‍हेचा फराळ, वाती, फुलवाती, वस्त्र वगैरे चालूच होतं काहीबाही. कलेची नजर असलेल्या मंडळींनी सजावटीचा ताबा घेतला. (तेव्हा तयार मखरांची प्रथा नव्हती.) पताका लागल्या. जुनं सागवानी टेबल. त्याच्यामागे देखणा पडदा. टेबलावर सुंदर टेबलक्लॉथ, रंगीत दिव्यांच्या अन् फुलांच्या माळा अशी कलाकुसर झाली. माटोळीचे काम स्वतः सासर्‍यांनी हातात घेतले. ‘माटोळी’ हा प्रकार मला अनोखा वाटला. जयंतराव साळगावकर म्हणायचे तसा हा रानावनाचा (कारण मस्तक हत्तीचे) आणि माणसांचा (अर्ध शरीर माणसाचं) देव. उपलब्ध असलेली फळं अतिशय नेटकेपणानी माटोळीला बांधली आणि तशी बहरलेली रंगीत ‘माटोळी’ गणपतीपुढे छताला चढली. (तेव्हा पायीच जाऊन गणपतीला आणत. कारण गाड्या-घोडे कुठे होते.) टोप्या घालून झांजा घेऊन गणपती आणायला पोरंटोरं आणि मोठे निघाले. चंदनाच्या पाटावरून ‘मोरया रे मोरया गणपती मोरया’च्या गजरात, झांजांच्या आवाजात अखेर आगमन झाले. पायावर दूध-पाणी घालून आणि मीठ-मोहर्‍या ओवाळून त्याला घरात घेण्याचे मला सांगितले. घरच्या मोकळ्या वातावरणामुळे दडपण नव्हते. काही चुकलंबिकलं तरी गणपतीला ओवाळून घरात घेताना उगीचच भरून आलं. त्याच्या आगमनाबरोबरच एक शुचिर्भूत आनंदाची लहरच घरादारावर फिरली.
त्यावर्षी पाच दिवसांचा गणपती. मग रोजच उत्सव. सकाळी यथासांग षोडशोपचाराची पूजा, एकवीस दूर्वांच्या माळा, फुलांचे-जायांचे मुकुट, गोडधोडाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाची आवर्तने, सग्यासोयर्‍यांची ये-जा, सजावट बघायला येणारे गावकरी, अशी गोड लगबग. संध्याकाळी कुणीतरी दीर स्नान करून सोवळे नेसून सायंपूजा करायचा. मग सुरू व्हायचा आरत्यांचा दणका. सतरंज्या पसरायच्या, आरत्यांची पुस्तके, डफ, झांजा... अगदी डबेही वाजवण्यासाठी दाखल व्हायचे. गळ्यावर आरत्या म्हणणारे खंदे वीर पुढे मांड्या ठोकून बसायचे. आम्ही कोरसला मागे. पारंपरिक आरत्यांसोबत ‘शेंदूर लाल चढावो’, ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘येई हो विठ्ठले’ अशा चालींच्या आरत्यांची माळ लागायची. एवढा चेव यायचा की देवासमोर तबकात निरंजनं घेऊन असणार्‍याचा पुतळा झाला तरीही आरत्या थांबायच्या नाहीत. पण शेवटी ‘घालीन लोटांगण’वर यावंच लागायचं. मग धीरगंभीर ‘देवे’ चालायचे आणि सरतेशेवटी प्रसादांची लयलूट. फटाक्यांच्या लडी घेऊन पोरं केव्हाचीच चुळबुळत राहायची. (आमच्याकडे फटाके हा शब्द दिवाळीशीच जोडलेला.) असे कापरासारखे दिवस उडाले आणि विसर्जनाचा दिवस आला.
त्या दिवशी तर प्रत्येकाला या लाडक्यासाठी काय करू, काय नको होऊन गेलेलं. आज सायंपूजा आणखी मनोभावे. आरत्या आणखीनच दणाणत्या. मग आला विदाईचा क्षण. देवाला सांगणं करणं हा प्रकार मला खूप भावून गेला. माझे सासरे त्याला साकडे घालीत राहिले. सगळ्यांच्या मनातले. टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली. आजचा प्रसाद आणखीनच खपून बनवलेला. पण इथे गणपती विसर्जनाची प्रथा नसल्याने गणपती घरातच राहिला. गणपती न पोचवल्यामुळे खूप रिकामं नाही वाटलं. सगळ्या आठवणी फेर धरून राहिल्या.
आज २५-२६ वर्षांनी ते घर नाही. सारे वेगवेगळ्या जागी पण गणपती असाच. नात्यांची घट्ट वीण अद्यापि उसवलेली नाही. आता अधिक आधुनिक, सुटसुटीत झाली सारी तयारी. पण आपल्या घरी गणपती असण्याची फारशी असोशी पूर्वी नसणारी, मी मात्र त्याच्या आगमनाची नकळत वाट पाहत राहते. आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.

No comments: